भारताच्या ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांचा पाकिस्तानात सध्या गूढरीत्या एकामागून एक खात्मा चालला आहे. पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर 2016 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आजवर पाकिस्तानात दडून बसलेला सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी मसूद अजहरचा साथीदार शाहीद लतीफ आणि त्याच्या भावाची नुकतीच सियालकोटमधील एका मशिदीत जवळून गोळ्या झाडून हत्या झाली. गेल्याच आठवड्यात मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदचा जवळचा साथीदार मुफ्ती कैसर फारूख याची कराचीत अज्ञात हल्लेखोराने अशाच प्रकारे हत्या केली होती. या वर्षभरात भारताच्या शत्रूंच्या अशा अनेक हत्या सातत्याने होत आल्या आहेत आणि त्याने दहशतवाद्यांची झोप उडवलेली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मारला गेलेला राजौरी हल्ल्याचा सूत्रधार रियाझ अहमद ऊर्फ अबू काश्मिरी, नाझियाबादमध्ये हत्या झालेला कारी खुर्रम शेहजाद, कराचीत मारला गेलेला मौलाना झियाउर रेहमान, अल बद्र मुजाहिद्दीनचा हस्तक सय्यद खालीद रजा, कंदाहार अपरहणकांडाचा सूत्रधार मिस्त्री झहूर इब्राहिम, कुख्यात दहशतवादी सय्यद सलाहुद्दिनचा साथीदार बशीर अहमद पीर ऊर्फ इम्तियाज आलम, खैबर पख्तुनख्वामध्ये हत्या झालेला सय्यद नूर शालोबार, अफगाणिस्तानात मारला गेलेला आयसिसच्या हिंद खुरासानचा म्होरक्या इजाज अहमद अहांगार, अशी ही यंदा एकाच पद्धतीने ठार मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ही नामावली फार मोठी आहे. इतकेच कशाला, खुद्द मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान रचणारा जमात उद दावाचा सूत्रधार हाफीज सईद यालाही कारबॉम्बद्वारे यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न लाहौरजवळच्या जौहर गावातील घराजवळ काही महिन्यांपूर्वी झाला होता. गेल्या आठवड्यात याच विषयावरील अग्रलेखात नमूद केल्याप्रमाणे केवळ पाकिस्तानात दडून राहून भारताविरुद्ध कटकारस्थाने करणारे दहशतवादीच नव्हे, तर इतर देशांत सुरक्षित राहून खलिस्तानवादाला फूस देणाऱ्यांपैकी खलिस्तान कमांडो फोर्सचा म्होरक्या परमजितसिंग पंजवारची पाकिस्तानात, तर हरदीपसिंग निज्जर आणि इतर काहींची कॅनडात हत्या झाली. ह्या सगळ्या हत्यांची पद्धत एकाच प्रकारची असल्याने त्याबाबत खरोखरच गूढ निर्माण झाले आहे. मारले गेलेले हे सगळे भारताचे शत्रू असल्याने पाकिस्तान आणि कॅनडा ह्यासंदर्भात भारताकडे बोटे दाखवत असले, तरी त्यांना तसा एकही ठोस पुरावा सादर करता आलेला नाही. ह्या हत्यांमागे स्थानिक गुंडांच्या टोळ्या असू शकतात, खुद्द आयएसआय असू शकते, किंवा दहशतवादी संघटनांमधील अंतर्गत वैमनस्यही असू शकते. यापैकी कोणीही उघडपणे ह्या हत्यांची जबाबदारी घेण्यास पुढे येणार नाही, त्यामुळे हे गूढ उकलणे तसे सोपे नाही. जमात उद दावाचा नेता हाफीज सईदचा मुलगा तल्हा ह्याने आता पित्याची जागा घेतली असल्याने त्या दहशतवादी संघटनेमध्येच अंतर्गत सत्तासंघर्ष सुरू झाला असल्याच्याही बातम्या आहेत, पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हत्या ही त्याचीही परिणती असू शकते. खलिस्तानवादी दहशतवाद्यांच्या हत्या घडविण्यात आपलाच हात असल्याचे काही गुंडांच्या टोळ्यांच्या म्होरक्यांनी स्वतःच सांगितलेले आहे. कोणामुळेही का असेना, परंतु भारताचे हे शत्रू एका मागोमाग वर चालले आहेत ही समाधानाची बाब आहे. एकेकाळी इस्रायलच्या मोसादचा जगात असा दरारा होता. म्युनिक ऑलिम्पिकवेळी इस्रायलच्या ऑलिम्पिक पथकाची अत्यंत क्रूररीत्या हत्या झाली, त्यानंतर वेगवेगळ्या देशांत दडून बसलेल्या त्या हल्लेखोरांना आणि त्यांच्या हँडलर्सना मोसादने कसे एक एक करून अगदी वेचून वेचून उडवले तो इतिहास चित्तथरारक आहे. दुर्दैवाने असा दरारा असलेल्या इस्रायलला नुकतेच हमासच्या अत्यंत क्रूर दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागले. आता त्याचा सूड घेतल्याशिवाय तो देश राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. गाझातील हमासच्या समर्थनार्थ लेबनॉन आणि सिरियातून क्षेपणास्रे डागली गेली, तर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल काल सिरियाची राजधानी दमास्कस आणि अलेप्पोच्या विमानतळांनाच लक्ष्य केले. भारताने मात्र पाकिस्तानी दहशतवादाचे चटके कित्येक दशके सोसले. शाब्दिक इशाऱ्यांपलीकडे काही घडले नाही. नरेंद्र मोदींच्या राजवटीत पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी आधी उरीमध्ये आणि नंतर पुलवाम्यात कुरापत काढल्यानंतर मात्र भारत – पाकिस्तान संबंधांना जी कलाटणी मिळाली ती कायमचीच. घरात घुसून मारण्याची भाषा तेव्हा सुरू झाली आणि आधी सर्जिकल स्ट्राईक आणि नंतर बालाकोटच्या कारवाईने हा इशारा प्रत्यक्षातही उतरला. सध्या पाकिस्तानात सुरू असलेल्या गूढ हत्यासत्राने तेथील दहशतवाद्यांची झोप उडवली आहे हे निश्चित.