आजपासून कार्निव्हलची धूम

0
17

राज्यात शनिवार दि. २६ फेब्रुवारीपासून कार्निव्हलला सुरुवात होत असून, शनिवारी राजधानी पणजीतून त्याची सुरवात होणार आहे. पणजीत दुपारी ३ वाजल्यापासून कार्निव्हल मिरवणूक सुरू होणार आहे. ‘खा, प्या आणि मजा करा’ असा संदेश देत किंग मोमोची राजवट लागू होईल.

कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक जुन्या सचिवालयाकडून दुपारी ३ च्या आसपास सुरू होणार आहे. मात्र, या स्पर्धेत सहभागी होणार असलेले चित्ररथ तत्पूर्वी दिवजांसर्कल ते रायबंदर कॉजवे या दरम्यान रांगेने ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तद्नंतर दुपारी २ वाजल्यापासून हे चित्ररथ जेथून मिरवणूक सुरू होणार आहे, तेथे म्हणजेच जुन्या सचिवालयाकडे आणण्यास परवानगी दिली जाणार आहे.

जुन्या सचिवालयाकडून सुरू होणारी मिरवणूक ही कला अकादमीकडे संपेल. नंतर मिरवणुकीत सहभागी झालेले चित्ररथ बांदोडकर फुटबॉल मैदानावर ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. कार्निव्हल उत्सवानिमित्त गेल्या दोन-तीन दिवसांपासूनच पणजी शहर सजू लागलेले असून, ज्या दयानंद बांदोडकर मार्गावरून ही मिरवणूक जाणार आहे, त्या मार्गाच्या दुतर्फा पाहुणे व लोकांसाठी बसण्याची सोय तसेच सजावट करण्याचे काम पूर्ण झालेले आहे.

‘मिशन टू झिरो वेस्ट’
यंदाच्या कार्निव्हलचे एक आकर्षण म्हणजे मनपातर्फे ‘मिशन टू झिरो वेस्ट’ हे असून, हा उपक्रम कार्निव्हल महोत्सवादरम्यान राबविण्यात येणार आहे.