>> पर्वरी व सिंधुदुर्ग पोलिसांची संयुक्त कारवाई; खून प्रकरणी दोघांना अटक
प्रेमसंबंध फिस्कटल्याच्या रागातून एका 22 वर्षीय तरुणाने 30 वर्षीय तरुणीचा पर्वरीत खून केल्याची घटना काल उघडकीस आली. मृत तरुणीचे नाव कामाक्षी शंकर उद्दापनोवा (सध्या रा. पर्वरी) असे असून, ती मूळ कर्नाटकातील रहिवासी होती. या प्रकरणातील मुख्य संशयित प्रकाश चुंचवाड हा असून, त्याने पोलीस चौकशीत खुनाची कबुली दिली. तसेच कामाक्षीचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर संशयिताला सोबत घेत आंबोली घाटात शोधमोहीम राबवली. त्यावेळी खोल दरीत तिचा मृतदेह आढळून आला. पर्वरी व सिंधुदुर्ग पोलिसांच्या 5 तासांच्या संयुक्त कारवाईनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, या प्रकरणी दुसरा संशयित निरुपदी कडकल (23) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रकाश चुंचवाड आणि कामाक्षी उद्दापनोवा यांचे पर्वरीत एक गॅरेज चालवत होते. या दरम्यान त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध जुळले. काही काळाने त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर प्रकाशने कामाक्षी हिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या घटनेच्या आधी दोन दिवसांपूर्वीच कामाक्षीने प्रकाशविरुद्ध म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. म्हापसा पोलिसांनी प्रकाशला कडक शब्दांत समज दिली होती. तसेच त्यावेळी त्याच्याकडून कामाक्षी हिला यापुढे त्रास देणार नाही, असेही लिहून घेतले होते.
या तक्रारीनंतर कामाक्षी बेपत्ता झाली होती, त्याविषयीची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी 30 ऑगस्टला पर्वरी पोलीस स्थानकात नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी संशयित प्रकाश चुंचवाड याला ताब्यात घेतले आणि कसून त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला.
कामाक्षी ही तिच्या गोवा पर्वरी येथील फ्लॅटवर एकटी राहत असल्याची संधी साधून बुधवारी 30 ऑगस्टला दुपारच्या सुमारास प्रकाशने चाकूने भोसकून तिचा खून केला होता. तो मृतदेह कारमधून आणून त्याच दिवशी रात्री आंबोली घाटात फेकला होता.