आजपासून जी-20च्या आरोग्य कार्यगटाची बैठक

0
13

>> तीन प्राधान्यक्रमांवर होणार विस्तृतपणे चर्चा; देशभरात विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन

सोमवार दि. 17 एप्रिल रोजीपासून गोव्यात होऊ घातलेल्या जी-20 परिषदेच्या आरोग्य क्षेत्र कार्यगटाच्या अंतर्गत होणाऱ्या बैठकीत तीन प्राधान्यक्रमांवर विस्तृतपणे चर्चा होणार आहे, असे काल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अगरवाल यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले.

या तीन प्राध्यान्यक्रमांमध्ये आरोग्यविषयक आणिबाणीच्या स्थितीला प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद (एक आरोग्य आणि प्रतिजैविक प्रतिबंधावर लक्ष केंद्रीत) तसेच सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार आणि किफायतशीर वैद्यकीय प्रतिकार (लस, उपचार आणि निदान) यांची सुगम्यता आणि उपलब्धतेवर लक्ष केंद्रीत करून औषध निर्मित क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे, त्याचबरोबर डिजिटल आरोग्य नवोन्मेष आणि उपाय व सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती आणि आरोग्य सेवा वितरण सुधारण्यास मदत करणे यावर भर देण्यात येणार आहे, असे अगरवाल यांनी सांगितले.
भारताच्या जी-20 अध्यक्षतेच्या ‘हेल्थ ट्रॅक’मध्ये आरोग्य कार्यगटाच्या चार बैठका आणि एक आरोग्यमंत्री स्तरीय बैठक यांचा समावेश असेल. जी-20 चर्चा समृद्ध, पुरक आणि सहाय्यक बनवण्याच्या उद्देशाने आरोग्य कार्यगटाच्या बैठकीच्या निमित्ताने चार अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्याची योजना भारताने आखली आहे. 18-19 एप्रिल रोजी आरोग्य कार्यगटाच्या बैठकीच्या निमित्ताने डिजिटल आरोग्यावर एक विशेष कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. देशभरात विविध ठिकाणी या बैठका आयोजित केल्या जातील, अशी माहिती यावेळी अगरवाल यांनी दिली.

भारताने 1 डिसेंबर 2022 रोजी जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारले होते. भारत सध्या जी-20 त्रिकुटाचा भाग आहे. या त्रिकुटात तीन विकसनशील देशांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी अनावरण केलेली ‘वसुधैव कुटुंबकम्‌‍’ या भारताच्या तत्त्वज्ञानावर आधारित ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना जगभरातील लोकांसाठी महामारीनंतरचे निरोगी जग उभारण्याच्या दिशेने एकत्रितपणे कार्य करण्यासाठीचे एक आकर्षक घोषवाक्य ठरले असल्याचे अगरवाल यांनी स्पष्ट केले.
जी-20 गटाचा अध्यक्ष या नात्याने बळकटीकरणाची आवश्यकता असलेली महत्त्वपूर्ण क्षेत्रे अधोरेखित करत आरोग्यविषयक प्राधान्यक्रम आणि मागील अध्यक्षांनी घेतलेल्या प्रमुख निर्णयांचे एकत्रिकरण करून ते पुढे सुरू ठेवणे हे भारताचे उद्दिष्ठ असल्याचे अगरवाल यांनी स्पष्ट केले.