>> मुख्य निवडणूक अधिकार्यांची माहिती; एकूण ३८ तक्रारी प्राप्त
राज्यातील निवडणूक मतदान काळात लहान-सहान घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. निवडणूक प्रचार मोहीम संपल्यानंतरच्या काळात आचारसंहिता भंग प्रकरणी ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल (आयएएस) यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
निवडणूक जाहीर प्रचार संपल्यानंतरच्या काळात आचारसंहिता भंग प्रकरणी एकूण ३८ तक्रारी प्राप्त झाल्या असून, ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डिचोली येथे कार जाळल्या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कुळे येथे पैसे वाटप करताना एकाला पकडण्यात आले असून, त्याच्याकडून १ लाख १९ हजार रुपये जप्त करण्यात आले. फोंडा येथे ईव्हीएम मशीनसोबत मतदान करतानाचे छायाचित्र घेतल्या प्रकरणी ३० वर्षीय युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनसोबत घेतलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाकले होते. तसेच पर्वरी आणि मेरशी येथे पैसे वाटप प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असेही कुणाल यांनी सांगितले.
राज्यातील ४० मतदारसंघात सकाळी ७ ते संध्याकाळी ६ यावेळेत मतदान घेण्यात आले. मतदानाचा शेवटचा एक तास कोविडबाधितांना मतदान करण्यासाठी ठेवण्यात आला होता. राज्यातील १०० मतदान केंद्रांचे ऑनलाइन पद्धतीने निरीक्षण करण्यात आले. मतदान प्रक्रिया सुरू असताना तांत्रिक कारणास्तव १४ कंट्रोल पॅनल, ८० बॅलेट मशीन आणि १२ व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आली. राज्यातील निवडणूक मतदानासाठी १०५ पिंक मतदान केंद्रे, ४० मॉडेल मतदान केंद्रे, ८ दिव्यांग मतदान केंद्रे आणि ११ पर्यावरणपूरक मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती, असेही कुणाल यांनी सांगितले. जाहीर प्रचार समाप्तीनंतरच्या काळात सोशल मीडियावरील ३० पोस्ट काढून टाकण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या एकूण ६१२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ६० टक्के तक्रारी खर्या होत्या, असेही कुणाल यांनी सांगितले.
निवडणूक काळात
१२ कोटींचा ऐवज जप्त
राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आल्यानंतर सुमारे १२ कोटी ७२ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यात रोख ६.६६ कोटी रुपयांचा समावेश आहे. सुमारे ३ कोटी ५७ लाख रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे, असेही कुणाल यांनी सांगितले.
मतपेट्या कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवणार
उत्तर गोव्यातील सर्व मतदारसंघातील मतपेट्या आल्तिनो-पणजी येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयात आणि दक्षिण गोव्यातील सर्व मतदारसंघातील मतपेट्या दामोदर महाविद्यालयात कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात येणार आहेत, असेही कुणाल यांनी सांगितले.