राज्य सरकारच्या नगरनियोजन खात्याने प्रादेशिक आराखडा 2021 मध्ये फळबागा, भातशेती, क्रीडा मैदानासाठी राखीव ठेवण्यात आलेली पाच ठिकाणची सुमारे 4906 चौरस मीटर जमीन सेटलमेंट झोनमध्ये बदलली आहे.
नगरनियोजन खात्याचे मुख्य नगरनियोजक (प्रशासन आणि नियोजन) राजेश नाईक यांनी पाच जमिनींच्या झोनची सुधारणा अधिसूचना जारी केली आहे. राज्यातील प्रादेशिक आराखडा 2021 मध्ये फळबागा, भातशेती आदींसाठी राखीव जमीन टीसीपी कलम 17 (2) अंतर्गत झोन सुधारणांच्या माध्यमातून सेटलमेंट झोन खाली आणण्याचे काम जोमाने सुरू आहे.
थिवी येथील फळबाग म्हणून नोंद असलेली 1743 चौरस मीटर आणि 840 चौरस मीटर जमीन टीसीपीच्या 17 (2) अंतर्गत प्रक्रिया करून सेटलमेंट झोनमध्ये आणण्यात आली आहे.
सासष्टी तालुक्यातील राय येथील शेतजमीन म्हणून नोंद असलेली 1638 चौरस मीटर आणि कुडतरी येथील 150 चौरस मीटर जमीन सेटलमेंट खाली आणण्यात आली आहे. सासष्टी तालुक्यातील सां जुझे द एरियल या गावातील क्रीडा मैदान म्हणून निश्चित केलेले 535 चौरस मीटर जमीन सेटलमेंट खाली आणण्यात आली आहे.