आता ‘आयपीएल’चा थरार!!!

0
2
  • सुधाकर रामचंद्र नाईक

बहुचर्चित तथा बहुप्रतीक्षित ‘इंडियन प्रीमियन लीग’च्या (टाटा आयपीएल 2025) अठराव्या पर्वाचा प्रारंभ येत्या शनिवार दि. 22 रोजी गतविजेता ‘कोलकाता नाइट रायडर्स’ आणि ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ यांमधील शुभारंभी लढतीने कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. देशभरातील अव्वल तेरा स्टेडियम्सवर रंगणाऱ्या या वलयांकित प्रतियोगितेचा अंतिम सामनाही ईडन गार्डन्स स्टेडियमवरच दि. 25 मे रोजी होईल. भारतीयक्रिकेट नियामक मंडळ आयोजित ‘आयपीएल’ म्हणजे क्रिकेट-विश्वातील ही सर्वात मोठी टी-20 प्रतियोगिता तथा लोकप्रिय क्रिकेट महोत्सवच आहे. क्रिकेट-विश्वातील ही श्रीमंत प्रतियोगिता असून देशी-विदेशी क्रिकेटपटूंसाठी मोठा ‘धनकुंभ’ ठरलेली आहे. भारतीय खेळाडूंसाठी तर हा आपले नैपुण्यकौशल्य प्रगटविण्यासाठीचा बहुमूल्य, नामी मंच ठरलेला आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये ‘आयपीएल’ ही केवळ क्रिकेट प्रतियोगिता नव्हे तर एक वार्षिक पारंपरिक उत्सव-महोत्सव मानला जातो आणि तो अधिकाधिक रंगतदार बनविण्यासाठी देशी खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विदेशी खेळाडूंच्या खांद्याला खांदा भिडवीत आपले क्रिकेटगुण उजळविण्यात धन्यता मानतात. ‘आयपीएल’सारख्या बहुमूल्य मंचाचा योग्य वापर करीत अनेक नैपुण्यकुशल खेळाडूंनी आपले नाणे खणखणीत असल्याचे दर्शवीत राष्ट्रीय संघात स्थान मिळविलेले आहे. द्रुतगती जसप्रीत बुमराह, फिरकीपटू यजुर्वेंद्र चहल, अष्टपैलू हार्दिक पांड्या, यष्टिरक्षक ऋषभ पंत, श्रेयश अय्यर आदींसह अनेक क्रिकेट-स्टार ‘आयपीएल’ने भारताला दिलेले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2008 मध्ये सुरू केलेल्या या प्रतियोगितेच्या शुभारंभी वर्षी आठ संघांचा सहभाग होता आणि ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वार्नच्या नेतृत्वाखालील ‘राजस्थान रॉयल्स’ने प्रतिष्ठेचा आयपीएल चषक उंचावण्याचा बहुमान मिळविला होता. काही वर्षांपूर्वी उद्भवलेल्या ‘कोरोना’सारख्या ‘मृत्युप्रपाता’वरही मात करीत ‘बीसीसीआय’ने गेली सतरा वर्षे ही प्रतियोगिता अखंडितपणे जारी राखली असून क्रिकेटपटू, सहयोगी प्रशिक्षक-मार्गदर्शक तथा सहयोगी साथी आणि विशेष म्हणजे क्रिकेटप्रेमींनीही तेवढीच मोलाची साथ देत या उत्सवाची शान कायम राखलेली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे 2009 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि 2020, 2021 मध्ये संयुक्त अरब अमिरातमध्येही ही प्रतियोगिता यशस्वीपणे रंगलेली आहे.

विद्यमान प्रतियोगितेत दहा संघ भाग घेत असून पाच वेळचा विजेता ‘चेन्नई सुपर किंग्ज’, तीन वेळचा विजेता ‘कोलकाता नाइट रायडर्स’, ‘पंजाब किंग्ज’, ‘राजस्थान रॉयल्स’ आणि ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ यांचा समावेश ‘अ’ गटात, तर पाच वेळचा विजेता ‘मुंबई इंडियन्स’, ‘दिल्ली कॅपिटल्स’, ‘गुजरात टायटन्स’, ‘लखनौ सुपर जायंट्‌‍स’ आणि ‘सनरायझर्स हैदराबाद’ यांचा समावेश ‘ब’ गटात आहे. उभय गटांतील संघ एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळतील, तर दुसऱ्या गटातील संघाविरुद्ध एकेक सामना खेळतील. गटपातळीअखेर चार संघ ‘प्ले-ऑफ्‌‍स’साठी पात्र ठरतील. पहिल्या दोन संघांत ‘क्लालिफायर वन’ मुकाबला होईल आणि विजेता संघ थेट अंतिम फेरीत धडकेल. तिसऱ्या व चौथ्या संघात ‘एलिमिनेटर’ लढत होईल. यातील विजेता संघ पहिल्या क्वालिफायरमधील संघाविरुद्ध खेळेल आणि यातील विजेता अंतिम फेरीतील दुसरा संघ ठरेल. दि. 25 रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर अजिंक्यपदाचा मुकाबला होईल. विद्यमान प्रतियोगितेतील लढती तेरा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियम्सवर खेळविण्यात येणार आहेत. ईडन गार्डन्स कोलकाता, राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद, एम. एम. चिदंबरम्‌‍ स्टेडियम चेन्नई, डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए स्टेडियम विशाखापट्टणम, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, बरसपारा क्रिकेट स्टेडियम गुवाहाटी- आसाम, वानखेडे स्टेडियम मुंबई, एम. ए. चिदंबरम्‌‍ स्टेडियम बंगळुरू, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम लखनौ, न्यू पीसीए स्टेडियम चंडिगढ, स्वामी मानसिंग स्टेडियम जयपूर, अरुण जेटली स्टेडियम दिल्ली आणि हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियम धरमशाला या तेरा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियम्सवर हे मुकाबले रंगतील.

20 षटकांच्या या ‘इन्स्टंट क्रिकेट’मध्ये चौकार-षटकारांचा ‘पाऊस’ अनुभवायला मिळतो. तसेच प्रभावी तेज गोलंदाजी आणि जादुई फिरकी गोलंदाजीचेही यथार्थ दर्शन घडते. अन्‌‍ त्याचमुळे आतापर्यंत अनेक विक्रमांची नोंद झालेली आहे. ‘सुपर ओव्हर्स’चा थरारही वेळोवेळी पाहायला मिळालेला आहे. 2008 मधील पहिल्या प्रतियोगितेच्या शुभारंभी मुकाबल्यात ‘कोलकाता नाइट रायडर्स’च्या ब्रॅडन मॅकलमने 73 चेंंडूंत 158 धावा तडकावल्या आणि ही अचाट खेळी क्रिकेटप्रेमींच्या मनात कायम कोरली गेली. 2013 मध्ये ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’च्या ख्रिस गेलने 66 चेंडूंत नाबाद 175 धावा फटकावल्या. ही ‘आयपीएल’मधील आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी होय. गेलने एका सामन्यातील 17 षटकारांसह एकूण 357 षटकार फटकावण्याचा भीमपराक्रमही या प्रतियोगितेत केलेला आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 252 सामन्यांत 8 शतकांसह सर्वाधिक 8004 धावा नोंदल्या आहेत. विराटने 2016 मध्ये चार शतकांसह 973 धावा नोंदल्या होत्या. भारतीय फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने सर्वाधिक 206 बळी मिळविले आहेत.

‘मुंबई इंडियन्स’ (2013, 2015, 2017, 2019, 2020), ‘चेन्नई सुपर किंग्ज’ (2010, 2011, 2018, 2021, 2023) यांनी प्रत्येकी पाच वेळा, तर गतविजेता ‘कोलकाता नाईट रायडर्स’ने (2012, 2014, 2024) तीन वेळा अजिंक्यपदावर मोहोर उमटविलेली असून ‘राजस्थान रॉयल्स’ (2008), ‘डेक्कन चार्जर्स हेदराबाद’ (2009), ‘सनरायझर्स हैदराबाद’ (2016) आणि ‘गुजरात टायटन्स’ (2022) यांनी प्रत्येकी एकेकदा विजेतेपदाचा बहुमान मिळविला आहे. गेल्या सतरा वर्षांच्या या कालखंडात ‘चेन्नई सुपर किंग्ज’, ‘मुंबई इंडियन्स’, ‘दिल्ली डेयर डेविल्स’, ‘डेक्कन चार्जर्स’, ‘दिल्ली कॅपिटल्स’, ‘कोलकाता नाइट रायडर्स’, ‘पंजाब किंग्स’, ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’, ‘राजस्थान रॉयल्स’, ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’, ‘सनरायझर्स हैदराबाद’, ‘कोची टस्कर्स केरळ’, ‘पुणे वॉरियर्स इंडिया’, ‘गुजरात लायन्स’, ‘रायझिंग पुणे सुपर जायंट्स’, ‘लखनौ सुपर जायंट्‌‍स’, ‘गुजरात टायटन्स’ आदी सतरा संघांचा सहभाग होता; पण अधूनमधून काही संघ गळाले. 2009 मधील विजेता ‘डेक्कन चार्जर्स’ 2008 ते 2012 अशी पाच वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर बदलला व त्याची जागा ‘सनरायझर्स हैदराबाद’ने घेतली, ‘दिल्ली डेयर डेविल्स’ची जागा ‘दिल्ली कॅपिटल्स’ने तर ‘किंग्ज इलेव्हन’ची जागा ‘पंजाब किंग्ज’ने घेतली. ‘रायझिंग पुणे सुपर जायंट्स’ 2016 आणि 2017 अशा दोन पर्वात, तर ‘कोची टस्कर्स केरळ’ एका पर्वात खेळला. ‘मुंबई इंडियन्स’, ‘कोलकाता नाइट रायडर्स’, ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’, ‘पंजाब किंग्ज’ आणि ‘दिल्ली’ हे पाच संघ ‘आयपीएल’च्या आतापर्यंतच्या पर्वात नियमित सहभागी असून ‘चेन्नई सुपर किंग्ज’ आणि ‘राजस्थान रॉयल्स’ यांना 2016 आणि 2017 अशी दोन वर्षे निलंबनामुळे स्पर्धेबाहेर राहावे लागले होते.

विक्रमी बोली
‘इंडियन प्रीमियर लीग’ ही क्रिकेट-विश्वातील सर्वात धनदांडगी प्रतियोगिता असून सुमारे दोनेक महिने चालणाऱ्या या प्रतियोगितेत क्रिकेटपटूंवर जणू ‘धनवर्षाव’ होत असतो. वार्षिक लिलावात दर्जेदार खेळाडूंसाठी भल्या मोठ्या बोली लागताना दिसतात. यंदाच्या लिलावात भारतीय यष्टिरक्षक तथा डावखुरा बेधडक फलंदाज ऋषभ पंतला ‘लखनौ सुपर जायंट्‌‍स’ने रु. 30 कोटींच्या विक्रमी बोलीवर घेतले. एवढेच नव्हे तर कर्णधारपदाची धुराही त्याच्यावर सोपविली. केवळ पंतांनाच ही लॉटरी लागली नाही तर सुमारे विसेक जणांना दहा कोटींहून अधिक बोली लागली. विजेत्या ‘कोलकाता नाइट रायडर्स’चा कर्णधार श्रेयस अय्यरला ‘पंजाब किंग्ज’ने रु. 26.75 कोटींच्या बोलीवर घेतले. भारताच्या या उमद्या क्रिकेटपटूंनी याआधीच सर्व विक्रम मोडताना 2024 मध्ये 24.75 कोटींची बोली लाभलेला ऑस्ट्रेलियन द्रुतगती मिशेल स्टार्कला मागे टाकले. विद्यमान पर्वात अष्टपैलू वेंकटेश अय्यरला ‘कोलकाता नाइट रायडर्स’ने 23.75 कोटींच्या बोलीवर घेतले, तर गोलंदाजीत युवा द्रुतगती अर्शदीप सिंग आणि फिरकीपटू यजुर्वेंद्र सिंह यांना ‘पंजाब किंग्ज’ने प्रत्येकी रु. 18 कोटींच्या बोलीवर घेतले. अष्टपैलू खेळाडू हा क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाचा घटक असतो. आपल्या फलंदाजी वा गोलंदाजी या गुणकौशल्यावर कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटविण्याची, विजयश्री खेचून आणण्याची धमक त्याच्यात असते, आणि याच तत्त्वावर टीम इंडियाच्या शुभारंभी टी-20 विश्वचषक अजिंक्यपदात महत्त्वपूर्ण योगदान दिलेला भारतीय अष्टपैलू युवराज सिंह ‘आयपीएल’च्या या लिलाव बोलीत प्रारंभी अग्रेसर क्रिकेटपटू होता. 2014 मध्ये ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ने रु. 14 कोटी आणि 2015 मध्ये ‘दिल्ली डेयर डेविल्स’ने रु. 16 कोटींच्या बोलीवर त्याला घेतले होते. विदेशी खेळाडूंत इंग्लंडचा अष्टपैलू बेंन स्टोक्‌‍सला 2017 मध्ये ‘रायझिंंग पुणे सुपरजायंट्‌‍स’ने रु. 14.50 कोटींच्या बोलीवर, तर 2020 मध्ये ‘कोलकाता नाइट रायडर्स’ने ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्सला रु. 15.50 कोटींच्या बोलीवर घेतले होते. ‘आयपीएल’मध्ये मिळणाऱ्या भरघोस मानधनामुळे विदेशी खेळाडू या स्पर्धेत खेळण्यास उत्सुक असतात. एवढेच नव्हे तर काही राष्ट्रीय संघाच्या प्रतियोगितांनाही बगल देतात. न्यूझिलंडच्या डेवॉन कौनवे, लॉकी फर्ग्युसन, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र आणि मिशेल सॅटनर यांनी तर ‘आयपीएल’साठी पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून अंग काढून घेतलेले आहे.
टीम इंडियाने नुकत्याच झालेल्या ‘चँपियन्स लीग 2025’चे अजिंक्यपद पटकावले असल्याने ‘टाटा आयपीएल’ला खास आकर्षण प्राप्त झालेले आहे. इंडियन प्रीमियर लीगचा आजवरचा एकंदर यशस्वी प्रवास पाहता अठराव्या पर्वाचाही थरार आसमंत दुमदुमवील अशी आशा बाळगूया.

बॉक्स

‘आयपीएल’मधील ‘टॉप टेन’ महागडे खेळाडू
क्रिकेटपटू बोली फ्रँचाइज पर्व

  • ऋषभ पंत रु. 27.00 कोटी लखनौ सुपर जायंट्‌‍स 2025
  • श्रेयश अय्यर रु. 26.75 कोटी पंजाब किंग्ज 2025
  • मिशेल स्टार्क रु. 24.75 कोटी कोलकाता नाइट रायडर्स 2024
  • वेंकटेश अय्यर रु. 23.75 कोटी कोलकाता नाइट रायडर्स 2025
  • पॅट कमिन्स रु. 20.25 कोटी सनरायझर्स हैदराबाद 2024
  • सॅम करन रु. 18.50 कोटी पंजाब किग्ज 2023
  • अर्शदीप सिंग रु. 18.00 कोटी पंजाब किंग्ज 2025
  • यजुर्वेंद्र सिंह रु. 18.00 कोटी पंजाब किंग्ज 2025
  • कॅम़ेरून ग्रीन रु. 17.50 कोटी मुंबई इंडियन्स 2023
  • बेन स्टोकस रु. 16.25 कोटी चेन्नई सुपर किंग्ज 2023

बॉक्स

आयपीएल विजेते उपविजेते
2008 राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग्ज
2009 डेक्कन चार्जर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
2010 चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स
2011 चेन्नई सुपर किंग्ज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
2012 कोलकाता नाइट रायडर्स चेन्नई सुपर किंग्ज
2013 मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज
2014 कोलकाता नाइट रायडर्स किंग्ज इलेव्हन पंजाब
2015 मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज
2016 सनरायझर्स हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
2017 मुंबई इंडियन्स रायझिंग पुणे सुपरजायंट्‌‍स
2018 चेन्नई सुपर किंग्ज सनरायझर्स हैदराबाद
2019 मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज
2020 मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स
2021 चेन्नई सुपर किंग्ज कोलकाता नाइट रायडर्स
2022 गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स
2023 चेन्नई सुपर किंग्ज गुजरात टायटन्स
2024 कोलकाता नाइट रायडर्स सनरायझर्स हैदराबाद

पाच नामवंत खेळाडूंची अनुपस्थिती
विद्यमान पर्वातील लिलावात ऋषभ पंतला मिळालेल्या 27 कोटी रुपयांच्या बोलीने नवा विक्रम स्थापित केला. त्याचबरोबर काही अनुभवसंपन्न खेळाडूंना डावलण्यात आले, तर काहींनी संन्यास घेतल्याने ‘आयपीएल’च्या 18 व्या पर्वात ते दिसणार नाहीत. ‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वात यशस्वी विदेशी क्रिकेटपटूंमधील एक ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नरला विद्यमान पर्वात कुणी लिलावात उचलले नाही. आणखी एक ऑस्ट्रेलियन कॅमेरून ग्रीनही या पर्वात नसेल. अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि विस्फोटक सलामीवीर पृथ्वी शॉ यांच्याकडेही फ्रँचाइजनी कानाडोळा केला आहे, तर ‘गब्बर’ शिखर धवन याने संन्यास जाहीर केल्याने या पर्वात तो खेळू शकणार नाही.

पाच संघांना नवे कर्णधार
विद्यमान पर्वात पाच संघ/फ्रँचाइजनी नवीन कर्णधार निवडले आहेत. ‘दिल्ली कॅपिटल्स’ने अखेर अष्टपैलू अक्षर पटेलकडे नेतृत्वाची धुरा सोपविली. सर्वाधिक बोली लाभलेला ऋषभपंत ‘लखनौ सुपर जायंट्स’ची, श्रेयस अय्यर ‘पंजाब किंग्ज’ची, रजत पटीदार ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ची, तर अजिंक्य रहाणे गतविजेत्या ‘कोलकाता नाइट रायडर्स’च्या कर्णधारपदाची जबाबदारी वाहील. हार्दिक पांड्या (‘मुंबई इंडियन्स’), शुभमन गिल (‘गुजरात टायटन्स’), संजू सॅमसन (‘राजस्थान रॉयल्स’) आणि ऋतुराज गायकवाड (‘चेन्नई सुपर किंग्ज’) यांनी कर्णधारपद राखले आहे. ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्स हा विद्यमान पर्वातील एकमेव विदेशी कर्णधार असून उपविजेत्या ‘सनरायझर्स हैदराबाद’ने त्याच्यावरच विश्वास टाकलेला आहे.