>> बॉम्बच्या धमकीवर तातडीने कारवाई करणार; दोन आठवड्यांत 450 हून अधिक धमक्या मिळाल्या
दोन आठवड्यांत 450 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारपासून आपल्या सायबर शाखेचे अधिकारी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तैनात केले.
विमानामध्ये बॉम्बची धमकी मिळताच एनआयएच्या सायबर पथकाचे अधिकारी तपास सुरू करतील. तसेच धमक्या देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासोबतच अधिकारी विमानाच्या सुरक्षिततेचीही खात्री करतील. याशिवाय अनेक विमानतळांवर बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटी (बीटीएसी) ची टीम तैनात करण्यात आली आहे.
विमानतळावरील सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक एजन्सी एनआयएसोबत काम करत आहेत. या एजन्सी सुरक्षा प्रोटोकॉल तयार करण्यात सध्या गुंतल्या आहेत.
रविवारी तीन भारतीय विमानसेवा कंपन्यांच्या विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यामध्ये इंडिगोच्या 18, विस्ताराच्या 17 आणि आकासाच्या 15 विमानांचा समावेश होता. मात्र, तपासात या सर्व धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले.
अलीकडे विमानांना मिळालेल्या धमक्यांमुळे विमानसेवेवर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे विमानसेवा कंपन्यांचे 600 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
पुन्हा 60 विमानांना बॉम्बच्या धमक्या
भारतीय विमानसेवा कंपन्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळण्याचे सत्र सलग 15व्या दिवशीही कायम राहिले. सोमवारी 60 हून अधिक विमानांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या. धोक्याची शक्यता लक्षा घेऊन एअर इंडियाच्या दिल्ली-कोलंबो एआय 281 फ्लाइटचे कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात 108 प्रवासी आणि 8 कर्मचारी होते. फ्लाइटची तपासणी करण्यात आली, पण बॉम्बची धमकी ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.