साखळीतील कार्यक्रमास येताना अपघात
साखळी येथील रवींद्र भवनामधील चित्रप्रदर्शनासाठी येणार्या आंयी (दोडामार्ग) येथील नवदुर्गा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना टेम्पो रिक्षाला अपघात होऊन त्यात १४ विद्यार्थी जखमी झाले. यापैकी ५ विद्यार्थ्यांना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले असून ९ जणांना साखळीतील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद साखळी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.याबाबत वृत्त असे की, दोडामार्ग तालुक्यातील आंयी येथील नवदुर्गा विद्यालयाला साखळी येथील रवींद्र भवनमध्ये क्रांतीविरांचे चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी पत्र देण्यात आले होते. त्याप्रमाणे गुरुवारी तेथे मुलांना नेण्याचा निर्णय शाळेचे मुख्याध्यापक संभाजी कोळी यांनी घेतला. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ५० रु. प्रवास शुल्क आकारण्यात आले होते. त्याप्रमाणे २० विद्यार्थी व २० विद्यार्थीनी यांना नेण्याचे ठरले. त्यात ८वी, ९वी, १०वीचे विद्यार्थी होते.
आंयी साखळी हे अंतर ९ कि.मी. एवढे आहे. विद्यार्थ्यांना नेण्यासाठी याठिकाणी खाजगी बसेस तसेच इतर वाहनेही भाड्यावर मिळतात. परंतु शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी या शाळेचे शिपाई उमेश तळकटकर यांची टेम्पो रिक्षा जीए-०४-टी-४२०८ तसेच एक खाजगी जीप अशी दोन वाहने ठरवली. सकाळी ९.१५ वा. एका जीपमध्ये मुलींना तर या टेम्पो रिक्षामध्ये मुलांसह एकूण २४ जणांना कोंबण्यात आले.
आंयी, साखळी, पर्ये, मार्गे सुसाट वेगाने निघालेल्या या टेम्पो रिक्षा चालक उमेश तळणकर एका वळणावर रिक्षेवरील ताबा सुटल्याने टेम्पो रिक्षा रस्त्यावर उलटी होऊन त्यामध्ये असलेले विद्यार्थी एकमेकांवर पडल्याने त्यात १४ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच स्थानिक लोकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व विद्यार्थ्यांना साखळी येथील आरोग्य केंद्रात तात्काळ उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची वार्ता गावात कळताच या मुलांचे पालक तसेच ग्रामस्थ यांनी तात्काळ साखळी येथील आरोग्य केंद्रात धाव घेतली. विद्यार्थ्यांकडून प्रवास शुल्क घेवून भाड्याची बस का केली नाही. असा सवाल करून अपघातास शिक्षक वर्गच जबाबदार असल्याचा आरोप पालकांतून होत आहे.
या अपघातात पवन गोसावी, हरिशचंद्र गोलकर, रुपेश गवस, नामदेव शेळके, विष्णू शेटकर, विराज शेटकर, सुंदर गवस व इतर विद्यार्थ्यांवर साखळी आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. साईराज गोसावी, साईनाथ सावंत, अंकूश घोलकर, सिद्धेश उसपकर, मनोज शेटकर यानी गंभीर जखमा झाल्याने अधिक उपचारासाठी बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त आंयी गावात समजताच पालकामध्ये घबराट निर्माण झाली. अनेक पालक व ग्रामस्थ यांनी साखळी आरोग्य केंद्रात तातडीने धाव घेतली. त्यामुळे याठिकाणी पालकांची मोठी गर्दी झाली.
पंचनामाविना रिक्षा हटवली
हा अपघात होऊन सर्व मुलांना बाहेर काढल्यानंतर अपघातग्रस्त टेम्पो रिक्षा उभी करून पंचनामा न करता अपघात स्थळावरून अर्धा कि.मी. अंतरावर रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवलेली आढळून आली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला नव्हता.