२१४ जण सेवेत कायम; मंत्र्यांची माहिती
अर्धवेळ संगीताचे शिक्षण देणार्या २१४ जणांना पूर्ण वेळ नोकर्यांमध्ये रुजू करून घेतले असून आणखी ५०० पदे तयार करणार असल्याची माहिती कला आणि संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी काल विधानसभेत दिली. या शिक्षकांचा वापर साखळी येथील रवींद्र भवनातही करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
साकवाळ येथील रवींद्र भवनाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही मांद्रेकर यांनी यावेळी सांगितले. जीएस आयडीसीने हा प्रकल्प सरकारच्या ताब्यात दिल्यानंतर रवींद्र भवनाचे काम करणे शक्य आहे त्यावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तियात्रिस्तांकडून हमीपत्र घेण्याच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. कला क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना क्रीडा खात्याच्या योजनेप्रमाणे गुण देणे शक्य आहे की नाही, यावर विचार करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले. बायणा येथील रवींद्र भवनातील खुर्च्या निकृष्ठ दर्जाच्या असल्यास जीएसआयडीची चौकशी करण्याचे आश्वासन मांद्रेकर यांनी कार्लूस आल्मेदा यांच्या एका मुद्यावर दिले.