चाणाक्ष गुप्तहेर जेम्स बॉण्ड चित्रपटांत एकाहून एक खतरनाक शत्रूंचा खात्मा करीत असला, तरी त्याच्या आगामी चित्रपटाची पटकथाच पळवण्यात हॅकर्सना यश आले आहे. ‘स्पेक्टर’ नामक या आगामी बॉण्डपटाची पटकथाच सोनी पिक्चरवरील सायबर हल्ल्यात गायब केली गेली आहे. सोनी स्टुडियोतील संगणकांमध्ये प्रवेश मिळवण्यात हॅकर्सना यश आले होते. त्या संगणकावरील सारी माहिती हॅकर्सनी पळवली, त्यात आगामी चित्रपटाची पटकथाही असल्याचे स्पष्ट झाले. ही पटकथा हॅकर्सनी सर्वांना खुली केल्याने सोनी पिक्चर्सला मोठा फटका बसला आहे. ज्यांना ही पटकथा मिळाली आहे, ते ती प्रकाशित करतील अशी भीती आता निर्मात्यांना वाटत आहे.
स्पेक्टर मध्ये डॅनियल क्रेग ००७ जेम्स बॉण्डची भूमिका करीत असून ६ नोव्हेंबर २०१५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणास नुकतीच सुरूवात झाली होती. त्यावेळी निर्मात्या बार्बारा ब्रोकोली, दिग्दर्शक सॅम मेंडीस यांनी चित्रपटाचे नाव, त्यातील कलाकार आणि नव्या कारची माहिती उघड केली होती, मात्र कथानक गुप्त ठेवले होते.