आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात ३०%कपातीचा सरकारचा निर्णय

0
294

>> संचालक नागराज होन्नकेरी यांची माहिती

गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाने कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीपर्यंत ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती या मंडळाचे संचालक नागराज होन्नकेरी यांनी काल दिली.

या मंडळाने शैक्षणिक वर्षासाठी कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची माहिती विद्यालय प्रमुखांना एका परिपत्रकाद्वारे दिली आहे. कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर एससीईआरटीने पहिली ते आठवीपर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्यासाठी एका अभ्यास मंडळाची नियुक्ती केली होती. या अभ्यास मंडळाने चर्चा, विचारविनिमय करून ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची शिफारस केली होती. या अभ्यास मंडळाच्या शिफारशीनुसार ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, अशी माहिती एससीईआरटीचे संचालक होन्नकेरी यांनी दिली.

या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी मान्यता देण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. या शैक्षणिक वर्षासाठी वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचा परीक्षेत समावेश करू नये, असे संबंधितांना कळविण्यात आले आहे. उच्च प्राथमिक पातळीवर सर्व भाषांतील व्याकरण आणि भाषा कौशल्याचा अभ्यासक्रम कमी करण्यात आलेले नाही, असेही होन्नकेरी यांनी सांगितले. शिक्षकांनी शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला अभ्यासक्रमाचा स्वयं अभ्यास करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे. त्यांना अभ्यासामध्ये येणार्‍या अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमात २८ ते ३० टक्के कपात करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे.