आठ महिन्यांत 980 मद्यपी चालकांवर कारवाई

0
10

>> वाहतूक पोलीस अधीक्षकांची माहिती

>> टिंटेड ग्लास प्रकरणी 35 हजार जणांना दंड

राज्यात जानेवारी ते ऑगस्ट 2023 या आठ महिन्यांच्या कालावधीत 980 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, गतवर्षी 795 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली होती.
वाहतूक पोलिसांकडून मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरोधातील कारवाईला गती देण्यात आली आहे. राज्य सरकारने आणखीन अल्कोमीटर उपलब्ध केल्याने कारवाईला गती प्राप्त झाली आहे. आगामी पर्यटन हंगामात सुध्दा मद्यधुंद वाहनचालकांविरोधात मोहीम सुरू ठेवली जाणार आहे. अशा प्रकरणात चालकांना दंड ठोठावला जातो, तसेच, त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना सुध्दा निलंबित करण्याची कारवाई केली जाते, असेही कौशल यांनी स्पष्ट केले.

राज्यात मागील 8 महिन्यांत जवळपास 34 ते 35 हजार वाहनचालकांवर टिंटेड ग्लासेस वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती अक्षत कौशल यांनी दिली.
पर्वरी येथे खून करण्यात आलेल्या कामाक्षी उद्दापनोवा या तरुणीचा मृतदेह एका टिंटेड ग्लास असलेल्या कारमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे नेण्यात आल्याचे समोर आले होते. याविषयी भाष्य करताना कौशल यांनी सांगितले की, पर्वरी खून प्रकरणाचा तपास सुरू आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत. संशयितांनी कुठल्या मार्गाने मृतदेह नेला याबाबत सविस्तर माहिती प्राप्त झालेली नाही. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर वाहन तपासणीमध्ये काही त्रुटी असल्याचे स्पष्ट झाल्यास आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.