आजच्या स्त्रियांनी रणरागिणी व्हायला हवे..!

0
407

– देवेश कुसुमाकर कडकडे, डिचोली
भारत देशाला अलीकडच्या काळात घडलेल्या किळसवाण्या घटनांमुळे सार्‍या जगात ‘बलात्कार्‍यांचा देश’ म्हणून हिणवले जाऊ लागले आहे. बलात्कार हा आता वय, वेळ, नाते यापैकी कुठल्याही पातळीवर अवलंबून राहिलेला नाही. अशा कृत्यांना बळी पडणार्‍या निरागस अल्पवयीन मुली आयुष्यभर हा काळाकुट्ट डाग बरोबर बाळगून जगतात, तसेच या घटनेमुळे त्यांच्यात सतत असुरक्षिततेची भावना प्रबळ होत जाते. का होतात अशी बलात्कारासारखी हिणकस कृत्ये? एखाद्या स्त्रीला आयुष्यातून उठवण्याची भावना पुरुषांमध्ये कशी निर्माण होते?
वास्तविक, बलात्कारासारख्या घटना समाजात अत्यंत अप्रिय असूनही त्या वारंवार घडत असतात. आज वर्तमानपत्रातून मथळे बलात्कारांच्या बातम्यांनी भरलेले दिसतात. यातून दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे लक्षात येते. एखाद्या पुरुषात इतका किळसवाणा प्रकार करण्याची मानसिकता किंवा प्रवृत्ती निर्माण होऊ शकते? आपल्या आई-बहिणीवर किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीवर ही परिस्थिती उद्भवली तर त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याचा साधा विचारही त्याच्या मनात येत नसेल?
आज जग झपाट्याने बदलत आहे. जागतिकीकरणामुळे पैसा ओतला की सारी साधने, सुविधा पायाशी लोळण घेतात. इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्‍यातील इत्यंंभूत माहिती आपल्या दाराशी येऊन पोहोचते. एकेकाळी हाताळण्यास अवघड वाटणारे मोबाईल, लॅपटॉप आज लहान मुलांच्या हातचे खेळणे बनले आहे. आमच्या लहानपणी मुलींना बाहुली आणि मुलांना खेळणी देऊन बोळवण केली जायची. आता मोबाईल, लॅपटॉप न हाताळणारी मुले विरळाच.
८० टक्के विद्यार्थी अश्लील व्हिडिओ पाहतात. यामधील ४० टक्के विद्यार्थी बलात्कारासंबंधी व्हिडीओ नियमितपणे पाहतात. आणि त्यातील ७६ टक्के विद्यार्थ्यांना कोणावर तरी बलात्कार करण्याची इच्छा निर्माण होते, असा ‘रेस्न्यू संघटने’चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ‘आपण बलात्कार करणारे तयार करीत आहोत’ असेही अहवालात म्हटले आहे.
आजकाल मुले जे मागतात ते पालक आणून देतात. आजच्या आधुनिक युगात आपला मुलगा स्पर्धेत मागे राहू नये, यासाठी संगणकीय ज्ञान आवश्यक आहे. म्हणून त्यांना संगणकीय ज्ञान देण्यास प्राधान्य दिले जाते. पण प्रत्यक्षात आपला मुलगा किंवा मुलगी काय शिकते किंवा कोणते ज्ञान मिळवते यावर लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अश्लील दृष्ये पाहिल्यामुळे स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी असभ्य बनते. त्यामुळेच आज महिलांना गर्दीच्या ठिकाणी, बाजारात, बसमधून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे.
आज मुलांना आम्ही दिलेला अमर्याद मोकळेपणा म्हणजे स्वातंत्र्य नसून स्वैराचाराकडे झुकणारी अपप्रवृत्ती आहे, हे पालकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपण दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग तरूण मुले गुन्हेगारी, मादक पदार्थांचे सेवन करण्यात तर घालवत नाही याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
आज चित्रपट, दूरदर्शनच्या मालिकांतून स्त्रियांना अयोग्य पद्धतीने प्रस्तुत करण्यात येते. स्त्रीयांना एक कामोत्तेजक वस्तू किंवा साधन म्हणून दाखवतात. गुन्ह्याबद्दलच्या मालिका भडक स्वरुपात दाखवल्यामुळे क्रौर्य वाढते. वासनांधतेला उत्तेजन मिळते. त्यामुळे आजकाल समाजात भ्रष्टाचारा इतकाच बलात्कारही नेहमीचाच घडणारा वाटू लागला आहे. त्यामुळेच आज भारत हा भ्रष्टाचार्‍यांचा आणि बलात्कार्‍यांचा देश म्हणून बदनाम होऊ लागला आहे.
बलात्कार ही आधी क्वचितच घडणारी घटना होती. पण आता तर स्त्री समुदायाला भीतीने थरकाप उडेल एवढ्या सातत्याने या घटना घडत आहेत. जणू लैंगिक अत्याचाराची साथच आलेली आहे. बलात्कारामागे अनेक कारणे आहेत- त्यात बालपणापासून वाईट संगत, व्यसनी मातापिता, त्यातून लागलेल्या वाईट सवयी, आजूबाजूचे वातावरण, घरातील परिस्थिती, बेजबाबदार पालक, घरात सतत मारझोडीचे प्रकार घडणे, यातून मुलीवर चुकीचे संस्कार होणे व त्याचे परिणाम म्हणून घडत असलेल्या समाजविघातक घटना, त्यातून बलात्कारासारख्या गुन्ह्यांत वाढ होताना दिसते.
आज स्त्रिया सर्व क्षेत्रांत मुक्तपणे वावरताना दिसतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात सरस ठरत आहेत. घरात आणि घराबाहेर स्त्रियांचे महत्त्व वाढले आहे. हा बदल अथवा स्त्रियांची वेगाने होणारी प्रगती समाजातील काही घटकांच्या डोळ्यांत खुपत असल्यामुळे स्त्रियांवरील अत्याचारात वाढ होत आहे.
समाजातील वहिवाटीच्या मार्गावर होर्डिंग, कामवासना चाळवणारी मासिके, अंतर्वस्त्रे घातलेले पुतळे इत्यादींची दुकानाबाहेर प्रदर्शने मांडली जातात. पाश्‍चात्य संस्कृतीच्या प्रभावाने केवळ धंदा करण्याच्या उद्देशाने नीतीमत्तेची चाड न उरलेल्या काही व्यापार्‍यांनी महिलांना मान वर करून चालण्यास संकोच वाटतो अशी परिस्थिती निर्माण केली आहे.
अश्लील व्हिडीआ पाहणे हे अधिकृत झालेले नाही, ही समाधानाची गोष्ट आहे. मुलांच्या इंटरनेट पाहण्यावर निर्बंध लावले पाहिजेत. युवा पिढी प्रलोभनांना बळी पडून नवीन गोष्टींचा दुरुपयोग करते, त्यापासून पालकांनी त्यांना रोखले पाहिजे. त्यासाठी सदैव सतर्क राहण्यावर भर देणे आवश्यक आहे. तसेच आता स्त्रियांनी या सर्वांचा सामना करण्यासाठी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चन्नम्मा अशा अनेक शूरवीर स्त्रियांचा आदर्श ठेवून स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतःचे रक्षण करण्यासाठी रणांगणातील रणरागिणी व्हायला हवे. स्वतःच्या बचावासाठी त्यांनी आता स्वतःच पुढे व्हावे लागेल.