आठवणीतील शाळा

0
19
  • पौर्णिमा केरकर

आज शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यातील हा जिव्हाळाच हरवलेला दिसतो. काळ्या निर्जीव फळ्याला सजीव करून लळा लावणारी शाळा माझ्या बालपणाने अनुभवली होती. संस्कार, स्वावलंबन, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, संवेदनशील भावविश्व, प्रदेश- देशाविषयीचा स्वाभिमान-अभिमानाची पेरणी करणारी माझी शाळा आजही जशीच्या तशीच आठवत आहे…मुलांचे डबे एकामागोमाग एक जोडले जात. ही रेलगाडी संपूर्ण वर्गात वर्गाबाहेर कविता तोंडपाठ होईपर्यंत, मुलांच्या मनाचे समाधान होईपर्यंत फिरायची. ऐन पावसाळ्यात गड्ड्यांचा खेळ मधल्या सुट्टीत खेळणे तर अविस्मरणीयच!

पावसाची काळजी कोणाला? हातांनीच जमिनीत छोटासा खड्डा (मिली) करून त्यात गोलाकार गड्डे घेऊन भिडूबरोबर खेळायचे. हार-जीत खेळीमेळीत व्हायची. खेळ हे निव्वळ आनंदासाठीच होते. कोणाचीही कोणाशीच स्पर्धा नाही की ईर्षा नाही. शाळेशेजारीच इरईची मोठमोठी झाडे होती. तिला बोंडे यायची. त्यात काळ्या-पांढऱ्या रंगाच्या बिया असायच्या. त्या बियांचा खेळ खेळतानाची मजा काही औरच होती. त्यातल्या त्यात सुळसुळीत, टुपटुपीत बिया सापडल्या तर त्या भटो बिया. गंमत म्हणून मग बी घट्ट जमिनीवर जोरात घासायची आणि आपला भिडू बेसावध असताना त्याला चटका द्यायचा. हा चटका जीवघेणा नव्हता. उगाच आपली बालसुलभ गंमत होती ती!
कविता असो की पाढे, ते मोठ्याने सामूहिक म्हणायचे. त्यामुळे एक वेगळी वातावरणनिर्मिती व्हायची. वर्गाची सुरुवात प्रार्थनेनेच व्हायची. गुरुजी वर्गात आले की रसरशीत आवाजात ‘एक साथ नमस्ते गुरुजी’ असे म्हणून किलकिल्या डोळ्यांनी, निरागस भावनेने गुरुजींची टेहळणी केली जायची. गुरुजींचा मूड कसा आहे यावरही वर्गाचा आनंद अवलंबून होता. नीतिमत्तेचे पाठ गुरुजी स्वतःच्या वर्तणुकीने शिकवत असत. स्वतः ‘घोडा घोडा’ बनून मुलांना पाठीवर बसवत. वर्गभर फिरणाऱ्या गुरुजींचे काळीज आईचेच तर होते.

पावसाळ्यात शाळा सुरू व्हायच्या. नेमकी हीच वेळ शेतीची. अशावेळी डोकीवर इरले घेऊन आई भाईला शाळेत पोचवायची. इरल्यात पावसाचा एक थेंब येत नसायचा. शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचे म्हणजे भरपूर गुण घ्यायचे हे समीकरण कोणाच्याही अंगवळणी पडले नव्हते. शालेय वास्तूत सरस्वती नांदते. विद्यादान करणारे शिक्षक हे आईवडिलांसमान. त्यांना दुरुत्तरे देता कामा नये. ते जे सांगतील ते ऐकायचे, त्यातून बोध घ्यायचा ही शिकवण असायची. राष्ट्रभक्ती, मातृभूमी आणि मातृभाषेवरील प्रेम, विभूती पदाला पोहोचलेल्या व्यक्तींविषयी प्रचंड आदर. परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाचे, वारशाचे जतन-संवर्धन करण्याविषयीची जागरूकता, यांची शिकवण शिक्षकांच्या उक्ती, कृती आणि उपक्रमांतून यायची. त्यामुळे एक भारलेपण त्यात होते. अभ्यासाचे कधी ओझे वाटलेच नाही. पास आणि नापास याच्यातील फरक कधी कळलाच नाही. भरपूर मैदानी खेळ आणि उत्साहाने शिक्षकांच्या सहवासातील हसत-खेळत घेतलेले शिक्षण मनावर कायमच बिंबून राहिले.

अलीकडे शिक्षणाची व्याख्याच बदलून गेलेली दिसते. प्राथमिक शिक्षणाची चौकट मुलांची वाढच खुंटवते. आई, आजी, मोठ्या बहिणीच्या कमरेवर बसून शाळेत येण्याचे दिवस कधीचेच सरून गेले आहेत. काळ झपाट्याने बदलत चालला आहे तसेच शिक्षण बदलत आहे, असा जर विचार केला तर शिक्षणातून प्राप्त होणाऱ्या संस्कारांचा आत्माच हरवलेला आहे. मुलांसाठी शाळा निवडण्याच्या प्रक्रियेपासून सर्व गोष्टीतील टापटीपपणाची चौकट शोधून त्यात आपल्या पाल्याला कोंबल्यागत शाळेत पाठवले जाते. ज्या शाळेचे नियम, अटी कडक, अति शिस्तबद्ध ती शाळा चांगली असेच ठरवले जाते. भलेही तिथे मुले आपल्या अडीअडचणी शिक्षकांना सहजपणे सांगू शकली नाहीत तरी चालेल. मुलांना शाळेत सोडण्यासाठी-आणण्यासाठी गाडी लावलेलीच असते. त्यामुळे इतर अवांतर कोणाशी बोलणं तर होत नाहीच, शिवाय त्याला स्वतःलाही शाळेचा परिसर, तिथली माणसे, इतर वर्ग याविषयीचे ज्ञान प्राप्त होत नाही.

पूर्वीच्या शाळांना कसलीच कुंपणे नव्हती. ना भाषेची, ना वर्गाची, ना विषयांची. खडू आणि पाटी असली तरी पुरेसे होते. पावसात शाळेत येताना वाटेच्या खड्ड्यातील पाण्यात जोरात पाय आपटून स्वतःला आणि आपल्या मित्रांना भिजविण्यातील तो आनंद बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार नाही. भिजलेल्या कपड्यांनी अंग पुसण्याचा तो आनंद वेगळाच होता. छत्री असली तर ती लांब लाकडी दांड्याची. तिच्यात पाच-पाच जण मिळून एकत्रित जाताना ज्याच्या हातात तिचा दांडा असायचा तो तर दांडा सारखा हलवत पावसात भिजण्याचे समाधान मिळवायचा.

शाळेची इमारत ही फक्त दगड-मातीची वास्तू नव्हती तर तो एक जिवंत जिव्हाळा होता. साचेबद्ध शिक्षण येथे नव्हते तर मुलांच्या भावविश्वाला आकार देत त्यांच्यातील आत्मविश्वास जागविण्यासाठीचे ते केंद्र होते. मुळं आत आत खोलपर्यंत जात वरचा डोलारा समर्थपणे
सांभाळणारा विशाल वटवृक्ष म्हणजे शिक्षक होते. ते विद्यार्थ्यांचा आधारवड तर होतेच, शिवाय मुलांच्या भावना-संवेदनांच्या पारंब्यांना झोके देणारे पाठीराखे बनून त्यांच्यासाठी आईवडिलांनंतर खस्ता खाणारे पालकही बनले. साने गुरुजींचा आदर्श त्यांच्यासमोर होता. समोरची विस्फारलेल्या डोळ्यांनी गुरुजींना पाहणारी इवलीशी मुले हे विद्यार्थी नव्हते तर ती त्यांची पोटची मुले होती. ही भावनाच माऊलीच्या अंतःकरणाची साक्ष द्यायची. कंपासपेटीत घालून दप्तरात लपवून आणलेली कच्ची कैरी मीठ-मसाला लावून खाताना कोणतीच प्रतिष्ठा कधी आड आली नाही की घरी आईला जेवढ्या ममतेने आपल्यातील खाऊचा वाटा देण्यातील सहजता होती, तीच सहजता गुरुजी-बाईंना कैरीची फोड देताना असायची.

आज शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यातील हा जिव्हाळाच हरवलेला दिसतो. काळ्या निर्जीव फळ्याला सजीव करून लळा लावणारी शाळा माझ्या बालपणाने अनुभवली होती. संस्कार, स्वावलंबन, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, संवेदनशील भावविश्व, प्रदेश- देशाविषयीचा स्वाभिमान-अभिमानाची पेरणी करणारी माझी शाळा आजही जशीच्या तशीच आठवत आहे…