आगामी अधिवेशनाचे दिवस वाढवा : आलेमाव

0
4

>> सरकारकडे मागणी; कामकाज सल्लागार समितीचे अध्यक्ष रमेश तवडकर यांनाही लिहिले पत्र

विधानसभेचे अधिवेशन केवळ एका दिवसापुरते मर्यादित ठेवणे, तसेच महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेसाठी कमी वेळ देणे ह्या भाजप सरकारच्या धोरणामुळे राज्यातील लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. सरकारने आगामी विधानसभा अधिवेशनाचे दिवस वाढवावेत, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय ह्या धोरणावर कडक शब्दांत टीका करणारे एक पत्र युरी आलेमाव यांनी सभापती तथा कामकाज सल्लागार समितीचे अध्यक्ष रमेश तवडकर यांना लिहिले आहे.

विधानसभेचे आगामी अधिवेशन 6 व 7 फेब्रुवारी रोजी केवळ दोन दिवसांचे बोलावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर युरी आलेमाव यांनी ही मागणी केली आहे.
लोकांचा आवाज बनून सरकारला त्यांच्या चुका दाखवून देणे हे विरोधी पक्षांचे काम आहे. आणि त्यासाठी विरोधकांना विधानसभेत जास्तीत जास्त बोलण्यास वेळ मिळाला पाहिजे, असे आलेमाव यांनी या पत्रात म्हटले आहे.

विरोधी पक्षांच्या आमदारांना विधानसभेत लोकांचे सर्व प्रश्न सविस्तरपणे मांडता यावेत यासाठी अधिवेशनाचे दिवस वाढवायला हवेत, असे आलेमाव यांनी म्हटले आहे. बऱ्याच तारांकित प्रश्नांचे रुपांतर अतारांकित प्रश्नांत केले जात असल्याने पारदर्शकता कमी होण्याबरोबरच लोकशाही तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. विरोधी आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे 48 तासांपूर्वी देणे बंधनकारक असतानाही ही उत्तरे ऐनवेळी दिली जातात. परिणाम विरोधी आमदारांना उत्तरांचा अभ्यास करण्यास वेळ मिळत नसल्याचे आलेमाव यांनी निदर्शनास आणून दिले.

अधिवेशनात सर्व खात्यांवर चर्चा व्हावी आणि जनतेचे, राज्याचे प्रश्न मांडता यावेत यासाठी अधिवेशनाचे दिवस वाढवण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.