- – अश्वेता अशोक परब
जोपर्यंत काही गोष्टींचा माणसाला स्वतःला अनुभव येत नाही तोवर त्या गोष्टीची त्याला स्वतःच्या आयुष्यात फारशी गरज वाटत नाही. अगदी माणसांचीसुद्धा! सुरुवातीपासून आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती नसेल तर आपल्याला त्याची तितकीशी कमतरता जाणवत नाही पण हळूहळू आपली पावले बाहेरच्या जगात मिसळू लागली की मात्र आपल्यात नसलेल्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातलं स्थान सुरुवातीला धुसर आणि काळाबरोबर अगदी ठळक होत जातं.
माझ्या आयुष्यातली अशीच एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माझे आदरणीय आजोबा स्वर्गीय आपासाहेब बापू परब. त्यांच्याशी आज मी माझ्या लेखणीच्या माध्यमातून संवद साधणार आहे… आजोबा, कसे आहात तुम्ही?? ओळखलं ना मला… मी अश्वेता.. तुमची नात. खरंतर हा प्रश्न काहींना विचित्र वाटेल, पण मी विचारला कारण तुम्ही गेलात तेव्हा मी फक्त तीन वर्षांची होते. त्यामुळे मला तुमचा सहवास लाभला नाही आणि माझं इवलं रूप डोळ्यात घेऊन तुम्ही गेलात म्हणून म्हटलं आजच्या या ताडमाडाची ओळख पटतेय का नाही.. पण मम्मी, पप्पा, आत्या, काका आणि तुमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने माझ्या ओंजळीत काही अंशी ‘आठवणीतले आजोबा’ दिले आहेत… पण खरं सांगू? तुमची पोकळी कधीच भरून निघू शकत नाही हो आजोबा.. आपल्यात घडू शकणारे अनेक प्रसंग मी चित्रपटात पाहिले, कथा- कादंबर्यांमध्ये वाचले आणि काहींचं तर फक्त स्वप्नरंजन करून धाय मोकलून तुमच्या फोटोसमोर रडलेय मी… प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभवण्यातच खरी मजा आहे. आपल्या किती गोष्टी करायच्या राहून गेल्यात कल्पना आहे का?- तुमच्या मुठीत माझं इवलं बोट अडकवून गावातल्या रस्त्यांवरून माझं नाचणं राहिलंय आजोबा.. माझ्या बोबड्या आवाजातलं ‘‘आजोबा’’ तुम्ही कधी ऐकलंच नाही. आपण दंगा-मस्ती केल्यावर आईचा ओरडा खायचा राहिलाय.. तुमचं मला बाराखडी शिकवायचं राहिलंय.. पाटीवर तुम्ही माझा हात धरून श्रीगणेशा रेखाटायचं राहिलंय.. मी तुमच्या खांद्यावर निवांत डोकं ठेवून झोपणं राहिलंय.. झोप येत नसली की गोष्टीसाठी हट्ट करायचं राहिलंय.. पप्पा मला बोलल्यावर तुमच्या पाठी लपायचं राहिलंय आणि आताशा तर घरापासून गावापर्यंत, कवितेपासून नाटकापर्यंत आणि तुमच्या आवडत्या राजकारणावर चाय पे चर्चासुद्धा राहिलीय ना आजु.. हो, ‘‘आजु’’ बाजूच्या काकांची नात त्यांना ही अशी हाक मारते ना तेव्हा खूप कालवाकालव होते काळजात, अगदी जखमेवरची खपली निघते आणि तुम्ही नाही आहात ही जाणीव खूप तीव्रतेने होते.
तुमच्या आठवणी नेहमीच सगळे सांगत असतात. मम्मी सांगते मला पहिल्यांदा घरी आणलं तेव्हा घरी कोणी नव्हतं म्हणून तुम्ही धावून आलात मला घ्यायला. म्हणजे आपल्या घरात माझं पहिलं स्वागत तुम्ही केलंत. आत्याच्या लग्नात हक्काने माझ्या इवल्याशा हातात बांगड्या भरायला लावल्यात.. पप्पांचे मित्र, तुमच्या वयाची माणसं भेटली की तुमच्याविषयी भरभरून बोलतात. सगळे मला सांगतात, ‘‘तुझे आजोबा खूप विद्वान होते. ते बोलायचे तेव्हा आमची अशी काही तंद्री लागायची की वेळ कसा जायचा कळायचंदेखील नाही. वेगवेगळ्या विषयांवर बोलणं, मतं मांडणं, सल्ला देणं… त्यांचं बोलणं इतकं मुद्देसूद की एखादा वकील तोंडात बोट घालील!!’’
तुम्हाला वाचनाचा छंद. मोठाली पुस्तकं म्हणे तुम्ही एका बैठकीत वाचून काढायचात, अगदी माझ्यासारखी! लेखनातही तुहाला रस होता. नाटकाचा नाद तर विलक्षण. संवादाची शब्दफेक अचूक हावभाव या सगळ्याची जाण तुम्हाला होती त्यामुळे तुमच्या दिग्दर्शनाला तोड नव्हती. आजही तुमच्या शब्दांनी भारावलेले वेडे भेटतात आणि मी तुमचा अंश असल्याचा अभिमान जागवून जातात.
आजोबा, तुम्हालाच तुमची तक्रार करायचीय.. जग मला एकलकोंडी म्हणतं.. मम्मी- पप्पांना माझ्या गरजा पुरवायच्या होत्या म्हणून ते झटत होते आणि त्यांना मला एकटं ठेवावं लागं पण तुम्ही इतक्या लवकर का गेलात?? माझ्यासाठी बाप्पाकडून थोडासा वेळ मागून घ्यायचा होतात ना. तसं झालं असतं तर कदाचित आजचं हे चित्र वेगळं असतं.. मीही तुमच्या सहवासात तुमच्या उपदेशांनी समृद्ध झाले असते. भयमुक्त झाले असते आणि मीही व्यासपीठाच्या मध्यभागी तुमच्याकडून देणगी मिळालेल्या खणखणीत आवाजात चार संवाद म्हटले असते. हा तुमचा संस्कारांचा वाटा माझ्या पदरात पडता पडता राहिला याची नेहमीच मला खंत राहील. पण तुमच्या आशीर्वादाने माझ्या हातात लेखणी आली, हेही नसे थोडके. निवडक लोक जेव्हा, ‘‘तू आजोबांचा वारसा पुढे चालवतेयस’’ किंवा ‘‘दादांचे गुण उतरलेत पोरीमध्ये’’ असे उद्गार पप्पांच्या तोंडून निघतात आणि त्यांचा उजळलेला चेहरा पाहते ना आजोबा तेव्हा मला मनोमन समाधान मिळतं आणि माझ्या शब्दांचं सार्थक झाल्याच्या सुखाने मन काठोकाठ भरतं. ‘‘आज दादा असते तर त्यांना कोण आनंद झाला असता माहितीये का?’’ हे बोलताना पहाडासारखा माझा खंबीर बाप अक्षरशः गळ्यात दाटलेला हुंदका हळवा होऊन कसाबसा परतवून लावतो आणि डोळ्यातलं पाणी थोपवून धरताना त्यांच्या काळजाचं पाणी पाणी होतं हे मी अनेकदा अनुभवलंय. पप्पांनी खूप कमी वयात सगळ्यांची जबाबदारी स्वीकारली.. तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाने आणि त्यांना आलेल्या अनुभवांची जोड घेऊन ते स्वाभिमानी आयुष्य जगताहेत आणि तेच संस्कार त्यांनी माझ्यात रुजवलेत… माझा बाप फाटका असेल पण मिंधा नाही.. मोडेन पण वाकणार नाही हा तुमचा बाणा पप्पांनी आयुष्यभर जपलाय.. तुमच्या तालमीत वाढलेले आणि तुमचीच प्रतिकृती असलेले पप्पा मला दिल्याबद्दल आजोबा मी तुमची शतशः आभारी राहीन. आजोबा पण कधीतरी तुम्हीही भेटायला या मला, बाप्पाकडून क्षणभर विश्रांती घेऊन!! मी वाट पाहीन. शेवटी आताच्या घडीला भोवती फक्त कवीवर्य मंगेश पाडगावकरांच्या ओळी घुमताहेत…
‘‘आजोबांच्या खोलीत आता
धुकं…धुकं…धुकं…
आजोबांचं जग सगळं
मुकं…मुकं…मुकं…’’