आजपासून जोरदार पावसाची शक्यता

0
144

>> जुलै महिन्यात ५० तर एकूण ९० इंच पावसाची नोंद

राज्यात जुलै महिन्यात ५० इंच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने शनिवार १ ते मंगळवार ४ ऑगस्ट या काळात राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून केशरी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात मोसमी पाऊस गुरुवारपासून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून मागील चोवीस तासांत १.८७ इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसाची रिपरिप पुन्हा एकदा सुरू झाली असून सरकारी यंत्रणा सतर्क बनली आहे.

जुलैमध्ये ५० इंच पाऊस
राज्यात जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात साधारण ५० इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, जून महिन्यात ४० इंच पावसाची नोंद झाली होती. जुलै महिन्यातील जोरदार पावसामुळे साळावली, अंजुणे व इतर प्रमुख धरणे भरली आहेत. राज्यात आत्तापर्यंत ९०.३३ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १७ टक्के जास्त आहे.

तीन ठिकाणी इंचांचे शतक
राज्यात मोसमी पावसाने पेडणे पाठोपाठ ओल्ड गोवा आणि काणकोणमध्ये इंचाचे शतक पूर्ण केले आहे. ओल्ड गोवा येथे आत्तापर्यंत १०१.२९ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, काणकोण येथे आत्तापर्यंत १०१.३७ इंच पावसाची नोंद झाली आहे.
मागील चोवीस तासांत ओल्ड गोवा येथे सर्वाधिक ४.०३ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे १.४४ इंच, पणजी १ इंच, साखळी २.०४ इंच, काणकोण १.८८ इंच, दाभोळी १.९८ इंच, मडगाव १.८५ इंच, मुरगाव २.०९ इंच, केपे २.०१ इंच, सांगे येथे २.९३ इंच पावसाची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १८ टक्के आणि दक्षिण गोव्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १५ टक्के जास्त आहे.