आणखी एका कोविड इस्पितळाचा विचार ः मुख्यमंत्री

0
132

>> मडगाव जिल्हा इस्पितळ कोविड केंद्र करणार नाही

दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळ कोविड केंद्र बनविण्याचा सरकारचा विचार नाही. या इस्पितळात जुन्या हॉस्पिसियुतील सर्व विभाग हलविण्यासाठी प्रयत्न असून हे पूर्ण जिल्हा इस्पितळ बनविण्यात येईल. तसेच आणखी एक कोविड इस्पितळ बनविण्याचा विचार चालू असून वैद्यकीय महाविद्यालय व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने ते बनविण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. काल त्यांनी मडगावच्या जिल्हा इस्पितळाला भेट देत अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. त्यावेळी आरोग्य सचिव नीला मोहनन, आरोग्य संचालक डॉ. आयरा आल्मेदा उपस्थित होत्या.
कोविड-१९ मुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोविड इस्पितळातील डॉ. विश्‍वजित देसाई, डॉ. आयरा तसेच इतर डॉक्टर, परिचारिकाही गेल्या चार महिन्यांपसून परिश्रम घेत आहेत. त्यांच्यावर कामाचा बोजा पडलेला आहे. २८ कर्मचार्‍यांपैकी १४ जण सोडून गेले असून. आयसियू व इतर ठिकाणी कर्मचारी हवे असून ते घेण्याची तयारी चालविली आहे. या दिवसात मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण येतात त्यांची तपासणी करून योग्य उपचार दिले पाहिजेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोविड विभागासाठी गोमेकॉत प्रयत्न
गोवा वैद्यकीय इस्पितळातील बाल व प्रसुती विभाग तेथून हलवून लगत बांधलेल्या इमारतीत नेण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच केल्याने या इस्पितळात जागा रिकामी होईल. तेथे कोविडची सोय केली जाणार आहे. कोविडसाठी खाजगी इस्पितळांनी तयारी दाखविली असती तर काम सोपे झाले असते. पण त्यांना सरकार जबरदस्ती करू शकत नाही.