आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य

0
4

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील जीवघेण्या व अमानुष हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार कोण, याचा छडा लावून त्याला तात्काळ अटक करावी, यासह अन्य काही मागण्या आम्ही काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केल्या. मुख्यमंत्र्यांनी बहुतांश सगळ्या मागण्या मान्य केल्या, असे काल गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांना सांगितले. आंदोलक, सामाजिक कार्यकतृे, आमदार आणि राजकीय नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने या हल्ल्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना विजय सरदेसाई यांनी ही माहिती दिली.
या हल्ल्यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे हे शोधून काढणे फार महत्त्वाचे आहे. मान्य केलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास सोमवारपासून पुन्हा आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही विजय सरेदेसाई यांनी स्पष्ट केले.

हल्लेखोरांना ‘रासुका’ लावण्याचे तसेच रामा काणकोणकर व त्यांच्या कुटुंबियांना 24 तास पोलीस सुरक्षा देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. तसेच राजकीय नेते व गुंड यांच्यातील साटेलोटे याची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे विशेष कृती दल स्थापन करण्याची मागणीही मान्य केल्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळाचे समाधान झाल्याचे सरदेसाई म्हणाले.

आंदोलकांच्या मागण्या काय?
हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार शोधून तात्काळ अटक करावी.
पोलिसांच्या एका कृतिदलाची स्थापना करावी.
हल्लेखोरांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लावावा.
हल्ल्यामागे एखादा राजकीय नेता आहे का, याची चौकशी व्हावी.
रामा काणकोणकर व कुटुंबियांना 24 तास पोलीस सुरक्षा पुरवावी.

अरविंद केजरीवाल यांच्याकडूनही निषेध
दरम्यान, रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटू लागलेले असून काल नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही ‘एक्स’ या समाज माध्यमावरून या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. गुंडांच्या एका टोळक्याने ज्या प्रकारे काणकोणकर यांना बेदम मारहाण केली, ती गोष्ट अत्यंत भयावह अशी असून सर्व थरांतून या हल्ल्याचा निषेध व्हायला हवा. तसेच गुंडांच्या मुसक्या लवकरात लवकर आवळण्याची गरज असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

रामा काणकोणकर यांची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गोमेकॉत जाऊन तेथे उपचार घेणाऱ्या रामा काणकोणकर यांची विचारपूस केली. तसेच तेथील डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीविषयीची माहिती मिळवली. काणकोणकर यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आता काणकोणकर यांची तब्येत सुधारू लागलेली असून, डॉक्टरांनी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवत उपचार चालू ठेवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावेळी काणकोणकर यांच्या सहकाऱ्याशीही चर्चा केली. तसेच काणकोणकर यांच्या कुटुंबीयांनाही धीर दिला. सरकार काणकोणकर यांच्या सुरक्षेकडे जराही दुर्लक्ष करणार नसून, उपचारादरम्यान गोमेकॉत, तसेच नंतर त्यांच्या घरीही योग्य ती पोलीस सुरक्षा व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.