आंबा व काजूच्या चांगल्या उत्पादनासाठी…

0
12
  • सौ. शिवांगी पैदरकर-बर्वे
    (सहाय्यक कृषी अधिकारी, धारबांदोडा)

यावर्षीच्या हंगामाचा विचार केल्यास बदलत्या हवामानाचा परिणाम काही अंशी काजू व आंबा बागांवर झालेला दिसतो. मोहोर तर वेळच्या वेळी नोव्हेंबर महिन्यात आलाच, परंतु थंडी गायब होऊन अवकाळी पडलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी मोहर गळून पडलेला दिसून येतो व झाडांना नवीन पालवी फुटली आहे. निसर्गाचे चक्र पाहिल्यास यंदाचा हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे.

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे
कड्या-कपाऱ्यां मधुन घट फुटती दुधाचे!!

पश्चिमेला समुद्र आणि दक्षिणेला सह्याद्री पर्वताच्या रांगेने वेढलेल्या या प्रदेशाच्या निसर्गसौंदर्याचे वर्णन करायचे म्हटले तर शब्दच अपुरे पडतील! ही परशुरामभूमी नव्हे तर देवभूमी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. घनदाट जंगले, डोंगरउतारावर काजू, टप्प्याटप्प्याने केली जाणारी भातशेती, माड, सुपारी, आंबे, फणस आणि सर्वांगाने परिपूर्ण असणारे ‘कुळागर’ हे गोव्याच्या कृषिक्षेत्रासाठी वरदानच म्हणावे लागेल. काणकोणपासून पेडण्यापर्यंत लावल्या जाणाऱ्या हंगामी भाज्या, जसे की- सुरण, अळू, कणंग, कारांदे, भोपळा, तवशी, दोडकी, कारली आदी म्हणजे जणू गोव्यासाठी ‘चेरी वॉन दी केक’ म्हणायला हरकत नाही!
गोव्यातील शेतकरी आत्ताच कुठे खरीप हंगामातील भाताची लावणी करून, नारळाचा पाडा करून विसावा घेत होता, तोच डोंगरावरच्या काजू, कुळागरात असलेला मानकुराद आंबा साद घालू लागलाय. चला तर आज पाहूया काजू आणि आंबा लागवडीचे तंत्र आणि मंत्र.

काजू
गोव्यामध्ये काजू हे एक प्रमुख पीक, ज्याचा विस्तार सरासरी 55,000 हेक्टर क्षेत्रफळावर झालेला आहे. पर्यटनदृष्ट्या गोव्यातील काजू सातासमुद्रापलीकडे पोहोचला आहे. फेणीला मिळालेल्या जीआय टॅगमुळे (भौगोलिक मानांकन) त्याचे महत्त्व वाढले आहे. डिसेंबरचा पंधरवडा व जानेवारीच्या सुरुवातीस काजू बागायतदारांमध्ये एकच गडबड चाललेली असते, ती म्हणजे, काजूबागेतील तण काढण्याची. गोव्यातील काजू बागायती या बऱ्यापैकी पारंपरिक आहेत, आणि स्थानिक बियाण्यांपासून तयार केलेली रोपे लावणे शेतकरी पसंद करतात. त्याचबरोबर वेंगुर्ला- 7 वेंगुर्ला- 4, गोवा- 1 यांसारख्या जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांची कलमे लावण्याची शिफारस केली जाते.

समुद्रसपाटीपासून 700 मीटर उंचीच्या प्रदेशात आणि कमीत कमी 400 मिलिमीटर व जास्तीत जास्त 4000 मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या भागात काजू पीक चांगले येते. काजू पिकाला गोव्याचे उष्ण व दमट हवामान फारच अनुकूल आहे. 77 मीटर किंवा 88 मीटर याप्रमाणे हेक्टरी 155 ते 200 झाडे बसतात. खड्ड्यांची लांबी-रुंदी-खोली 0.6 0.60.6 मीटर असावी. खड्ड्यात दीड ते दोन घमेली (कायल) चांगले कुजलेले कंपोस्ट, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा हाडांची पूड मातीत मिसळावी. वाळवी नियंत्रणासाठी 2 टक्के मिथाईल पॅराथियॉन 50 ग्रॅम भुकटी प्रती खड्ड्यात टाकावी.

गोव्यात काजूची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीस म्हणजे जून-जुलैमध्ये करावी. पाणीपुरवठ्याची सोय असल्यास यानंतरही लागवड केली तरी चालू शकते. तुम्ही जर कलमाद्वारे लागवड करत असाल तर प्लास्टिकची पिशवी चाकू वा ब्लेडने कापून अलगदपणे काढून टाकावी. कलमांची हंडी फुटणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कलम दगावण्याची शक्यता असते. कलमांना काठीने आधार द्यावा.
कलमाच्या खुंटावर जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी तसेच कलमाच्या जोडावरील प्लास्टिक पट्टीही काढून टाकावी. पाऊस कमी झाल्यावर ऑक्टोबरमध्ये कलमांच्या बुंध्याभोवती 2 टक्के फॉलीडॉल पावडर टाकून गवत किंवा काळ्या प्लास्टिक कागदाचे आच्छादन करावे. यामुळे जमिनीत ओलावा धरून ठेवण्यास मदत होते. तुम्ही जर सेंद्रिय शेती करत असाल तर जमलेला पालापाचोळाही तुम्ही आच्छादन म्हणून वापरू शकता. पहिल्या वर्षी हिवाळ्यात दर पंधरा दिवसांनी, तर उन्हाळ्यात दर आठ दिवसांनी प्रतिकलम पंधरा लिटर पाणी घालावे. कलमांचे मोकाट जनावरांपासून व आगीपासून संरक्षण करण्यासाठी कुंपण बनवावे. 77 मीटर अंतरावर काजू लागवड केल्यास सुरुवातीच्या काळात नाचणी तसेच इतर भाजीपाला पीक घेता येते. काजू बागायतीमध्ये ड्रिप सिंचनाचा वापर करण्याचीही शिफारस आता केली जाते. ड्रिप सिंचनामुळे पाणी योग्य रीतीने रोपांना तर मिळतेच परंतु पाण्याची बचतही होते.

वर म्हटल्याप्रमाणे गोव्यातील शेतकरी हा काजू पारंपरिक बियाण्यांपासून लावतो. तसेच गोव्यातील काजू बागायती या सेंद्रिय आणि काही प्रमाणात प्राकृतिक आहेत. काजूच्या कलमांना चौथ्या वर्षापासून प्रत्येकी चार घमेली शेणखत किंवा हिरवळीचे खत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 500 ग्राम म्युरिट ऑफ पोटॅश ही खते ऑगस्ट महिन्यात द्यावी. खते झाडाच्या विस्ताराच्या थोडीशी आत बांगडी किंवा रिंग पद्धतीने चर खोदून द्यावीत. वर दिलेली खताची मात्रा पहिल्या वर्षी 1/4, दुसऱ्या वर्षी 1/2, तिसऱ्या वर्षी 3/4 मात्रा व चौथ्या वर्षी आणि त्यानंतर खताची पूर्ण मात्रा द्यावी.

जमिनीवर गळून पडलेल्या फळावरील तयार बिया गोळा कराव्यात किंवा बोंड पूर्णपणे पिकल्यानंतर काढावे. बोंडापासून बिया वेगळ्या कराव्यात. बिया उन्हामध्ये सात ते आठ दिवस वाळवाव्यात. बोंडे जानेवारी ते एप्रिल या कालावधीत काढणीस तयार होतात. बियांपासून तयार झालेल्या झाडांपासून सरासरी दोन किलो तर सुधारित जातीपासून 15-20 किलो बियांचे उत्पन्न 12 व्या वर्षापासून मिळते.
काजूची फलधारणा व उत्पन्न वाढवण्यासाठी स्वस्त अशा सुकविलेल्या माशांचा अर्क 500 ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून काजूच्या झाडावर फुले येताना व पहिल्या फवारणीनंतर दहा दिवसांनी, असा दोनदा फवारावा. काजूचे उत्पादन वाढवण्यासाठी 10 पीपीएम इथरेल या संजीवकाची (ग्रोथ हार्मोन्स) पहिली फवारणी पालवी आल्यावर व दुसरी फवारणी मोहर येताना करावी. काजू बियांचे उत्पादन व बियांचे आकारमान वाढविण्यासाठी प्रति झाड ताज्या किंवा 8 दिवसापर्यंत साठवलेल्या 25 टक्के गोमूत्राची फवारणी आणि 25 % गोमूत्राची झाडाच्या बुंध्यामध्ये जिरवणी करण्याची शिफारस केली जाते. ऑक्टोबर महिन्यापासून दर महिन्याला एक वेळ अशी चार महिने ही पद्धत करण्याचीही शिफारस आहे.

गोव्यात काजू पिकामध्ये काजूवरील ढेकण्या (टी मॉस्कीटो बग) आणि खोड किडा ज्याला आपण ‘रोटा’ म्हणतो, या किड्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. काजूवरील ढेकण्या ही कीड झाडांना नवीन पालवी आल्यापासून ते फलधारणेपर्यंत उपद्रव करते. कीड मोहरातील व नवीन पालवीतील रस शोषून घेते, त्यामुळे मोहर सुकून जातो व फळे गळतात. या किडीचा आणि फुलकिडीचा बंदोबस्त करण्यासाठी झाडाला ऑक्टोबर महिन्यात नवीन पालवी फुटण्याच्या वेळी, मोहर फुटण्याच्या वेळी आणि फलधारणेच्या वेळी कीटकनाशकांच्या तीन फवारण्या करणे आवश्यक आहे. यातील पहिल्या फवारणीसाठी प्रवाही मोनोक्रोटोफॉस 36% – 15 मि.ली. किंवा प्रवाही लेंबडा साईहॅलोथ्रोन 5 टक्के – 6 मि.ली., दुसऱ्या फवारणीसाठी प्रवाही प्रोफेनोफोस 50 टक्के – 10 मि.ली., तर तिसऱ्या फवारणीसाठी पाण्यात मिसळणारी कार्बारील पावडर 50% – 20 ग्राम किंवा प्रवाही लॅमडाऊन 5 % – सहा मि.लि. दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तुम्ही नैसर्गिक शेती करत असाल तर झाडावर येणाऱ्या लाल मुंग्यांचे संरक्षण करावे. या मुंग्या काजूवरील ढेकण्यांना खाऊन टाकतात.

गोव्यातील शेतकरी हा रोठा किंवा खोडकिडा या किडीमुळे त्रस्त असलेला दिसून येतो. ही कीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. किडीचा प्रादुर्भाव मुख्यतः झाडाचे खोड तसेच उघडी मुळे यांवर आढळतो. संपूर्ण झाड मरून जाते. त्यासाठी झाडाची प्राथमिक साल काढून, झाडातील रोठ्याला बाहेर काढून मारून टाकावे. तो भाग 20 टक्के प्रवाही क्लोरोपायरीफॉस 50 मि.ली. दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून चांगला भिजवावा आणि क्लोरोपायरीफॉस 10 मि.ली. + 50 मि.ली. रॉकेल किंवा 76 टक्के प्रवाहित 10 मि.ली. + 50 मि.ली. रॉकेल छिद्रामध्ये ओतावे.

फांदी मर किंवा पानावरील करपा हे दोन रोग काजू बागायतीमध्ये दिसून येतात. फांदी मर या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडांच्या फांद्या टोकाकडून खाली वाळत जातात. रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रादुर्भाव झालेल्या फांद्या कापून टाकाव्यात व कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. पानावरील करपा या रोगामध्ये पानावर करड्या पिंगट रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्णपणे पाने करपतात व गळून पडतात. रोगाच्या नियंत्रणासाठी बागांची योग्य काळजी घ्यावी तसेच एक टक्का बोर्डो मिश्रण अथवा 0.2 टक्के मेन्कोझेब या बुरशीनाशकाची फवारणी आवश्यकतेनुसार करावी.

आंबा
आंबा या पिकाला उत्तम निचऱ्याची जमीन लागते. थोड्याशा आम्लयुक्त जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. गोव्यातील डोंगरउताराच्या तसेच वर्कस पडीक जमिनी या पिकास योग्य आहेत. भारी चिकण मातीच्या, पाणी साठवून राहणाऱ्या तसेच खार जमिनी या पिकाच्या लागवडीस योग्य नाहीत. हे पीक दमट तसेच कोरड्या हवामानातही चांगले येते. परंतु फुलोऱ्याच्या आणि फळवाढीच्या अवस्थेत पाऊस नसावा. भरपूर सूर्यप्रकाश या पिकास अत्यंत आवश्यक आहे.

‘हापूस’, ‘रत्ना’, ‘सिंधू’, ‘सुवर्णा’, ‘कोकण रुची’, ‘कोकण राजा’ आणि ‘कोकण सम्राट’, या जाती कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या विद्यापीठाने विकसित केल्या आहे आणि कोकणाबरोबरच गोव्यासाठीही त्यांची शिफारस केली जाते. याचबरोबर गोयकारांचा आवडता मानकुराद आंबाही शेतकरी लावतात. तसेच ‘मालगेस’, ‘हिलारियो’, ‘मुसराद’, ‘कुलासो’, ‘फर्नादिन’ अशा स्थानिक जाती गोव्यामध्ये आढळतात.

लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील झाडे-झुडपे तोडून जमीन स्वच्छ करावी. नंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल-मे महिन्यात 1010 मीटर अंतरावर 111 मीटर आकाराचे खड्डे काढून ते चांगली माती आणि तीन-चार घमेली कंपोस्ट किंवा शेणखत आणि तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून तयार ठेवावेत. पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची तयार केलेली कलमे लावून लागवड करावी. कोकणामध्ये 55 मीटर अंतरावर आंब्याची घनपद्धतीने लागवड करण्याची शिफारसदेखील करण्यात आली आहे. मात्र, या पद्धतीने लागवड केल्यास झाडाची नियमितपणे छाटणी करणे आवश्यक आहे.

कलमांची पिशवी अलगद कापून काढावी व पिशवीतील कलम मातीच्या हुंडीसह भरलेल्या खड्ड्याच्या मध्यभागी ठेवून कलम लावावे. लागवड करतेवेळी कलमाचा जोड जमिनीच्या थोडा वर राहील असे पाहावे. कलमासाठी बांधलेली प्लास्टिक पट्टी जोडावर असल्यास काढून टाकावी व लागवडीनंतर कलमांना काठीचा आधार द्यावा. कलमांना वाळवीपासून त्रास होऊ नये म्हणून लागवड करतेवेळी प्रत्येक खड्ड्यात 100 ग्रॅम 2 टक्के किंवा 10 टक्के कार्बारील पावडर टाकावी.

कलमांचे भटक्या जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक कलमाभोवती वा संपूर्ण बागेला काटेरी तारेचे, दगडाचे अथवा काटेरी झाडांचे कुंपण करावे. सर्वसाधारणपणे पाचव्या वर्षापासून उत्पन्न येण्यास सुरुवात होते. उन्हाळ्यात कलमांच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी, म्हणजे खोडाचे कडक उन्हापासून संरक्षण होते. पहिली तीन वर्षे कलमांना पाणी द्यावे व जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. हिवाळ्यात पहिल्या वर्षी आठवड्यातून एकदा, तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून एकदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून एकदा प्रत्येक कलमाला दोन बालद्या म्हणजेच तीस लिटर पाणी द्यावे. उन्हाळ्यात पाणी वरीलप्रमाणे परंतु दोन वेळा द्यावे. जागेवरच रोपे वाढवून त्यावर कलमे केल्यास त्यांना पाणी द्यावे लागत नाही. पाण्यासाठी केलेल्या आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.

दहा वर्षांवरील प्रत्येक झाडास 50 ते 100 किलो कुजलेले शेणखत द्यावे. या सेंद्रिय खताबरोबर नत्र (1.5 कि. ग्रॅम), स्फुरद (0.500 कि. ग्रॅम) आणि पालाश (1 कि. ग्रॅम) सल्फेट ऑफ पोटॅशमधून जूनमध्ये द्यावी. खते कलमाच्या विस्ताराच्या थोडीशी आत सुमारे 45 ते 60 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर खोलवर चर खणून द्यावीत. त्या चरामध्ये प्रथम पालापाचोळा, शेणखत टाकून, त्यावर रासायनिक खते टाकून मातीने चर बुजवून घ्यावा. खत देण्याआधी तण काढून टाकावे.

आंबा कलमांना सर्वसाधारणपणे पाचव्या वर्षापासून येणारा मोहोर फळे घेण्यासाठी ठेवावा. मोहर येण्याचा काळ हा हवामान, त्याचप्रमाणे बागेची निगा यावर अवलंबून असतो. साधारणपणे नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत मोहोर येण्याची क्रिया चालू असते. मोहोर आल्यापासून सुमारे 100 ते 120 दिवसांत फळे तयार होतात.

हापूस जातीच्या झाडांना वर्षांआड किंवा अनियमित फलधारणा होत असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी उत्पन्न मिळत नाही. या अनुवांशिक समस्येवर संशोधन करताना पेक्लोबुट्रोझोल हे वाढ निरोधक संजीवक उपयुक्त आहे. या संजीवकाच्या वापरामुळे झाडांमध्ये जिब्रेलिन्स या वाढ उत्तेजकाच्या निर्मितीत व्यत्यय येऊन अवाजवी शाखीय वाढ कमी होते आणि नियमित मोहोर येऊन फलधारणा होण्यास मदत होते.
काढावयास तयार झालेल्या फळांचा गर्द हिरवा रंग जाऊन फिक्कट पिवळसर हिरवा होतो. देठाजवळ खड्डा पडतो व दोन्ही खांदे उंचावतात. झाडावरून एखाद दुसरे पिकलेले फळ गळून पडते. काढणी सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी चारनंतर करावी. पक्व झालेली फळे अलगद देठासह काढावीत व सावलीत ठेवावी.

काजू बागायतीशी तुलना केल्यास आंबा पिकावर अनेक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. मोहरावरील तुडतुडे मोहरातील कोवळ्या फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहर गळून पडतो. याशिवाय तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात. तो पानावर पडून नंतर त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडे किंवा फळे काळी पडतात. किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच अझाडिरॅक्टीन 1 % (10,000 पीपीएम) या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचे 30 मि.ली. प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा व्हर्टिसिलियम या बुरशीचे बीज कण (2.5 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे वापरावे). काळे डाग असलेली फळे पाच ग्राम ब्लीचिंग पावडर दहा लिटर पाण्यात टाकून तयार केलेल्या द्रावणात स्वच्छ धुवून, सावलीत कोरडी करून विक्रीसाठी पाठवावी. कोणत्याही तीव्र डिटर्जंट पावडरचा वापर करू नये.

भिरूड ही कीड खोड आणि फांद्या पोखरते. त्यामुळे पोखरलेल्या फांद्या वाळू लागतात. तारेच्या हुकाने अळ्या काढून टाकून छिद्रात बॉर्डर सोल्युशन ओतावे अथवा ॲल्युमिनियम फॉस्फाईडची एक गोळी टाकावी व छिद्र बंद करून घ्यावे.
फळमाशी फळाच्या सालीखाली अंडी घालते व दोन-तीन दिवसात अंडी उबवून अळ्या फळातील गर खाऊ लागतात. किडलेली फळे गळून पडतात. किडलेली फळे गोळा करून त्यांचा अळ्यांसह नाश करणे आवश्यक असते. फळमाशीचा प्रादुर्भाव दिसू लागताच रक्षक सापळे फळझाडावर लावावेत. प्रतिहेक्टरी 4 रक्षक सापळे वेगवेगळ्या ठिकाणी बागेत लावावेत. हे फळमाशीचे सापळे तुमच्या जवळच्या विभागीय कृषी कार्यालयामध्ये कृषी संचालनालय, गोवा यांनी वाजवी दरात उपलब्ध केले आहेत.

लहान कलमांना वाळवी लागू नये म्हणून कलम लावताना शेणखत कुजलेले वापरावे. वाळवीपासून होणारा उपद्रव्य समूळ नष्ट करण्यासाठी शेतातील वारूळ शोधून काढून त्यातील वाळवीच्या राणीचा व वारुळाचा नाश करावा. वारूळ भुईसपाट केल्यावर त्यावर कीटकनाशकाचे द्रावण मातीत मिसळून वारुळाच्या जागेवर मुरू द्यावे.

करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी बागेत स्वच्छता राखावी. रोगट फांद्या कापून काढाव्यात आणि गळून पडलेला रोगट पानांचा नाश करावा. तसेच झाडावर 1 टक्का बोर्डो मिश्रण किंवा 0.1 टक्का कार्बन्डाझिम फवारावे. आंबा फळगळ रोखण्यासाठी फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर युरिया दोन टक्के तसेच एन.ए.ए. 20 पी.पी.एम. हे ऑक्सिजन वर्गीय संजीवक फवारावे. त्याची दुसरी फवारणी दहा ते पंधरा दिवसानंतर करावी. आंब्यांची फळकुज हा काढणी पश्चात प्रमुख बुरशीजन्य रोग असून फळे काढल्यानंतर पिकण्याच्या अवस्थेपर्यंत फळांवर तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे दिसून येतात. फळे कुजतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यासाठी फळे काढणीनंतर लगेच 0.05 टक्के तीव्रतेच्या कार्बेन्डाझिम द्रावणात 10 मिनिटे बुडवून ठेवावीत आणि सावलीत वाळवावीत. 52 अंश सेल्सिअंशच्या पाण्यात दहा मिनिटे बुडवून काढावी आणि अशी फळे खोक्यात भरावीत अथवा पिकण्यासाठी बाहेत ठेवावीत.

हल्लीच्या काळात शेतकरी बाजारभाव आणि बाजार नसल्याची तक्रार करताना दिसून येतात. या सर्वावर पर्याय म्हणून फळप्रक्रिया करणे फायदेशीर आहे. अनेक तरुणांना व्यवसायाच्या संधी इथे उपलब्ध आहेत. काजू बोंडापासून सिरप, कच्च्या आंब्याचे पन्हे, आंबा वडी, आंबा बर्फी, आंब्याची साठे किंवा आंबा पोळी, आमरस इ. पदार्थ महिला बचत गटांनी एकत्र येऊन बनवल्यास महिला सक्षमीकरण होण्यास मदत होईल. रुपये साठ हजार प्रती हेक्टर अशी योजना आंबा व काजू लागवडीसाठी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन आणि गोवा सरकारच्या कृषी खात्यातर्फे दिली जाते. तसेच महिला स्वयंसाहाय्य गटांसाठी व तरुणांसाठी अनेक स्तरावर राज्यामध्ये फळ प्रक्रियेची प्रशिक्षणे दिली जातात.

यावर्षीच्या हंगामाचा विचार केल्यास बदलत्या हवामानाचा परिणाम काही अंशी काजू व आंबा बागांवर झालेला दिसतो. मोहोर तर वेळच्या वेळी नोव्हेंबर महिन्यात आलाच, परंतु थंडी गायब होऊन अवकाळी पडलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी मोहर गळून पडलेला दिसून येतो व झाडांना नवीन पालवी फुटली आहे. निसर्गाचे चक्र पाहिल्यास यंदाचा हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे.