>> एक्सआरआयएसएम आणि एसएलआयएम यानाचे यशस्वी प्रक्षेपण
भारतानंतर जपानने देखील त्यांची चांद्रमोहीम हाती घेतली असून, काल जपानच्या यानाचे यशस्वी प्रक्षेपण देखील झाले. काल सकाळी 8 वाजून 42 मिनिटांनी या यानाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. दरम्यानख भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने जपानला त्यांच्या चांद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी शुभेच्छा दिल्या.
गुरुवारी सकाळी जपानने त्यांचे एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (एक्सआरआयएसएम) आणि स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (एसएलआयएम) या चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. जपानच्या तानेगाशिमा अंतराळ संस्थेतून या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. व्हीकल क्रमांक 47च्या माध्यमातून हे यान प्रक्षेपित झाले.
याविषयी माहिती देताना जपानच्या अंतराळ संस्थेने म्हटले आहे की, प्रक्षेपण हे व्यवस्थितपणे आणि योजनेनुसार झाले. लाँच व्हेईकलद्वारे योग्य वेळेत यान प्रक्षेपित करण्यात आले. प्रक्षेपणानंतर 14 मिनिटे 9 सेकंदांनी एक्सआरआयएसएम लाँच व्हेइकलपासून वेगळे झाले. त्यानंतर जवळपास 47 मिनिटे 33 सेकंदांनी एसएलआयएम देखील यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले.
या यशाबद्दल इस्रोने जपान अभिनंदन केले आहे. चांद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी जपानचे अभिनंदन. जागतिक अंतराळच्या क्षेत्रासाठी हा खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे. आम्ही जपानच्या संपूर्ण अंतराळ संस्थेच्या टीमचे अभिनंदन करत आहोत, असे इस्रोने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, भारताने 14 जुलै रोजी चांद्रयान -3 प्रक्षेपित केले. त्यानंतर रशियाने 10 ऑगस्ट रोजी त्यांचे चांद्रयान चंद्रावर पाठवले. पण चंद्रावर उतरण्याआधीच रशिया चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले, तर भारताचे चांद्रयान हे नियोजित वेळेत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झाले. त्यामुळे आता जपानचे यान देखील यशस्वीरित्या चंद्रावर उतरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर जपानच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष आता लागून राहिले आहे.