आग दुर्घटनेची सविस्तर चौकशी होणार

0
19

>> मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकार्‍यांना आदेश; समिती स्थापन करण्याचीही सूचना

पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील बर्जर बेकर पेंट या रंग तयार करणार्‍या कंपनीला लागलेल्या भीषण आगीची सविस्तर चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. त्यासाठी एका समितीची स्थापना करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आगीची चौकशी करण्याबरोबरच ही आग वाढत जाऊन आगीने भीषण रूप कसे धारण केले, त्याची देखील सखोल चौकशी केली जावी, अशी सूचनाही सावंत यांनी केली आहे. चौकशी अहवालानुसार पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

या भीषण अग्नितांडवामुळे पिळर्ण व आसपासच्या गावात जल व हवा प्रदूषण किती झाले आहे, त्याची तपासणी केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. हवा व जल प्रदूषणावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ सातत्याने परिसरातील वायू प्रदूषणाचा स्तर तपासून पाहत आहे. तसेच सुमारे २०० लोकांना अन्य स्थळी हलवण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आग विझवण्यास वापरले
तब्बल १२ लाख लीटर पाणी

ही आग एवढी भीषण होती की, ती विझवण्यास तब्बल १२ लाख लीटर एवढे पाणी व ४ टन एवढे फोम लागले. तसेच आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या १०० जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ती आटोक्यात आणली. नौदल व एमपीटीकडूनही त्यासाठी मदत मिळाली, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी अजित कामत यांनी दिली.

बर्जर बेकर पेंट कारखाना अजूनही धुमसतोय

आगीवर काही प्रमाणात नियंत्रण; संपूर्ण कारखाना भस्मसात

पिळर्ण येथील औद्योगिक वसाहतीतील बर्जर बेकर पेंट या कारखान्याला मंगळवारी दुपारी लागलेली आग बुधवारपर्यंत धुमसत होती. आगीवर काहीसे नियंत्रण आले तरी कारखान्याच्या अंतर्गत भागात आग अजूनही धुमसत आहे. अग्निशामक दलाचे जवान मंगळवारी रात्रभर आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर बुधवारी दुपारी काही प्रमाणात आग नियंत्रणात आली, असे अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

आगीमुळे कारखान्याची मोठी हानी झाली असून, संपूर्ण कारखाना आगीत भस्मसात झाला आहे. कारखान्याचा स्लॅब बेसमेंटवर पडल्यामुळे प्रथम स्लॅब हटवण्याचे काम हाती घेतले असून, त्यासाठी जवान प्रयत्न करीत आहेत. सदर स्लॅब हटवल्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण होऊ शकते, असेही सदर अधिकार्‍याने सांगितले.

आणखी एका दिवसानंतर आगीवर नियंत्रण
अग्निशामक दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे कारखान्याला लागलेल्या भीषण आगीवर बुधवारी सकाळी ६.३० वाजेपर्यंत बर्‍यापैकी नियंत्रण आणण्यात यश आले असले तरी ही आग अद्याप पूर्णपणे विझवणे शक्य झालेले नाही. कारखान्यातील काही भागात अजूनही आग धुमसत आहे, अशी माहिती आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल दिली.

आगीची न्यायालयीन चौकशी करा : आरजी
पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील बर्जर बेकर पेंट कारखान्याला लागलेल्या आगीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने काल एका निवेदनाद्वारे उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांच्याकडे केली. या अग्नितांडवामुळे आसपासच्या परिसरात जे हवा प्रदूषण झालेले आहे, त्याची ६ ते ८ तासांच्या अंतराने तपासणी केली जावी, अशी मागणी देखील आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी निवेदनातून केली.