राज्यातील काही समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करत आहेत आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करत आहेत. त्यामुळे त्या पोस्टवर सोशल मीडियावर वाद घालण्यापेक्षा त्याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवाव्यात, असे आवाहन गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी केले.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टच्या संदर्भात फौजदारी गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
सर्वसामान्य जनतेने समाजकंटकांकडून आक्षेपार्ह मजकुराच्या प्रकारांना बळी पडू नये. हे समाजकंटक़ जुन्या पोस्टचा पुन्हा पुन्हा व्हायरल करत असल्याचेही निदर्शनास आले आहे, असेही डॉ. सिंग यांनी म्हटले आहे.
राज्यातील नागरिकांनी अशा आक्षेपार्ह पोस्टवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा अशा घटनांची तक्रार पोलिसांकडे करावी. खरे तर अशा पोस्टवर प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांनी एकतर प्रतिवाद पोस्ट केल्यास किंवा आंदोलन केले तर हे समाजविरोधी घटक त्यांच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होतील. या घटकांना तेच हवे आहे. त्यामुळे अशा घटकांना गजाआड करण्यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर प्रकरणांचा तपास हा अत्यंत तांत्रिक आणि दीर्घकाळ चालणारा आहे. त्यामुळे लोकांनी पोलिसांचे सहकार्य घ्यावे, असे आवाहन डॉ. सिंग यांनी केले.