आगोंद किनाऱ्यावर दोन शॅक्सना आग

0
4

>> एका कामगाराचा मृत्यू, सहाजण जखमी, कोट्यवधींचे नुकसान

काणकोण तालुक्यातील आगोंद धवलखाजन येथील किनाऱ्यावरील शिवलिंग चलवादी आणि मनोज पागी यांच्या सॉलमेट आणि ओंकार या दोन हंगामी शॅक्सना मंगळवार 25 रोजी रात्री आकस्मिक आग लागली. या आकस्मिकरित्या लागलेल्या आगीत एका कामगाराचे जळून निधन झाले तर 6 कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत.

या आगीमुळे शॅक्समालकांचे जवळ जवळ दोन कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. काणकोण अग्निशामक दलाच्या पथकाने प्रसंगावधान राखून घटनास्थळी धाव घेतली आणि ज्या आस्थापनाला आग लागली होती त्या शेजारची जवळ जवळ सहा आस्थापने वाचवण्यात अग्निशामक दलाला यश आहे. त्यामुळे फार मोठा अनर्थ टळला आहे. मात्र चलवादी यांच्या आस्थापनाची राखरांगोळी झाली आहे. काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवलिंग चालवादी यांच्या आस्थापनाच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. काम संपवून कामगार घरी गेले असता रात्री साधारणपणे 1 च्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती काणकोण अग्निशामक दलाला मिळाली. काणकोण अग्निशामक दलाचे प्रमुख धीरज देसाई यांनी आगीची कल्पना मिळताच कुंकळळी, कुडचडे, मडगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी 9 बंबलागले. त्याचबरोबर करोडो रूपयांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यात आले, अशी माहिती धीरज देसाई यांनी दिली.

श्री. चलवादी मागील कित्येक वर्षांपासून या किनाऱ्यावर व्यवसाय करीत असून पर्यटक हंगाम संपल्यानंतर त्यांनी आपले आस्थापन बंद ठेवले होते. काही ठिकाणी दुरूस्तीचे काम सुरू होते. आकस्मिक लागलेल्या आगीत त्यांचे जवळ जवळ 13 एसी युनिट, 4 फ्रीज, 7 सिलिंडर, सोफा सेट आणि अन्य महत्वााो फर्निचर व साहित्य जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली की अन्य कारणाने हे नेमके समजू शकले नाही. काणकोण पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या ठिकाणी चार चाकी वाहने जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे खूप अडचणींचा सामना करीत अग्निशामक दलाला घटनास्थळी जावे लागले. जळालेल्या कामगाराचा मृतदेह पोलिसांनी मरणोत्तर तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. आणि पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.