अहमदाबाद येथे 4 दहशतवाद्यांना अटक

0
14

>> सर्व दहशतवादी आयएसआयएसचे

>> चौघेही श्रीलंकेतील रहिवासी

गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) काल सोमवारी अहमदाबाद विमानतळावरून आयएसआयएसच्या 4 दहशतवाद्यांना अटक केली. केंद्रीय एजन्सीकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे या चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले मोहम्मद नुसरत, मोहम्मद नुफ्रान, मोहम्मद फारिस आणि मोहम्मद राजदीन हे चार दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे रहिवासी आहेत. चौघेही अहमदाबादमध्ये कोणत्या उद्देशाने आले होते आणि ते कोणाच्या संपर्कात होते? त्याची पडताळणी केली जात आहे. हे चौघेही 18 किंवा 19 मे रोजी पहिल्या ट्रेनने अहमदाबादला पोहोचले होते. या संदर्भात चेन्नईहून रेल्वे प्रवाशांची यादी मागवली आहे.

काल अटक करण्यात आलेले हे चारही दहशतवादी श्रीलंकेतून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचले. पाकिस्तानी हँडलरच्या आदेशानंतर त्यांनी काहीतरी कट आखला होता. त्यामुळे हे दहशतवादी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणत्या उद्देशाने पोहोचले होते, याचा तपास सुरू आहे.

एटीएसकडे मोठा पुरवा
अटक करण्यात आलेले चारही पाकिस्तानमधील हँडलरच्या संपर्कात होते. त्यांनी मोठा कट आखला होता. हे दहशतवादी पाकिस्तानमधून येणाऱ्या आदेशाची वाट पाहत होते. या दहशतवाद्यांना शस्त्रेही स्वतंत्रपणे पोहोचवली जाणार होती. एटीएसने या दहशतवाद्यांच्या फोनमधून एन्क्रिप्टेड चॅट जप्त केले आहेत. त्यातून बरीच माहिती उघड झाली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. पण हे दहशतवादी अहमदाबादमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात पोलीस सावध झाले आहेत.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवार आणि बुधवारी आयपीएलचे दोन सामने होणार आहेत. त्यामुळे खेळाडू अहमदाबादला पोहोचण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

6 मे 2024 रोजी अहमदाबादमधील 36 शाळांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचे ई-मेल आले होते. मात्र, तपासणीदरम्यान एकाही शाळेत आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. याप्रकरणी अहमदाबाद क्राइम ब्रँचने पाकिस्तानमधून धमकीचे ई-मेल पाठवण्यात आल्याचा दावा केला आहे.
गुजरात एटीएसने गेल्या वर्षी श्रीनगरमधून चार तरूणांना तर सूरतमधून एका महिलेला पोरबंदरमधून अटक केली होती. त्यापैकी एक परदेशी नागरिक होता. या चौघांचेही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयएआयएसशी संबंध होते. ते गेल्या एक वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि आयएसआयएसमध्ये सामील होण्यासाठी देश सोडून पळून जाण्याचा विचार करत होते.

चेन्नईमार्गे अहमदाबादमध्ये
गुजरात पोलिसांच्या मदतीने एटीएसने चार आरोपींना बेड्या ठोकल्या. भारतामध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्याने श्रीलंकेतून हे दहशतवादी पाठवण्यात आले होते. ते श्रीलंकेहून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुजरात एटीएसने मिळालेल्या माहितीच्या आधारावर चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. दहशतवाद्यांना टार्गेट लोकेशनवर पोहचण्याआधीच ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक केली आहे.