>> अंकित चव्हाणची ‘एमसीए’ला विनंती
श्रीसंत याच्यासह आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला मुंबईचा माजी डावखुरा फिरकीपटू अंकित चव्हाण याने आपल्यावरील आजीवन बंदी हटवण्याची मागणी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे केली आहे. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने केलेल्या चौकशीत राजस्थान रॉयल्सचे तत्कालीन खेळाडू श्रीसंत, चव्हाण व अजित चंडिला हे तिघे दोषी आढळले होते. त्यामुळे या तिघांवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. दिल्लीतील कोर्टाने २०१५ साली पुराव्या अभावी या तिघांची निर्दोष मुक्तता केली होती.
‘मी माझ्यावरील आजीवन बंदीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. मला पुन्हा मैदानावर उतरायचे आहे. श्रीसंतने आपल्यावरील बंदीला यशस्वीरित्या आव्हान दिले आहे. तो पुन्हा क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्यामुळे मलादेखील संधी द्यावी,’ असे ३४ वर्षीय चव्हाण याने सांगितले. आत्तापर्यंत केवळ श्रीसंत यानेच आपल्या बंदीला आव्हान दिले आहे. यासाठी त्याने सुप्रीम कोर्टचा दरवाजा ठोठावला होता. कोर्टाने त्याच्यावरील बंदी हटवून बीसीसीआयलच्या त्याच्या शिक्षेच्या स्वरुपात बदल करण्याचा आदेशही दिला होता. यानंतर मंडळाने श्रीसंतला २०२० मोसमापासून क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली होती.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत २०१२ साली पंजाबविरुद्ध एका डावात ९ बळी घेतल्यामुळे चव्हाण सर्वप्रथम चर्चेत आला होता. एमसीएचे अध्यक्ष संजय नाईक यांनी चव्हाण याचा विनंती अर्ज आल्याचे सांगताना बैठकीत यावर चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले. चव्हाण याने १८ प्रथमश्रेणी सामने, २० ‘अ’ दर्जाचे सामने व १३ आयपीएल सामने खेळले आहेत.