आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा वारसा

0
221

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

जीवन कसे जगता येते, त्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे विनोबाजींचे जीवन. या जीवनधारेतील चिंतनाचे नवनीत लेखणी आणि वाणी यांद्वारे त्यांनी समाजमानसाला दिले. स्वानुभूतीचा हा उद्गार आहे.

 

आधुनिक कालखंडातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून आचार्य विनोबा भावे यांची ख्याती आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेकविध पैलू होते. संतत्वाला आवश्यक असलेले सारे गुण विनोबाजींमध्ये होते. ‘चंदनाचे हात पायही चंदन’ असे तुकारामवाणीप्रमाणे त्यांचे अवघे जीवन होते. त्यांची वृत्ती परिव्राजकाची होती. गतिमान युगातील कश्मल बाजूला ठेवून ‘कमलपत्रइव अम्भसा’ जीवन कसे जगता येते, त्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे विनोबाजींचे जीवन. या जीवनधारेतील चिंतनाचे नवनीत लेखणी आणि वाणी यांद्वारे त्यांनी समाजमानसाला दिले. त्यांचे शब्द कसे? नवनीतासारखेच मृदुमुलायम! स्वानुभूतीचा हा उद्गार आहे. व्यष्टीपेक्षा समष्टीच्या अभ्युदयाची तळमळ त्यांच्या शब्दांत आहे. ज्ञानोबांनी ‘विश्‍वचि माझे घर|’ हा मानवतेचा मंत्र ‘ज्ञानेश्‍वरी’च्या माध्यमातून तेराव्या शतकात दिला. सात दशकांनंतर विनोबाजींनी तोच मंत्र ‘जय जगत’च्या रूपाने दिला. भारतीय जीवनसंचिताने जगाला काय दिले? ज्ञानोबा ते विनोबा ही परंपरा अभ्यासावी, उत्तर सापडेल. समाजात विचारवंत अनेक असतात. पण आचारवंत? फारच थोडे. विनोबाजींची गणना या दुर्मीळ माणसांमध्ये करावी लागेल. सध्याच्या काळात लोकसंख्या वाढत चालली आहे. ‘माणसे’ कमी होत चालली आहेत. अशा कठीण काळात विनोबाजींसारख्या अंतर्बाह्य सात्त्विक पुरुषाच्या स्मृतिजागरामुळे ‘अंधार फार झाला’ ही जाणीव नाहीशी होऊन भावात्मक अनुभूतींचे बळ मनामनांमध्ये संचारेल. कारण ही आत्मिक ऊर्जा पुरविणारे महामानव विनोबा भावे दीपस्तंभ म्हणून अविचल जीवननिष्ठेने आपणासमोर उभे आहेत. लौकिक जगात ते नसले तरी त्यांची विचारसाधना अक्षय स्वरूपात अनेक पिढ्यांसाठी निरंतर राहणार आहे. प्रख्यात साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी ‘प्रचंड’ या आचार्य अत्रे यांच्यावरील मृत्युलेखात मराठीतून लेखन करणार्‍या साहित्यिकांमध्ये आचार्य विनोबा भावे, म. म. दत्तो वामन पोतदार आणि आचार्य अत्रे यांची गणना केली होती. ‘शैली हे माणसाचे खरे रूप’ ही उक्ती सार्थ मानली तर तेंडुलकरांच्या विधानातील ‘ग्यानबाची मेख’ कळेल. स्वभाषेचे सामर्थ्य, तिच्या शब्दकळेचे वैभव आणि तिच्या अभिव्यक्तीचे सौंदर्य प्रकट करण्यासाठी आगळी मनस्विता आणि संवेदनशीलता प्राप्त करावी लागते. त्यासाठी आगळे-वेगळे आत्मभान आणि समाजभान असावे लागते. हा विवेक, ही समतोल वृत्ती विनोबाजींमध्ये पुरेपूर भरलेली होती. हा अक्षय घडा काठोकाठ भरलेलाच राहिला. विनोबाजींच्या व्यक्तिमत्त्वात प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा संगम झालेला होता. अनन्यसाधारण बुद्धिमत्ता, तर्कनिष्ठ विचारपद्धती आणि माणसांच्या कल्याणासाठी ओथंबून आलेली भावनाप्रधानता यांचा समवाय त्यांच्या ठिकाणी झालेला होता. त्या सत्प्रवृत्तींचे पाझर निरंतर त्यांच्या सोप्या-सुलभ वाणीतून व्यक्त व्हायचे. विनोबाजींचे लेखन वाचणे म्हणजे विनोबाजी अनुभवणे. विचारांच्या सृष्टीत गर्भश्रीमंत असलेल्या या माणसाने मराठी मनाला काय काय दिले? शब्दरूप देणे कठीण आहे. प्राचार्य राम शेवाळकर यांनी संपादित केलेल्या ‘विनोबा सारस्वत’मध्ये त्याचा संक्षिप्त आलेख आहे. विनोबाजींचे जीवनचरित्र म्हणजे बौद्धिक क्षेत्रातील चमत्कारांची मालिका होय.

एकोणिसावे शतक संपण्यापूर्वी पाच वर्षे अगोदर जन्मलेल्या विनोबाजींनी समज आलेल्या वयापासून विसाव्या शतकातील ८२ वर्षे सजगतेने पाहिली. विसावे शतक हे जागतिकदृष्ट्या तसेच राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रभावी आणि प्रमाथी शतक होते. त्याचा तपशील आपण सारे जाणतोच. त्यातील प्रवाहांशी आणि अंतःप्रवाहांशी सामोरे जाऊन कृतिशील होणे, द्रष्टेपणाने त्यावर भाष्य करणे हे आयुष्यभराचे उत्तरदायित्व असते. ही जोखीम विनोबाजींनी लीलया पत्करली. यात विनोबाजींची महती दडलेली आहे.

विनोबाजींच्या लौकिक जीवनातील यशाचे कितीतरी प्रसंग तपशिलात जाऊन सांगता येतील. येथे संक्षेपाने त्यांचे अधोरेखन करावे लागेल. १९१३ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९१६ मध्ये त्यांनी काशीला प्रयाण केले. काशी विद्यापीठातील दीक्षान्त समारंभात महात्मा गांधींनी केलेल्या भाषणामुळे ते प्रभावित झाले. १९१६ मध्ये महात्माजींच्या अहमदाबाद येथील आश्रमात त्यांनी प्रवेश केला. त्यांच्या अनुमतीने विद्याभ्यासासाठी वाईला स्वामी केवलानंदांच्या सान्निध्यात ते राहिले. या काळात त्यांनी ‘उपनिषदे’, ‘भगवद्गीता’, ‘ब्रह्मसूत्र’, ‘शांकरभाष्य’, ‘मनुस्मृति’ आणि ‘पातंजलयोगदर्शन’ या ग्रंथांचे सखोल अध्ययन केले. याशिवाय ‘न्यायसूत्र’, ‘वैशेषिक सूत्र’ आणि ‘याज्ञवल्क्यस्मृति’ या ग्रंथांचा अभ्यास केला. विद्यार्थ्यांसाठी गीता, ज्ञानेश्‍वरीचे वर्ग घेतले. रायगड, सिंहगड आणि तोरणा या गडांवर भ्रमंती केली. या प्रवासात गीतेवर पन्नास प्रवचने दिली. बालपणापासून आईवडिलांनी त्यांना वाचनासाठी प्रोत्साहन दिले. सानेगुरुजींप्रमाणेच आई हे विनोबाजींचे परम दैवत होते. तिच्या सांगण्यावरूनच ते भगवद्गीतेच्या अंतरंगात शिरले. त्याची परिणती म्हणजे नवनीतासारखी मधुर ‘गीताई.’ ७ ऑक्टोबर १९३० रोजी त्यांनी ‘गीताई’च्या लेखनास प्रारंभ केला आणि ६ फेब्रुवारी १९३१ ला त्यांनी या लेखाची पूर्ती केली. ‘गीता प्रवचने’ हाही त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ. १९३२ मध्ये धुळ्याच्या तुरुंगात सर्व ‘कर्मयोग्यां’च्या मेळाव्यात विनोबाजींनी ती ऐकविली. सानेगुुरुजींसारख्या सत्प्रवृत्त साहित्यिकाने ती लिहून काढली. यासंदर्भात विनोबाजी लिहितात ः
‘‘या प्रवचनांच्या निमित्ताने गीतेची सेवा करण्याची विशेष संधी देवाने मला दिली, ही मी त्याची मोठी कृपा समजतो. ही टिपून घेण्याला सानेगुरुजींसारखा सिद्धहस्त सत्पुरुष लाभला हीही त्याचीच कृपा होय.’’ असा ‘समसमां संयोग’ होणे ही दुर्मीळ बाब होय.

विनोबाजींच्या कृतिशील जीवनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांचा येथे उल्लेख करायला हवा. १९२१ मध्ये साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्यास काढण्यात आली. त्या शाखेचे संचालक म्हणून वर्ध्यास पाठविले. विनोबांनी १९३० व ३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला. त्यांच्या सेवाधर्माचे टप्पे असे आहेत- गांधीजींच्या विचारसरणीच्या प्रभावामुळे त्यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. सत्याग्रहात भाग घेतला. विविध प्रकारचे रचनात्मक कार्य केले. ‘चले जाव’ चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. सर्वोदयी चळवळीतील त्यांचे कार्य मौलिक स्वरूपाचे. भूमिक्रांतीचे प्रयोग त्यांनी केले, भूदान यज्ञाची संकल्पना मांडली. त्यासाठी देशभरात ठिकठिकाणी पदयात्रा काढली. अस्पृश्यतानिवारणासाठी ते झटले. त्यासाठी बिहारातील वैद्यनाथ मंदिरात, पुरीच्या जगन्नाथ मंदिरात आणि पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात दलित बांधवांसह त्यांनी प्रवेश केला. चंबळेच्या खोर्‍यातील डाकूंचे हृदयपरिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जनमानसासमोर एक आदर्श कर्मयोगी आणि थोर तत्त्वचिंतक म्हणून त्यांची प्रतिमा साकार झाली. ते बहुभाषाकोविद होते. अनेक धर्मांचे ते अभ्यासक होते. त्यांच्या समर्थ अभिव्यक्तीतून ज्ञानाचे क्षितिज उजळून निघाले. एकाच माणसाच्या अंगी एवढ्या सामर्थ्याचा संचय असू शकतो हे पाहून विस्मय वाटतो.

विनोबांनी उणीपुरी दोनशे छोटी-मोठी पुस्तके लिहिली. मधुकर, ईशवास्यवृत्ती, स्वराज्यशास्त्र आणि सर्वोदय विचार, ज्ञानदेव चिंतनिका, भागवत धर्म मीमांसा, स्थितप्रज्ञ-दर्शन, भूदानयज्ञ- समग्रदर्शन, स्त्रीशक्ती, दीक्षा ही त्यांची महत्त्वाची पुस्तके. विनोबा चिंतन (४८ भाग) तिसरी शक्ती, नामघोषनवनीत, बापू के चरणों में, कुरानसार (संपादित) इत्यादी ग्रंथ त्यांनी हिंदीतून लिहिले आहेत. संस्कृतमधूनही त्यांनी लेखन केले आहे.

त्यांच्या ग्रंथसंपदेचा आणि तिच्यातील आशयसूत्रांचा परामर्श घेणे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यांची शैली निरुपणात्मक आहे. तात्त्विक संकल्पना ते चिरपरिचित उदाहरणांद्वारे स्पष्ट करून सांगत. त्यांच्या व्युत्पन्नतेचे आणि श्रुतयोजनकौशल्याचे पदोपदी दर्शन घडते. त्यांच्या सूक्ष्म अवलोकनशक्तीचा त्यांच्या लेखनातून प्रत्यय येतो. कर्मयोगाची संकल्पना ते सोप्या भाषेतून स्पष्ट करीत. प्रवाही आणि प्रसन्न शैलीतून त्यांनी लेखन केले आहे. ‘बुद्धी आणि भावना’ या निबंधात विनोबांच्या जीवननिष्ठेचे अंतःसूत्र दिसून येते. बुद्धी आणि भावना यांचा समतोल जीवनसरणीत आवश्यक आहे असे त्यांनी या ठिकाणी प्रतिपादन केले आहे. संतांचा समष्टियोग विनोबांनी प्रभावी शब्दांतून प्रकट केला आहे. यादृष्टीने त्यांनी ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतपुरुषांचे घडविलेले दर्शन उद्बोधक आहे. चराचर सृष्टीत प्रकट होणारे परमेश्‍वराचे चैतन्यरूप विनोबांनी तन्मयतेने रंगविले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सात्त्विकतेची मुद्रा त्यांच्या विविधांगी स्वरूपाच्या लेखनात उमटली आहे.