आगामी विधानसभा अधिवेशन 6 दिवसांचे

0
16

>> 2 ते 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार; राज्यपालांकडून आदेश जारी

गोवा विधानसभेचे आगामी अधिवेशन 2 ते 9 फेब्रुवारी असे सहा दिवस घेतले जाणार आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी विधानसभा अधिवेशन येत्या 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता बोलावण्याचा आदेश काल जारी केला. राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे.

या अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्याचा वर्ष 2024-25 चा वार्षिक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प लवकर सादर केला जाणार आहे. 2 फेब्रुवारीला राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर आणखी काही कामकाज होणार नाही. 5 ते 9 फेब्रुवारी या 5 दिवसांच्या काळात प्रश्न विचारात घेतले जाणार आहेत. या अधिवेशनात आमदारांना प्रश्न विचारण्यासाठी ते सादर करण्याची मुदत 9 ते 13 जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे.

या अधिवेशनात दि. 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांना उत्तरे दिली जाणार आहेत. दि. 6 रोजी मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांना उत्तरे दिली जातील. दि. 7 रोजी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांना उत्तरे दिली जाणार आहेत. दि. 8 रोजी वनमंत्री विश्वजीत राणे, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांना उत्तरे दिली जातीत आणि दि. 9 रोजी कृषीमंत्री रवी नाईक, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांना उत्तरे दिली जाणार आहेत.

या अधिवेशनात 9 फेब्रुवारीला खासगी कामकाजाचा दिवस होणार आहे. या खासगी कामकाजासाठी ठराव, विधेयक सादर करण्यासाठी 24 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आमदार या अधिवेशनासाठी आपले प्रश्न, लक्षवेधी सूचना, शून्य प्रहर नोटीस आदी विधानसभा सचिवालयातील नोटीस बॉक्समध्ये टाकू शकतात किंवा ऑनलाइन पद्धतीने निर्धारित वेळेत पाठवू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख अस्पष्ट
गोवा विधानसभेच्या आगामी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. दरवर्षी मार्च महिन्यात मांडला जाणारा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकांमुळे लवकर सादर केला जाणार आहे. आगामी अधिवेशनातील विधानसभा कामकाजाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले असले, तरी अर्थसंकल्प कधी सादर होणार याची तारीख अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.