आणखी एका विद्यार्थ्याला कोरोना

0
250

राज्यात दहावी व बारावी इयत्तेचे वर्ग सुरू झाल्यापासून उसगाव येथील सर्वोदय विद्यालय तसेच कुजिरा येथील मुष्टिफंड विद्यालयातील शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची घटना घडली. या घटनेनंतर काल शुक्रवारी वाळपई येथील एका विद्यालयातील एका दहावी इयत्तेच्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग होण्याची घटना घडली. त्यामुळे सदर विद्यालयाचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्वोदय, मुष्टिफंड पाठोपाठ आता वाळपई येथील विद्यालयाचेही वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या विद्यालयातील विद्यार्थी अथवा शिक्षकाला जर कोरोनाचा संसर्ग झाला तर विद्यालय बंद करावे की काय त्यासंबंधीचा निर्णय सदर विद्यालयाच्या व्यवस्थापनाने घ्यायचा आहे असे शिक्षण खात्याने दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केलेले आहे.

नववी व अकरावी इयत्तेचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत असे वृत्त असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्रकारांनी छेडले असता तसा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी स्पष्ट केले होते.