आता डोळा मतपेटीकडे…!

0
19
  • प्रमोद ठाकूर

राजकीय पक्षांनी बहुमताचा कितीही दावा केला तरी या निवडणुकीत एकंदर राजकीय स्थिती पाहता कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण वाटते. काही मतदारसंघांत अपक्ष उमेदवार बाजी मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापनेमध्ये अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, यात शंका नाही.

गोवा विधानसभेची निवडणूक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडली. स्थानिक निवडणूक कार्यालयाने मतदानाला उत्सवी स्वरूप देऊन जास्तीत जास्त मतदारांनी मतदानात सहभाग घ्यावा म्हणून प्रयत्न केला. तथापि, विधानसभेच्या मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का घसरला आहे. निवडणूक रिंगणात अनेक राजकीय पक्ष उतरल्याने निवडणूक रंगतदार व चुरशीची झाली आहे. राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सोशल मीडियावरून निवडणूक निकालाबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. येत्या १० मार्चला होणार्‍या मतमोजणीनंतर ३०१ उमेदवारांचे मतयंत्रात बंदिस्त भवितव्य खुले होणार आहे. तोपर्यंत राजकीय पक्षांचे नेते दावे करीत राहणार आहेत. मात्र मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल!
विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्ष आणि ६९ अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. सर्वच मतदारसंघांतून तिरंगी, चौरंगी लढतीमुळे झालेल्या मतविभागणीमुळे धक्कादायक निकालाची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही अपवाद वगळता उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होण्याची शक्यता कमीच आहे.

यावेळी निवडणुकीसाठी ७८.९४ टक्के एवढे मतदान झाले आहे. यात टपालाद्वारे मतांच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे यावर्षी साधारण ऐंशी टक्क्यांपर्यंत मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीत ८२.५६ टक्के मतदान झाले, तर २०१२ च्या निवडणुकीत ८२.९४ टक्के मतदान झाले होते.

स्थानिक निवडणूक कार्यालयाने यावर्षी मतदानाला उत्सवी स्वरूप देऊन जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न केला. मतदानाबाबत जनजागृतीसाठी पथनाट्ये सादर करण्यात आली. तसेच पोस्टर्स व इतर प्रकारच्या स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्यातून राज्यात पर्यावरणपूरक मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. मतदान करणारी दाम्पत्ये, मित्रमंडळी यांना ठरावीक हॉटेलमध्ये सवलतीच्या दरात जेवणाची योजना कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. मतदानासाठी वेळ वाढवूनसुद्धा मतदानाची टक्केवारी वाढू शकली नाही. राज्यातील काही मतदारसंघांत मतदानप्रक्रिया संथगतीने सुरू होती. त्यामुळे मतदारांना बराच काळ रांगेत उभे राहावे लागत होते, अशा तक्रारी आहेत.
निवडणूक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक अधिकार्‍यांना कार्यरत करण्यात आले होते. निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आल्यानंतर मतदान होईपर्यंत सुमारे १२ कोटी रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यात रोख रक्कम, मद्याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

राज्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त मतदानाची नोंद झाली आहे. राजधानी पणजीमध्ये ७३.७५ टक्के, म्हापशात ७७.४३ टक्के, मडगावात ७४.८४ टक्के, वास्कोत ७०.५२ टक्के, फोंड्यात ७७.८९ टक्के अशी कमी मतदानाची नोंद झाली. तर ग्रामीण भागातील मांद्य्रात ८४ टक्के, पेडण्यात ८३ टक्के, पर्येत ८६.०४ टक्के, वाळपईत ८२ टक्के, सावर्डे येथे ८६.६९ टक्के, सांगेत ८५.६९ टक्के, साखळीत ८९.६४ टक्के, केप्यात ८३.४५ टक्के, मयेत ८४.३३ टक्के, तर प्रियोळमध्ये ८७.७३ टक्के अशी जास्त मतदानाची नोंद झाली. सासष्टी, तिसवाडी आणि बार्देश या तीन तालुक्यांतील मतदारसंघांत कमी प्रमाणात मतदान झाले आहे.

राज्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. यावेळी केवळ २६ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ३३ टक्के राखीवता दिली जाते. विधानसभा निवडणुकीत महिलांना अजूनपर्यंत राखीवतेचा लाभ दिला जात नाही. राजकीय पक्षांकडून महिलांना कमी प्रमाणात उमेदवारी दिली जाते. राज्यात मतदान करणार्‍या महिलांची संख्या जास्त आहे. ८०.९८ टक्के महिलांनी यावेळी मतदान केले. डिचोली (८९.८ टक्के), साखळी (८९.६ टक्के), मांद्रे (८८.८ टक्के), सांगे (८८.६ टक्के), प्रियोळ (८८.४ टक्के) या मतदारसंघांत महिलांनी सर्वांधिक मतदान केले आहे. खाणव्याप्त भागात साखळी, डिचोली, थिवी, मये, सावर्डे, केपे, कुडचडे, सांगे येथे ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. भाजपची सत्ता गेली १० वर्षे आहे. या काळात भाजपने खाणप्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन देऊनसुद्धा खाणप्रश्‍न सोडविली नाही. त्यामुळे हे मतदान सत्ताधारी भाजपला झाले की विरोधी पक्षाला झाले हे निवडणूक निकालानंतर कळणार आहे.

राज्यातील नागरिकांचे पणजी आणि साखळी मतदारसंघांच्या निवडणूक निकालाकडे जास्त लक्ष लागून आहेत. या दोन मतदारसंघांतील निवडणूक निकालाची जास्त प्रमाणात चर्चा केली जात आहे. पणजी मतदारसंघातून दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर निवडणूक रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांच्यासमोर अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांनी आव्हान उभे केले आहे. या पणजी मतदारसंघात भाजप, कॉंग्रेस आणि अपक्ष उत्पल पर्रीकर यांच्यात चुरशीची लढत झाली आहे.

साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात कॉँग्रेस व इतर राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासमोर कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार धर्मेश सगलानी यांनी आव्हान उभे केले आहे. मात्र मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय होण्याचा दावा केला आहे.
मांद्रे मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. याही मतदारसंघातील चौरंगी लढत अटीतटीची झाली आहे.

सांगे मतदारसंघाच्या निवडणूक निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहेत. सांगे मतदारसंघात भाजप महिला विभागाच्या माजी उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची पत्नी सावित्री कवळेकर यांनी भाजपचे उमेदवार सुभाष फळदेसाई यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघातून कॉँग्रेसच्या उमेदवारीवर माजी आमदार प्रसाद गावकर निवडणूक रिंगणात आहेत.

कळंगुट मतदारसंघातील निकालाकडेही उत्सुकतेने पाहिले जात आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन कॉँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या मायकल लोबो यांच्यासमोर भाजप, आप आणि तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघात चुरशीची बहुरंगी लढत झाली आहे.

फोंडा तालुक्यातील प्रियोळ आणि फोंडा या मतदारसंघांतील निवडणूक निकालाकडे लोक चिकित्सकपणे पाहत आहेत. अनेक तर्क-वितर्क वर्तवत आहेत. फोंडा मतदारसंघात भाजपचे रवी नाईक यांच्यासमोर मगोपचे केतन भाटीकर, कॉँग्रेसचे राजेश वेरेकर आणि अपक्ष संदीप खांडेपारकर यांनी आव्हान उभे केले आहे. मतविभागणीमुळे कुणाचा विजय होईल हे येणारा काळच ठरवील.
प्रियोळ मतदारसंघात भाजपचे गोविंद गावडे यांच्यासमोर मगोपचे दीपक ढवळीकर आणि अपक्ष संदीप निगळ्ये यांनी आव्हान उभे केले आहे. या चुरशीच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल हे सांगता येत नाही.

काणकोण मतदारसंघात भाजपचे रमेश तवडकर यांच्यासमोर माजी आमदार, माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी आमदार विजय पै खोत आणि कॉँग्रेसचे जर्नादन भंडारी यांनी आव्हान उभे केले आहे. या चौरंगी लढतीच्या निकालाची चर्चा जोरात सुरू आहे.
राज्यातील विद्यमान आमदार आणि आमदारकीचा राजीनामे दिलेले ३७ जण यावेळी निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील कितीजण पुन्हा निवडणूक येतील आणि कोणाच्या पदरी निराशा पडेल हे सांगता येत नाही.

विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे, पांडुरंग मडकईकर हे निवडणूक रिंगणात नाहीत. मावळत्या विधानसभेतील माजी आमदार लुईझिन फालेरो यांनी अखेरच्या क्षणी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. तृणमूल कॉँग्रेस पक्षाने फालेरो यांना फातोर्डा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली होती.

गोव्यात गेली पाच दशके आमदार म्हणून कार्यरत असलेले माजी मुख्यमंत्री, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यावेळी निवडणूक रिंगणात उतरले नाहीत. ज्येष्ठ राणे यांची निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा होती. तथापि, राणे यांच्या पारंपरिक पर्ये मतदारसंघात भाजपने राणे यांची सून डॉ. दिव्या राणे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीमुळे कुटुंबामध्ये संघर्ष होण्याची शक्यता असल्याने ज्येष्ठ राणे यांनी विधानसभा निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले. भाजप सरकारने प्रतापसिंह राणे यांना कायमस्वरूपी कॅबिनेट दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. पर्ये मतदारसंघातील मतदार भाजप उमेदवार दिव्या राणे यांचा आमदार म्हणून स्वीकार करतात की नाही, याचे उत्तर निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या पत्नी जेनिता मडकईकर निवडणूक रिंगणात आहेत. यावेळी कुंभारजुवा मतदारसंघात चौरंगी लढत झाली आहे.
सासष्टी आणि बार्देश तालुक्यांत कोण बाजी मारतो याबाबत चर्चा जोरात चालू आहे. भाजपमध्ये गेली कित्येक वर्षे कार्यरत असलेले मायकल लोबो यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बार्देशमधील मतदारसंघात कॉँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. माजी आमदार लोबो यांच्या प्रयत्नांना यश मिळते की नाही या प्रश्‍नाचे उत्तर निवडणूक निकालानंतर मिळणार आहे. सासष्टीमध्ये भाजपला जास्त यश मिळत नाही. यावेळी भाजपने सासष्टी तालुक्यातील सर्व मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. मडगावमध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि भाजपचे उमेदवार उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांच्यात लढत होत आहे. फातोर्ड्यामध्ये गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि भाजपचे दामोदर नाईक यांच्यातील लढतीकडे लक्ष लागले आहे. सासष्टीमध्ये भाजपला कसा प्रतिसाद मिळतो हेही औत्सुक्याचे ठरेल आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सासष्टीमध्ये भाजपचा प्रचार करण्यासाठी मिशन सालसेत राबविले होते. या निवडणुकीत मिशन सालसेत हाती घेण्यात आलेले नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीत पाच दाम्पत्ये निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील किती दाम्पत्ये निवडून येतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहेत. भाजपने राणे आणि मोन्सेरात दाम्पत्याला उमेदवारी दिली आहे. कॉँग्रेसने लोबो दाम्पत्य, तर तृणमूल कॉँग्रेसने कांदोळकर दांम्पत्याला उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, तर त्यांची पत्नी सावित्री कवळेकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे.

राज्यातील निवडणूक प्रचार समाप्त झाल्यानंतर दिल्ली येथील एका हिंदी चॅनेलने उमेदवारांचे स्टिंग ऑपरेशनबाबतचे वृत्त प्रसारित केल्याने खळबळ उडाली. कॉँग्रेसचे तीन आणि तृणमूल कॉँग्रेसचा एक उमेदवार पैसे घेऊन पक्षांतर करण्यासाठी तयार असल्याचे या चॅनेलने म्हटले आहे. या वृत्ताला कॉँग्रेस आणि तृणमूल कॉँग्रेसने आक्षेप घेऊन निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. उत्तर गोवा निवडणूक अधिकार्‍यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

यावेळी सत्ताधारी भाजपने २२ पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा केला आहे, तर प्रमुख विरोधी कॉँग्रेस पक्षाने कॉँग्रेस आघाडीला २६ जागा मिळतील असा दावा केला आहे. राजकीय पक्षांनी बहुमताचा कितीही दावा केला तरी या निवडणुकीत एकंदर राजकीय परिस्थिती पाहता कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण आहे. काही मतदारसंघांत अपक्ष उमेदवार बाजी मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापनेमध्ये अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष भाजप आणि कॉँग्रेसच्या नेत्यांनी सरकार स्थापनेसाठी अपक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रमुख राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढविली असली, तरी भाजपमधील काही नेते मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न करू लागले आहेत. कॉँग्रेसचे मायकल लोबो यांनीही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे जाहीर केले आहे.