7 जणांची ओळख पटली, विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला
एअर इंडियाच्या सर्व विमानांच्या तपासणीचे आदेश
अहमदाबादमध्ये गुरूवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान एआय-171 ला अपघात झाला होता. अपघाताच्या 27 तासांनंतर, शुक्रवारी विमान अपघात तपास ब्युरोने विमानाचा ब्लॅक बॉक्स जप्त केला. तर बचाव पथकाने 270 लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. त्यापैकी 7 जणांचे मृतदेह डीएनए चाचणीनंतर त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहेत. मृतांमध्ये 241 जण विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विमान कोसळलेल्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील 5 मृत आहेत. अपघाताच्या वेळी वसतिगृहात 50 हून अधिक लोक उपस्थित होते.
विमान 49 सेकंदानंतर कोसळले
अहमदाबाद विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये विमान उड्डाणानंतर 49 सेकंदांनी कोसळताना दिसले. विमान अपघाताची चौकशी 7 एजन्सी करत आहेत, ज्यात राष्ट्रीय तपास संस्था, गुजरात पोलीस, विमान अपघात तपास ब्युरो, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, युनायटेड किंग्डमची हवाई अपघात चौकशी शाखा, युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ, फेडरल एव्हिएशन प्रशासन यांचा समावेश
आहे.
कसून चौकशी सुरू
अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे. या अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण येत असून त्यामुळेच सर्व मृतदेहांच्या डीएनए चाचण्या करण्यात येत आहेत. होणार आहेत. विमान अपघातावेळी झालेल्या स्फोटामुळे मृतदेह ओळख न पटण्याच्या पलीकडच्या अवस्थेत आहेत.
बोईंग 787-8/9 च्या
तपासणीचे आदेश
अहमदाबाद विमान अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. डीजीसीएने एअर इंडियाच्या बोईंग 787-8/9 विमानांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार इंधन पॅरामीटर सिस्टम तपासले जाणार आहे. तसेच विमान सुरक्षेचे प्रत्येक मानक तपासले जाणार आहे. तसेच टेकऑफ मानकेदेखील तपासली जाणार आहेत.
डॉक्टरांचे 5 मृतदेह सापडले
गुरूवारी 12 जूनरोजी दुपारी 1:38 वाजता अहमदाबादहून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे बोईंग 787-8 हे विमान उड्डानंतर लगेचच कोसळले होते. अहमदाबादमध्ये झालेल्या या अपघात स्थळावरून आतापर्यंत 270 जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये विमानातील प्रवासी आणि बीजे मेडिकल कॉलेजचे इंटर्न ड़ॉक्टरही आहेत. इस्पितळात 270 हून अधिक मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले तर 220 लोकांच्या डीएनए चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील 7 मृतदेहांची ओळख पटली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. विमानामध्ये 242 जण होते. पैकी एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. यामुळे सुमारे 241 प्रवासी आणि हॉस्टेलमधील इंटर्न डॉक्टर असे मिळून 270 मृतदेह आहेत. पाच डॉक्टरांचे मृतदेह सापडल्याचे सांगितले जात आहे, परंतु, विमानातील प्रवाशांच्या संख्येपेक्षा जास्त असलेले मृतदेह कोणाचे आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अपघातावेळी हॉस्टेलच्या मेसमध्ये 50 हून अधिक लोक होते, असे सांगितले गेले आहे.