आता पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ

0
42

राज्य सरकारकडून इंधनावरील ‘व्हॅट’मध्ये वाढ; पेट्रोल 1 रुपयाने, तर डिझेल 36 पैशांनी महागले

लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर राज्यातील नागरिकांना पहिल्यांदा वीज दरवाढीचा धक्का बसला होता. त्यानंतर आता राज्यातील नागरिकांना इंधन दरवाढीचा झटकाही सहन करावा लागणार आहे. राज्यात शनिवारपासून पेट्रोल 1 रुपये, तर डिझेल 36 पैशांनी महागणार आहे. इंधनाचे दर वाढल्याने आता अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढणार असून, या दरवाढीविषयी सर्वसामान्य जनतेत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काँग्रेस, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड आदी विरोधी पक्षांनीही या इंधन दरवाढीविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारने इंधनावरील व्हॅट (मूल्यवर्धित कर) वाढवल्याने ही दरवाढ झाली आहे. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 21.5 टक्के आणि डिझेलवरील व्हॅट 16.5 टक्के वाढवल्याने इंधनाच्या किमतीत वाढ होणार आहे.

सध्याच्या घडीला राजधानी पणजीत पेट्रोलचा दर 95.23 रुपये प्रति लीटर असा आहे, तर डिझेलचा दर 87. 79 रुपये प्रति लीटर असा आहे. शनिवारपासून पेट्रोलचा दर पणजीत 96.23 रुपये प्रति लीटर, तर आणि डिझेलचा दर 88.15 रुपये प्रति लीटर असा असेल. वाहतूक खर्चानुसार राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पेट्रोलचे किंचित वेगवेगळे असणार आहेत. वास्को, मडगाव, फोंडा, म्हापसा या शहरांत इंधनाचे दर वाहतूक खर्चामुळे वेगवेगळे असतील.
गेल्या 16 जूनपासून राज्यात वीज दरवाढ लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता 5 दिवसांनंतर राज्यात इंधन दरवाढ लागू करण्यात आल्याने सर्वच विरोधी पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सरकार जनतेवर सूड उगवतेय : गोवा फॉरवर्ड
गोवा फॉरवर्ड पक्षानेही या इंधन दरवाढीवर टीका केली असून, त्याविषयी संताप व्यक्त केला आहे. या दरवाढीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत म्हणाले की, वीजदरवाढीनंतर अवघ्याच दिवसांत आता सरकारने इंधनदरवाढ केली आहे. राज्यातील भाजप सरकार जनतेवर सूड उगवत आहे. किमान आता तरी सरकारने उठसूट नको ते महोत्सव आयोजित करून जनतेच्या पैशांचा अपव्यय करणे बंद करावे व काटकसरीवर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. सरकारने विनाविलंब वीज दरवाढ व इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी कामत यांनी केली.

दरवाढ तात्काळ मागे घ्या : काँग्रेस
राज्यातील डबल इंजिन सरकारने ही इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. लोकसभा निवडणुका संपताच राज्यातील असंवेदनशील भाजप सरकारने इंधनावरील व्हॅट वाढवल्याने ही दरवाढ झाली आहे. प्रमोद सावंत सरकारने वाया जाणारा खर्च थांबवावा, अशी मागणी या दरवाढीवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. सरकारने खर्च करताना थोडी काटकसर करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.