आठवणीतले ‘ते’ दोन दिवस…

0
286
  • नागेश करमली

‘आता आणखी झोपू नका. गोवामुक्तीला प्रारंभ झाला आहे. उठा, उठा’. मी हर्षभरित झालो होतो. मी धावतच स्वयंपाकघरात गेलो व साखरेचा डबा घेऊन बाहेर आलो. आईसह सर्वांनाच साखर वाटत सुटलो. आईने स्वतःच्या हाताने चिमूटभर साखर माझ्या तोंडात टाकली. ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो तो क्षण पूर्णत्वाने अवतरला होता.

साठ वर्षांपूर्वी म्हणजे १९६२ सालचा डिसेंबर महिना उजाडला व वातावरणात एक वेगळ्याच प्रकारचा रंग भरल्यासारखे वाटू लागले. गोव्याच्या सीमेवर भारतीय लष्कराची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव होत असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर पंडित नेहरू, गोव्यातून पोर्तुगीजांची हकालपट्टी करण्यास तयार होत असल्याचा तो संकेत होता. कृष्णमेनन त्यावेळी भारताचे संरक्षणमंत्री होते. लष्करी कारवाई करून, पोर्तुगीजांच्या जोखडाखालून गोवा-दमण-दीव आता मुक्त करणार या ईर्ष्येने ते पेटले होते. त्यादृष्टीने सर्व तयारी चालली होती. अर्थात हे सर्व पंडितजींच्या अनुमतीनेच होत होते. परंतु, प्रत्यक्षात पंडितजी लष्करी कारवाईला परवानगी देण्याच्या बाबतीत थोडे मागे-पुढे होत होते. सुरुवातीला १० किंवा ११ डिसेंबरला लष्करी कारवाई करण्याचा बेत ठरला होता. परंतु अमेरिका- ब्रिटनसारख्या राष्ट्रांच्या दबावापुढे तो बेत स्थगित झाला. ही पश्‍चिमी राष्ट्रे, ‘आम्ही हा गोवामुक्तीचा प्रश्‍न सामोपचाराने सोडवण्यास मदत करू’, असे सांगत होती. कृष्णमेननचे म्हणणे होते की पोर्तुगालला सामोपचाराची भाषा समजत नाही. प्रत्यक्ष कारवाईशिवाय पोर्तुगालला वठणीवर आणता येणार नाही. राजकीय मतप्रवाह… लष्करी कारवाईला आता वेळ लावू नका अशा प्रकारे सरकारवर दडपण आणत होता. गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकही याच मताचे होते. तत्कालीन सोविएत रशियाचा याबाबतीत भारताला भक्कम पाठिंबा होता. गोवा-दमण-दीवच्या बाबतीत पंडितजींनी कोणत्याच दबावाला बळी पडू नये, असे त्यांचे मत होते.

मध्यंतरी काही दिवस असेच गेलेत. लष्करी कारवाईकडे आशाळभूतपणे पाहणार्‍या आमच्यासारख्यांमधली अस्वस्थता वाढत होती. इकडे पोर्तुगीजांची लष्करी कारवाईच्या भीतीने आवराआवर चालली होती. अनेक पोर्तुगीज अधिकार्‍यांची कुटुंबे पोर्तुगालला रवाना झाली होती. खुद्द गोव्याचे गव्हर्नर जनरल व्हास्साल-द-सिल्वा, काबचा राजनिवास सोडण्याची तयारी करीत होते. तिकडून पोर्तुगालमधून सालाझार, भारताने गोव्यात लष्कर घुसवले तर गोव्याची राखरांगोळी करा, नासधूस करा.. असे एकसारखे संदेश पाठवीत होते. वातावरण तापत चालले होते. इतक्यात १६ डिसेंबरला संदेश मिळाले की लष्करी कारवाईला सुरुवात करण्याची सज्जता अंतिम टप्प्यात आलेली असून कोणत्याही क्षणी ती सुरू होईल.

मी स्वतः त्यावेळी दूर खाणीवर माझ्या कामात मग्न होतो. पण प्रत्यक्ष कुडचडे व घरी केपेला जाऊन काय घडते ते पहावे म्हणून १७ डिसेंबरला मी केपेला आलो. बर्‍याच रात्री एका जबरदस्त स्फोटाचा आवाज ऐकून मला जाग आली. पण स्फोट कुठे झाला त्याचा अंदाज आला नाही. (मागाहून तो स्फोट पोर्तुगीजांनी दूधसागरच्या पुढे रेल्वेचा बोगदा पाडण्यासाठी केलेला स्फोट होता असे कळले.)
एकंदरीत वातावरण गंभीर बनत असल्याचे वाटत असतानाच मी पुन्हा झोपी गेलो. सकाळी १८ डिसेंबरला कधी नव्हे त्या विमानाच्या घरघराटाने मी खडबडून जागा झालो. घाईघाईने घराचा दरवाजा उघडून बाहेर आलो. तेव्हा अगदी कमी उंचीवरून आणखी काही विमाने आली व मडगाव- वास्कोच्या दिशेने पुढे गेली. मी ताडले, हा लष्करी कारवाईचा आरंभ आहे. मी लगबगीने घरात आलो आणि रेडिओ ट्यून करण्याचा प्रयत्न केला. रेडिओवर बंगाली भाषेतले वार्तापत्र होते ते. संपूर्ण वार्ता जरी मला समजली नव्हती तरी एक गोष्ट कळली होती व ती म्हणजे पोर्तुगीजांविरुद्ध लष्करी कारवाई सुरू झाली आहे. तोपर्यंत घरातील इतर मंडळी जागी झाली होती. मी म्हटले, ‘आता आणखी झोपू नका. गोवामुक्तीला प्रारंभ झाला आहे. उठा, उठा’. मी हर्षभरित झालो होतो. मी धावतच स्वयंपाकघरात गेलो व साखरेचा डबा घेऊन बाहेर आलो. आईसह सर्वांनाच साखर वाटत सुटलो. आईने स्वतःच्या हाताने चिमूटभर साखर माझ्या तोंडात टाकली. ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो तो क्षण पूर्णत्वाने अवतरला होता.
सर्वांना माहीत होते की भारतीय लष्कराचा पोर्तुगीज प्रतिकार करू शकणार नाहीत. नंतरच्या घटनांनी ते सिद्धही केले.

ज्या विमानाच्या घरघराटाने मला जाग आली होती, बहुदा तीच विमाने काही क्षणातच परतून पूर्व दिशेकडे पूर्वीपेक्षा अधिक उंचीवरून जात होती. त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी त्यांनी फत्ते करून ती परत निघाली असली पाहिजेत.
(दुसरे दिवशी कळले की भारतीय हवाईदलाच्या विमानांनी दाबोळी येथील विमानतळावरील धावपट्टी बॉंब टाकून उध्वस्त करून टाकली. त्याचप्रमाणे बांबोळी येथील पोर्तुगीज रेडिओचे ट्रान्समीटर निकामी करून टाकले).
विमाने येऊन गेल्यानंतर सुमारे आठ वाजता मी घरातून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर आलो. पाहतो तर काय? कालचे बादशहा आजचे कंगाल बनले होते. केपेच्या पूर्व भागातून तसेच सांगे महालात तैनात केलेले पोर्तुगीज सैनिक मिळेल त्या वाहनातून उंदरासारखे मडगावच्या दिशेने पळत होते. मागाहून कळले की जाता जाता त्यांनी त्यांच्याकडच्या बंदुका रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतांत, ओढ्यात, ओहोळात फेकून दिल्या होत्या. जीव असल्यास भीक मागून खाईन.. अशी त्यांची अवस्था होती. पोर्तुगीज सैनिकांची दशा पाहून असल्या पळपुट्या लोकांनी सुमारे साडेचारशे वर्षे आमच्यावर कसे राज्य केले याचेच मला राहून राहून आश्‍चर्य वाटायला लागले.

पळपुट्या पोर्तुगीज सैनिकांची ती अवस्था पाहताना मजा आली. मी तरी असले पळपुटे प्रथमच पाहत होतो. पळपुट्यांचा ‘पराक्रम’ संपल्यानंतर मुख्य रस्त्यावर आणखी कुणीही नव्हते. नेहमीच्या बसगाड्या किंवा ‘कार्रेरी’ नव्हत्या. रस्त्यावरून चालत जाणारी नेहमीची माणसेही नव्हती, कुणीही नव्हते. मी स्वतः जवळपासच्या शेजार्‍यांना भेटलो. त्यांच्या तोंडावर एक प्रकारचा भयमिश्रित आनंद दिसत होता. त्यांना लढाई झाली तर आपले कसे होईल, असे वाटत होते. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मी म्हटले, ‘‘कुठे आहे लढाई? लढण्यासाठी पोर्तुगीजांनी आणलेले सैनिक तर भित्र्या भागूबाईसारखे पळत सुटले आहेत. इतक्यात दुपारी कुणीतरी बातमी आणली की केपेच्या पुलावर मधोमध स्फोटकांनी भरलेली दोन ट्रक्स उभे करून ठेवलेले आहेत व पोर्तुगीज सैनिकांची पूल उडवून देण्याची तयारी चालली आहे. मी व माझे मित्र काय चालले आहे ते प्रत्यक्ष पाहावे म्हणून पुलाच्या दिशेने निघालो. बघतो तर पूल उडविण्याची त्यांची तयारी चालली आहे. त्यांना कुणीही अडथळा करू नये म्हणून तिथे आजूबाजूला सशस्त्र सैनिक उभे होते. पूल वाचविण्यासाठी काहीतरी करणे आम्हाला शक्य नव्हते. कारण आमच्याजवळ प्रतिकार करण्यासाठी कसलीही साधने नव्हती. सकाळी पळपुटे सैनिक पाहताना मजा आली होती आणि आता आम्ही पाहत होतो, लढाई न करता विध्वंसक कृत्यात गुंतलेल्या पोर्तुगीजांचे रूप. मी व माझे मित्र तसेच मागे परतलो.

दुपार टळून गेल्यानंतर तीन-साडेतीनच्या सुमारास मी पुन्हा एकदा घराबाहेर पडलो. जवळच माझे एक मित्र खाण-व्यावसायिक सय्यद आदम राहात होते. त्याच्याकडे गेलो. ते म्हणाले, ‘‘इतक्या लवकर पोर्तुगीजांच्या कमरेत लाथ पडेल असे वाटले नव्हते. कारण सीमेवर सैन्याची जमवाजमव केली तरी पंडित नेहरू म्हणे प्रत्यक्ष सैन्य गोव्यात घुसवायला तयार नव्हते. परंतु आता जे काही झाले आहे ते चांगलेच झाले. एकदाची पोर्तुगीजांची सद्दी संपली म्हणजे झाले’’
आमच्या गप्पा चालू असताना कुणीतरी आले व म्हणाले, ‘‘ते पूल उडविणार आहेत. लोकांनी शक्य तितक्या दूर जायचा त्यांनी इशारा दिला आहे.’’
ज्यांच्याकडे मी बसलो होतो ते आदमभाईचे घर पुलापासून बरेच दूर होते. तरीसुद्धा आम्ही थोडे सावध होऊन बसलो. सुमारे साडेचार वाजता एखादा भयंकर बॉंबस्फोट झाल्यागत गगनभेदी आवाज झाला. सगळी जमीन हादरली. मी बसलो होतो तिथून हातभर उंच उडालो व पुन्हा खुर्चीवर आपटलो. या स्फोटाचा आवाज म्हणे सुमारे १५ किलोमीटरच्या परिसरात लोकांनी ऐकला. स्फोटाने जो विध्वंस केला तो कल्पनातीत होता. पुलाजवळची अनेक घरे पडली होती. अनेकांची छपरे उडाली होती. केपे येथील पुलापासून शंभर-दिडशे मीटर असलेल्या सरकारी कचेर्‍यांची तावदाने फुटली होती. खिडक्या-दारे सताड उघडी झाली होती. दुकानातील कपाटे आडवी झाली होती. एकमेव फार्मसी होती तिची कपाटे खाली पडली होती. सार्‍या औषधांच्या बाटल्यांचा चक्काचूर झाला होता. आणि विशेष म्हणजे पुलापासून जवळच घराच्या अंगणात खेळणार्‍या एका दहा-बारा वर्षाच्या मुलावर स्फोटामुळे उडालेला एक भला मोठा पोलादी तुकडा पडून तो जागीच ठार झाला होता. पुलाच्या अलीकडे थोड्या अंतरावर जिथे आम्ही राहत होतो तिथेही छपरावरची कौले उडाली होती. काही भिंतींना भेगा पडल्या होत्या. प्रत्यक्ष युद्ध झाले नसले तरी ते झाल्यासारखीच झळ मात्र सर्वांना बसली होती.

१९ डिसेंबर उजाडला. गोव्यात काही ठिकाणी भारतीय जवानांच्या तुकड्या आदल्या दिवशीच पोचल्या होत्या. पणजीच्या पलीकडे बेतीपर्यंतचा पल्ला काही जवानांनी गाठला होता. केपेत मात्र १९ तारखेला सकाळपर्यंत कुणाचाच पत्ता नव्हता. केपे पोलीस स्टेशनवरील अधिकारी व शिपायांनी बंदुका वगैरे तिथेच टाकून पळ काढला होता. १९ला सकाळीच मी केपे बाजारात गेलो. काही लोक जमले होते. काही दुकाने बंदच होती. एक-दोन उपहारगृहे खुली होती. सर्वजण लष्करी तुकड्यांची वाट पाहात होते. लष्कराच्या गाड्या सावर्डे-कुडचडेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची बातमी आली होती.

इतक्यात काही लोक म्हणाले, चला आम्ही ध्वजवंदन करूया. परंतु कुणाकडेच तिरंगा नव्हता. स्थानिक डॉक्टर रुद्राजी (आनंद) शिरवईकर म्हणाले, ध्वज मी तयार करून घेतो. त्या तिरंग्यासाठी एका कपड्याच्या दुकानातून कपडा विकत घेतला. जवळच्याच एका शिंप्याकडून तो शिवून घेतला. कुणीतरी निळा रंग आणून त्यावर अशोक चक्र रंगविले. आणि सगळेजण पोलीस स्टेशनच्या समोर ध्वजस्तंभाजवळ जमले. डॉ. रुद्राजी म्हणाले, ‘‘ध्वजारोहण नागेशच्या हस्ते होऊ द्या. केपेतील तो ज्येष्ठ स्वातंत्र्ययोद्धा आहे.’’ सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
मी ध्वजारोहण केले. राष्ट्रगीत झाले. सर्वांनी अत्यंत उत्साहाने भारतमातेचा जयजयकार केला. लोकांमध्ये कधी नव्हे तो अमाप उत्साह संचरला होता. ध्वजवंदनानंतर कुणी कुणी दुकानातून मिठाई आणून जमलेल्यांचे तोंड गोड केले.

अकरा- साडेअकराच्या सुमारास नदीच्या उथळ पाण्यातून वाट काढीत सैनिकांची पहिली तुकडी लष्करी गाड्यांसह केपेत आली. लोकांनी तिच्यावर फुले उधळून, आरत्या दाखवून, न भूतो न भविष्यति अशा प्रकारचे त्यांचे स्वागत केले. त्यानंतर बराच वेळ सैनिकांसह लष्करी वाहने येतच राहिली. ती येत व मडगावच्या मार्गाने निघून जात. लोक म्हणाले, आमचे सैनिक आले. आम्ही स्वतंत्र झालो. खरे म्हणजे गोवा कालच, म्हणजे जेव्हा पोर्तुगीज सैनिक पळपुट्यासारखे पळून जात होते तेव्हाच मुक्त झाला होता. साडेचारशे वर्षांनंतर गोमंतकीय प्रथमच मुक्त श्‍वास घेत होते.