आज काय होणार?

0
16

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागेल. गोव्याची यंदाची विधानसभा निवडणूक किती चुरशीची आणि अटीतटीची झाली हे तर सर्वांसमोर आहेच. त्यामुळे या निकालाबाबतची उत्सुकता अर्थातच शिगेला पोहोचलेली आहे. मतदानोत्तर पाहण्यांचे निकाल खरे मानायचे झाले तर राज्यात त्रिशंकू स्थिती उद्भवणार असल्याने राजकीय घोडेबाजाराला आता उदंड वाव मिळण्याची दाट शक्यता दिसते. कोणताही एक पक्ष स्पष्ट बहुमत गाठू शकला नाही तर त्रिशंकू स्थितीत जे काही घडेल ते नीतीमत्तेच्या अधिकाधिक खालच्या पातळ्या गाठणारे ठरणार नाही अशी आशा आहे. दुर्दैवाने ही निवडणूक लढविणार्‍या बहुतेक उमेदवारांच्या मनामध्ये केवळ सत्तेत सामील होणे आणि सत्तेचे फायदे उपटणे हाच परमोच्च हेतू दिसतो. त्यामुळे ज्याला – त्याला फक्त सरकारमध्येच सामील व्हायचे आहे. अशा विकाऊंसाठी राजकीय पक्ष तर निवडणुकीआधीपासूनच गळ टाकून बसलेले आहेत. त्यामुळे जनतेसमोर यापुढे नेमके काय वाढून ठेवले आहे याची चिंता वाटते.
राज्यातील प्रमुख पक्ष असलेले भाजप आणि कॉंग्रेस यांना सत्तास्थापनेची सर्वाधिक संधी आपल्यालाच असल्याचे वाटते आहे. भाजप ‘२२ मध्ये २२’ म्हणत स्पष्ट बहुमताची ग्वाही देत आलेला असला तरी मतदानोत्तर पाहण्यांचे निष्कर्ष काही वेगळे सांगत आहेत. दुसरीकडे आजवर ‘किंगमेकर’ च्या भूमिकेत असलेला मगो पक्ष यावेळी या परिस्थितीचा फायदा उठवून स्वतःच ‘किंग’ बनण्याच्या जोरदार प्रयत्नात आहे. तृणमूल कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष गोव्यात आपले खाते उघडण्याचे स्वप्न पाहात आहेत. अपक्ष म्हणून जे निवडून येतील ते तर सत्तेत सहभागी होण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. या अशा सार्‍या सत्तांध वातावरणात तुमचे -आमचे नवे सरकार घडणार आहे.
गोव्यातील अनेक लढतींकडे गोवाच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. विशेषतः पणजीतील बाबूश मोन्सेर्रात विरुद्ध उत्पल पर्रीकर लढतीबाबत देशभरात उत्सुकता आहे. अनेकांच्या, विशेषतः फुटिरांच्या, पक्षबदलूंच्या जय – पराजयाकडेही जनतेचे डोळे लागलेले आहेत. काही आमदार विजयाची हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. त्यांना ती साध्य होते की नाही त्याबाबतही उत्सुकता आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या वेगळ्या वाटेचा मांद्य्रात काय परिणाम दिसणार, पेडण्यातील नव्या चेहर्‍यांतून कोण बाजी मारणार, मायकल लोबोंच्या बंडाचा बार्देशवर किती परिणाम होणार, तिसवाडीतील बाबूश मोन्सेर्रात यांचे बालेकिल्ले टिकणार की उद्ध्वस्त होणार? साखळीत मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार का? सत्तरीचा गड विश्वजित राखणार ना? फोंडा तालुक्यात ढवळीकर बंधू आपली ताकद दाखवून देणार का? सालसेतवर वर्चस्व मिळवण्यात कोण यशस्वी ठरणार, असे ठिकठिकाणच्या लढतींबाबत अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे आज दुपारपर्यंत मिळूनही जातील. वाट्टेल तशा माकडउड्या मारून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना मतदारांनी काय कौल दिला आहे, राजकीय पक्षांच्या आश्वासनांना मतदार कितपत भुलला आहे, तेही निकालातून स्पष्ट होईल. या निवडणुकीत अनेक सत्ताकांक्षी जोडपी उतरली आहेत. त्यामुळे किती महिला या विधानसभेवर पोहोचणार हेही उत्सुकतेचे आहे.
आजच्या निकालातील अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. गेली दहा वर्षे राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाची स्थिती काय होते, तो दावा केल्याप्रमाणे सर्वाधिक जागा जिंकतोे की गेल्या वेळेसारखी स्थिती होते. संख्याबळ कमी झाले तरीही सत्तेचा घोडेबाजार मांडून तो सरकारस्थापनेसाठी धडपडणार का, मुख्यमंत्रिपदाचे जे स्वयंघोषित दावेदार आहेत, ते प्रमोद सावंत यांना पुन्हा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखू शकणार आहेत का? कॉंग्रेस पक्ष सत्तेच्या सुखस्वप्नात दंग असला आणि पाच मिनिटांत आपला नेता निवडू म्हणत असला तरी प्रत्यक्षात तशी वेळ आली तर त्यासाठी सहयोगी पक्षांची एवढ्या तातडीने सहमती मिळवू शकेल का, की भाजप पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करील? मायकल लोबो, विश्वजित राणे, बाबूश मोन्सेर्रात, विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर आदी राज्यातील महत्त्वाकांक्षी आणि प्रभावशाली नेत्यांची या नव्या सरकार स्थापनेत नेमकी कोणती भूमिका राहील? अशा अनेक गोष्टींवर आज निकालानंतर लक्ष ठेवावे लागणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ सुरू होण्याजोगी परिस्थिती जर निकालातून उद्भवली तर पुढे जे सरकार सत्तारूढ होईल ते कितपत स्थिर असेल याचाही विचार करावा लागेल. गोव्यासाठी आजचा निकाल महत्त्वाचा आहेच, पण त्याहून महत्त्वाचे आहे ते त्यापुढे शिजणार असलेले राजकारण. ते किमान गोव्याच्या जनतेला आणखी मान खाली लावायला लावणारे नसेल अशी आशा करूया!