आज सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प

0
8

>> अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणांकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास कालपासून प्रारंभ झाला असून, ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात आज (मंगळवार दि. 23) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ह्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारमण ह्या सलग सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाच्या दिशेने प्रवास सुरू होईल असा अर्थसंकल्प सादर होण्याची अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिकांपासून बड्या उद्योजकांचे लक्ष लागलेले आहे. मोदी सरकारकडून ह्या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होतात, याची सर्वांना उत्सुकता आहे.
केंद्र सरकारने 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केाला होता. यावर्षी एप्रिल आणि मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार होत्या. त्यामुळे सरकारने 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा सहावा अर्थसंकल्प होता. त्यामध्ये गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले होते.

लोकसभा निवडणूक निकालानंतर तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारकडून आज संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात काय काय असणार याबाबत अंदाज लावले जात आहेत. अंतरिम अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला कराच्या आघाडीवर काही प्रमाणात दिलासा आणि सवलती मिळण्याची अपेक्षा होती; मात्र त्यावेळी त्यांची काहीशी निराशा झाली होती. आता या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला करात सूट मिळण्याची शक्यता आहे.