आंतरराज्य मार्गावरील कदंब बसचालकांची वरच्यावर बदली

0
26

>> अध्यक्ष उल्हास तुयेकर यांची माहिती

तेलंगणा सरकारच्या अबकारी विभागाने मद्य तस्करी प्रकरणी अटक केलेल्या कदंब महामंडळाच्या बसचा चालक व वाहकाला निलंबित करण्यात आले असून, कदंबच्या आंतरराज्य मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांवरील चालकांची वरच्यावर बदली करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती कदंब प्रवासी वाहतूक मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल दिली.

कदंबाच्या बसवर चालक व वाहक म्हणून काम करणाऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या तस्करीच्या प्रकरणात गुंतणे ही मोठी चूक आहे. मद्य तस्करी प्रकरणी अटक केलेल्या दोघांच्या विरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. कदंब महामंडळाच्या आंतरराज्य मार्गावरील बसगाड्यांवर ठराविक चालकांची कायमस्वरूपी नियुक्ती केलेली आहे. आता, आंतरराज्य मार्गावरील बसगाड्यांच्या चालकांची वरच्यावर बदली करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. गोव्याच्या सीमेवर सुध्दा परराज्यात जाणाऱ्या कदंब बसगाड्यांची तपासणी करण्याची गरज आहे, असेही तुयेकर यांनी सांगितले.