आजपासून तीन दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

0
2

>> 26 रोजी मुख्यमंत्री मांडणार अर्थसंकल्प

>> कमी कालावधीमुळे पडसाद उमटण्याची शक्यता

गोवा विधानसभेचे तीन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवारी दि. 24 पासून सुरू होत असून ते बुधवार दि. 26 मार्चपर्यंत चालू राहणार आहे. दि. 26 रोजी दुपारी 2.30 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री या नात्याने 2025-2026 या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प गोवा विधानसभेत मांडणार आहेत. सरकारने हिवाळी अधिवेशनानंतर आता पुन्हा एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनही केवळ तीन दिवसांचे ठेवल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. त्याचे पडसाद आज अधिवेशनातही उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या तीन दिवसीय अधिवेशनाची सुरूवात आज सोमवारी सकाळी 11.30 वा. प्रश्नोत्तराच्या तासाने होणार आहे. तद्नंतर शून्य काळ, लक्षवेधी सूचना त्याचबरोबर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात जे अभिभाषण केले होते त्यावर चर्चा संध्याकाळच्या सत्रात होणार आहे.
या अधिवेशनात विधानसभेतील वेगवेगळ्या सदस्यांकडून एकूण 180 तारांकित तर 548 अतारांकित प्रश्न मांडण्यात आलेले आहेत. विधानसभा कामकाजाच्यावेळी या प्रश्नांवर चर्चा होणार असून संबंधीत मंत्र्यांकडून या प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार आहेत. कमी कालावधीच्या अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडताना विरोधकांची तर विविध प्रश्न व समस्यांची उत्तरे देताना सरकारची कसोटी लागणार आहे.

सरकारतर्फे आज तीन दुरूस्ती विधेयके सादर केली जाणार आहेत. आज पहिल्या दिवशी प्रश्नोत्तर सत्रानंतर माजी आमदार लवू मामलेदार, गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित स्व. प्रभाकर कारेकर, अयोध्येतील राम मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्यासह इतर दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. अभिनंदन प्रस्तावानंतर सभागृहात विविध प्रकारचे अहवाल सादर करण्यात येणार आहे.

विरोधक कोंडीत पकडणार?
सरकारी नोकऱ्यांसाठी झालेला घोटाळा, बेरोजगारी, भ्रष्टाचार या प्रमुख मुद्द्यांसह अन्य विविध विषयांवरून सरकारला विरोधक कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. विद्यापीठातील कथित पेपरफुटी प्रकरण, उड्डाणपुलासाठी खाप्रेश्वर मंदिर मोडण्याची घटना यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

आज तीन विधेयके

आज सोमवारी तीन दुरूस्ती विधेयके सादर करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे गोवा राज्य संशोधन फाउंडेशन दुरूस्ती विधेयक तसेच खासगी विद्यापीठ दुरूस्ती विधेयक सभागृहात सादर करतील. रोजगार आणि कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात हे रोजगार विनिमय (खासगी नोकरींची अधिसूचना) दुरूस्ती विधेयक 2025 सादर करणार आहेत.