>> एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिली माहिती
युद्धग्रस्त युक्रेनमधून सहा गोमंतकीय विद्यार्थी काल गोव्यात परतले असल्याची माहिती गोवा एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिली. आणखी एक विद्यार्थी प्रवासात असून, तोही गुरुवारी मायदेशी भारतात पोहोचेल, अशी माहिती देखील त्यांनी काल दिली. युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरू केली असून, त्या अंतर्गत विमानांद्वारे विद्यार्थ्यांना भारतात आणले जात आहे.
गोवा एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १९ गोमंतकीय विद्यार्थी युक्रेनला शिक्षणासाठी गेले होते. त्यापैकी ६ जण काल सुरक्षितरित्या गोव्यात पोहोचले. एक विद्यार्थी विमान प्रवासात असून, तो गुरुवारपर्यंत भारतात पोहोचेल. अन्य दोघे गोमंतकीय विद्यार्थी रोमानिया येथे पोहोचले असून, ते विमानाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच तिघेजण हंगेरीमध्ये पोहोचले आहेत, तर एक विद्यार्थी पोलंडमध्ये पोहोचला आहे. हे सर्वजण आता विमानाच्या प्रतीक्षेत असून, तेही लवकरत भारतात परततील.
दोघे विद्यार्थी खारकीव्हमध्ये असून, ते शेजारील देशाच्या सीमेकडे वाटचाल करणार आहेत. तसेच १ विद्यार्थी सुमी भागात असून, तोही सीमेकडे प्रवास करत आहेत. आणखी तिघे विद्यार्थी सीमेकडे प्रवास करत आहेत; मात्र त्यांचे नेमके ठिकाण समजू शकलेले नाही, अशी माहिती देखील नरेंद्र सावईकर यांनी दिली.
युक्रेनमध्ये शिक्षण घेणार्या गोमंतकीय विद्यार्थ्यांपैकी केवळ रुपल गोसावी ही एकमेव विद्यार्थिनी मंगळवारी गोव्यात सुखरुप परतली होती. आता गोव्यात सुखरूप पोहोचलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दवर्ली येथील रेशल गोम्स व होंडा येथील सुधांशू सालगुडे यांच्यासह अन्य काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
भारतीयांनो, तात्काळ खारकीव्ह सोडा
>> सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय दुतावासाची सूचना
रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकून आहेत. खासकरून युक्रेनच्या खारकीव्हमध्ये ३ हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. रशियन सैन्याने खारकीव्हच्या मोठ्या भागावर ताबा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीयांनो, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीने खारकीव्ह सोडा, असे भारतीय दुतावासाने म्हटले आहे. शक्य तितक्या लवकर पिसोचिन, बेझल्युडोव्हका आणि बाबे भागाकडे निघा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
रशियाने युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र केले आहेत. युद्धाच्या सातव्या दिवशी रशियन सैन्याने खारकीव्हला लक्ष्य केले. खारकीव्हमध्ये काल २१ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती युक्रेन प्रशासनाने दिली, तर ११२ जण जखमी झाले. रशियन सैन्याने क्षेपणास्त्रांसह खारकीव्हमधील लष्कराच्या इमारतीवर हल्ला केला. तसेच बॉम्ब हल्ल्यांमुळे रहिवाशी इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय पोलीस स्थानक आणि एका रुग्णालयालाही लक्ष्य करण्यात आले.
खारकीव्ह शहराला लक्ष्य केल्यानंतर आता तेथे राहणार्या परदेशी विद्यार्थ्यांनी स्थलांतर सुरू केले आहे. खारकीव्हमधून विद्यार्थ्यांच्या झुंडी चालत सुरक्षित स्थळी जाण्यासाठी निघाल्या आहेत. उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून युक्रेनमध्ये शिकण्यासाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांना जीवासोबत भवितव्याचीही चिंता आहे.
आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
पंजाबमधील बर्नाला येथील चंदन जिंदाल या विद्यार्थ्याचा मेंदू पक्षाघातामुळे युक्रेनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. २ फेब्रुवारीच्या रात्री मेंदू पक्षाघातामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ४ फेब्रुवारीला डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली, मात्र तो कोमात गेला. त्यानंतर काल त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. कुटुंबीयांनी भारत सरकारकडे चंदनचा मृतदेह भारतात आणण्याची मागणी केली आहे. चंदनची काळजी घेण्यासाठी युक्रेनला गेलेले त्याचे वडील शिशन जिंदाल हेही तेथे अडकून पडले आहेत.