आडनावे बदल गैरप्रकारांची प्रकरणे रद्द करण्याची मागणी

0
126

>> ४१९२ प्रकरणांची सखोल
चौकशी हवी

राज्यात आडनावे बदलण्यात आलेल्या ४१९२ प्रकरणांची सखोल चौकशी करून गैरप्रकार आढळून येणारी आडनावे बदलाची प्रकरणे रद्दबातल करावी, अशी मागणी अखिल गोवा भंडारी समाज संस्थेचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केली.

बिगर गोमंतकीय नागरिकांकडून ओबीसी अंतर्गत योजनांचा लाभ मिळवून घेण्यासाठी केवळ आडनाव बदलण्याचे प्रकार सुरू आहेत. आडनाव बदलणार्‍यांकडून केवळ नाईक या आडनावाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात नाव आणि आडनाव बदलण्यासंबंधी कायद्यात दुरुस्तीसाठी आवश्यक दुरुस्ती विधेयक संमत केले आहे. कायद्यात दुरुस्ती होईपर्यंत आडनाव, नाव बदलण्याचे काम बंद ठेवावे, अशी मागणी नाईक यांनी केली.

आडनाव बदलणार्‍यांकडून केवळ नाईक या आडनावाचा मोठ्या प्रमाणात वापर कशासाठी केला जातो. आडनाव बदलणारे कामत, प्रभुदेसाई, प्रभुगावकर आदी आडनावांचा स्वीकार का करीत नाहीत? याची चौकशी करण्याची गरज आहे. परराज्यातील गुन्ह्यांत अडकलेल्या व्यक्ती आडनाव बदलून येथे राहू शकतात किंवा पासपोर्ट तयार करून घेऊन परदेशात जाऊ शकतात, असेही नाईक यांनी सांगितले.
सरकारच्या समाज कल्याण खात्यकडे भंडारी समाज बांधवांचे ओबीसी प्रमाणपत्रासाठीचे ७९४३ अर्ज गेले पाच वर्षे प्रलंबित आहेत. या अर्जाची छाननी करण्यासाठी समितीची नियुक्ती करण्यात न आल्याने अर्ज प्रलंबित आहेत. तसेच ओबीसी अर्तंगत नोकर भरतीचा अनुशेष भरून काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

समाज संस्थेने नाव बदलण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रकाराची दखल घेऊन संबंधित उपनिबंधक कार्यालयाकडे संशयास्पद आडनाव बदल्याच्या प्रकाराच्या विरोधात आक्षेप नोंदविण्यास सुरुवात केली आहे, असेही नाईक यांनी सांगितले.