>> पुढच्या वर्गात प्रवेश देणार, शिक्षण संचालकांचा निर्णय
कोरोना विषाणूंच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने १६ मार्च रोजी जारी केलेली नवी मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन शिक्षण खात्याने काल आठवी इयत्तेपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण संचालक वंदना राव यांनी काल त्यासंबंधीचा आदेश काढला. नववी, दहावी, अकरावी व बारावी इयत्तेच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असल्याचे शिक्षण खात्याने काल काढलेल्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
गोवा सरकारने शाळांना सुट्टी जाहीर केलेली असताना परीक्षा घेण्याचा निर्णय कसा काय घेतला आहे, असा प्रश्न उपस्थित करून कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड या पक्षांनी सकारवर जोरदार टीका केली होती. तसेच समाज माध्यमावरूनही लोकांनी सरकारवर टीका करताना परीक्षा देण्यासाठी एकत्र जमणार्या परीक्षार्थींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला होता.
मुख्याध्यापक संघटनेची
शिक्षण संचालकाशी चर्चा
दरम्यान, काल मुख्याध्यापक संघटनेने राज्याच्या शिक्षण संचालक वंदना राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्याध्यापक संघटनेच्या एका शिष्टमंडळाने काल राव यांची भेट घेऊन परीक्षेबाबत त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीनंतर राव यांनी फक्त नववी, दहावी, अकारावी व बारावीच्या तेवढ्या परीक्षा घेण्याचा आदेश काढला. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताही उत्तीर्ण करणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.
लष्कराचा मोठा निर्णय
नवी दिल्ली ः कोरोना व्हायरसमुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक निर्णय घेतले जात आहेत. भारतीय लष्करानेही विविध ९० प्रकारच्या प्रशिक्षणांना स्थगिती दिली आहे. लष्कराशी संबंधित प्रशिक्षण देणारे हे वर्ग आहेत. त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. लष्कराने हा मोठा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षण वर्गामध्ये जास्तीत जास्त जवान आणि अधिकार्यांचा समावेश होता. मात्र कोरोनाची दहशत लक्षात घेऊन आणि खबरदारीचा उपाय म्हणून हे ९० प्रकारचे प्रशिक्षण वर्ग पुढे ढकलण्यात आले आहेत.
पाकिस्तानात पहिला मृत्यू
कोरोना व्हायरसचा परिणाम आता युरोपसह आशिया खंडातही वाढत असून पाकिस्तानात गेल्या २४ तासांमध्ये जवळपास १३० जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. तर आत्तापर्यंत एकूण १९३ जणांना कोरोना बाधित रुग्ण झाले असून मंगळवारी सकाळी पहिल्या कोरोनग्रस्ताचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत्यू झालेली व्यक्ती ईराणहून परतली होती. पाकिस्तानमध्ये गेल्या एका आठवड्यापासून कोरोनासचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली. पहिल्या आठवड्यात ३३ रुग्ण पॉझिटिव्ह अशलचे समोर आले. तर सोमवारपासून पाकिस्तानमध्ये करोनाग्रस्तांची आकडेवारी वाढण्यास सुरूवात झाली.
मुंबईत कोरोनाचा
पहिला बळी
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी काल मुंबईत गेला असून, आणखी एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर पिंपरी-चिंचवडमधील एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. दरम्यान, दुसरीकडे, भारतात आतापर्यंत जवळपास १३७ जणांना करोनाची लागण झाली आहे.