आणखी दोन वर्षांनंतर गोव्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागा रिक्त राहणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केला.
‘केअर्स’ योजनेखाली राज्यातील 442 विद्यालयात कोडिंग व रोबोटिक्सचे शिक्षण चालू करण्यात आलेले असून, त्याचा फायदा राज्यातील 65 हजार विद्यार्थ्यांना झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 2024-25 या वर्षी 10 हजार विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. हे शिक्षण घेतलेले विद्यार्थी पुढील दोन वर्षांच्या काळात मोठ्या संख्येने अभियांत्रिकी शिक्षण घेण्यास पुढे येतील. त्यामुळे त्यानंतर राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागा रिक्त राहणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
कोडिंग व रोबोटिक्स शिक्षणात चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले.