आजपासून 2000 च्या
नोटा बदलून घेता येणार

0
7

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) चलनातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला होता. आता या 2000 च्या नोटा बदलण्याची प्रक्रिया आजपासून (दि. 23 मे) सुरू होणार आहे. कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नागरिकांना या 2000 रुपयांच्या नोटा सहजपणे बदलता येतील. त्यासाठी कोणताही अर्ज भरण्याची गरज नाही किंवा कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र मागितले जाणार नाही. मात्र एकावेळी केवळ 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून मिळणार आहेत.

आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतत असल्याचे जाहीर केले असले तरी या नोटांचा वापर 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बँकेच्या मार्फत बदलता येणार आहेत. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील, त्यांना नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे.

गोंधळून जाऊ नका : गव्हर्नर
हा निर्णय घेतल्यानंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. दोन हजारांच्या नोटा चलनात आणण्याचे उद्दिष्ट आता पूर्ण झाले आहे, असे दास म्हणाले. तसेच नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. नागरिकांनी दोन हजारांच्या नोटांवर घातलेली बंदी ही कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करणारी आहे, असा अजिबात समज करू नये. या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये देखील पूर्ण तयारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.