अहंकाराचा वारा न लागो…

0
371
  • ज. अ. रेडकर.
    (सांताक्रूझ)

आपण लोकांसाठी खूप काही केले असा अहंकार अनेकांना असतो. प्रत्यक्षात कुणी कुणासाठी काही करीत नसते. पूर्वजन्मीचे आपण कुणाचेतरी देणे लागत असतो आणि ते या जन्मी आपण देत असतो. देणारा न उच्च दर्जाचा असतो आणि घेणारा न कनिष्ठ श्रेणीचा!

श्रीमद्भगवद्गीतेवरचे निरुपण करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘अहंकाराचिया चळीया| वरी मदत्रयाचिया उकळिया| जेथ विषयोर्मिंच्या आकळिया| उल्लोळ घेती॥ अहंकाररूपी ओघाने व विद्या, धन आणि सामर्थ्य या तीन मदांच्या उकळ्यांनी विषय तरंगाच्या लाटा उसळतात असा याचा भावार्थ! अलीकडे काय होतं की, सत्ता, संपत्ती आणि कर्तृत्व याचा अहंकार मनुष्याला जडतो. सत्ता आणि संपत्ती विनासायास आणि पात्रता नसताना मिळाली की मग काय बघायलाच नको! लोकांचे लक्ष आपल्याकडे सतत वेधले जावे यासाठी मग अनेक क्लुप्त्या योजल्या जातात. त्यांपैकी दान देणे हे एक क्लुप्ती आहे. आपणच गरिबांचे तारणहार आहोत आणि आपणच खरे समाजसेवक आहोत हे दर्शविण्यासाठी मग सुरु होतो विविध संस्थाना देणग्या देण्याचा सिलसिला आणि गरजू लोकांना मदत करण्याचा बहाणा ! यातून प्रतिमा उजळ होत जाते. तोंडपूजक लोक उदोउदो करतात. सत्कार घडवून आणले जातात. दातृत्वाच्या आणि सत्काराच्या बातम्या छापवून आणल्या जातात. मोक्याच्या जागी वाढदिवसाचे फ्लेक्स झळकतात. सांप्रत काळी नेता बनण्यासाठी एवढी गुंतवणुक पुरेशी असते.

सुप्रसिद्ध उद्योजक आणि टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्रीमान् रतन टाटा हे मात्र या गोष्टीला अपवाद आहेत. ते कोट्यवधीचे दान देतात पण त्याची जाहिरातबाजी कधीच करीत नाहीत किंवा त्यातून त्यांना काही स्वार्थ साधायचा असतो असेही कधी आढळले नाही. कोविड-१९शी लढा उभारण्यासाठी पीएम केअर फंड मोदीजींनी जाहीर करताच पंधरा कोटींचा धनादेश सर्वात प्रथम त्यांनी दिला. पण त्याचा कुठे स्वतः उल्लेखदेखील केला नाही.

समाजमाध्यमातून ही बातमी बाहेर आली. टाटा कुटुंबाची पूर्वीपासूनच देशाशी बांधिलकी आहे. पहिले पंतप्रधान स्व.पं. जवाहरलाल नेहरु यांची औद्योगिक दूरदृष्टी याने प्रभावित होऊन जमशेटजी टाटा यांनी आपल्या कष्टाने आणि कल्पकतेने विविध उद्योग मोठ्या जिद्दीने उभे केले. त्यातून मिळणार्‍या नफ्याचा वाटा आपल्या कामगाराना आणि संकटकाळी देशाला दिला. आजही ती परंपरा खंडित झालेली नाही. अझीम प्रेमजी हे दुसरे उद्योजकदेखील याच पठडीतले. देशातील अन्य अनेक उद्योजक यांचा आदर्श न घेता, आपला उद्योग उदीम वाढविण्यासाठी व त्यातून नंबर एक धनवान बनण्याच्या चढाओढीत सत्तारूढ पक्षाशी सलगी करतात. त्यासाठी भल्यामोठ्या देणग्या निवडणूक फंड म्हणून देतात व तो पक्ष पुन्हा सत्तेवर आला की त्या माध्यमातून दसपटीने आपली आर्थिक गुंतवणुक वसूल करून घेताना दिसतात. (काही उद्योजक तर सत्ताधार्‍यांच्या मैत्रीचा गैरफायदा उठवून हजारो कोटीचा चुना बँकाना लावून परदेशी पलायन करतात.)
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे सोशल मिडीयावर कुणी एकाने मालमत्ता हक्कासंबंधी एक पोस्ट टाकली. त्यावर अनेक प्रतिक्रिया व सूचना आल्या, अनेक अनुभव लोकांनी व्यक्त केले. त्यांत एकाने आपण वडिलोपार्जित चल- अचल मालमत्तेत दुप्पट-तिप्पट भर घातली आणि त्यातील अर्धा भाग आपल्या भावाने मागताच त्याच्याशी कोणताही वाद न घालता देऊन टाकला, आपल्या मुलांना या मालमत्तेत काहीच स्वारस्य नाही किंबहुना आपल्या व्यवसायातदेखील त्यांना रस नाही, ते आपला स्वतंत्र व्यवसाय सांभाळतात आणि त्यांत ते खुश आहेत, माझ्या मालमत्तेची आणि संपत्तीची त्यांना गरज वाटत नाही वगैरे वगैरे. यावर त्या माणसाला कुणीतरी सुचवले की, असे असेल तर या मालमत्तेचा उपयोग तुम्ही गरिबांसाठी शिक्षणसंस्था किंवा इस्पितळ काढण्यासाठी कुणाला तरी दान करा. त्यावर त्याचे उत्तर आले, ‘‘फुकट कुणी काही मागू नये. दुसर्‍याकडे अशी भीक मागण्यापेक्षा स्वतःच्या हिंमतीवर या गोष्टी कराव्यात. गरीब वगैरे काही नाही, लोकाना सर्व फुकटात हवे असते’’. यापूर्वीच्या दिलेल्या एका प्रतिक्रियेत हेच सद्गृहस्थ आपल्या दातृत्वाचे गोडवे गात होते आणि गरिबांसाठी शिक्षण आणि वैद्यकीय व्यवस्थेविषयी सूचना केल्याबरोबर त्याचे असली रूपडे उघड झाले. भीक आणि सुचवलेला उपाय यातील भेद या सद्गृहस्थाला समजला नसावा. ही गोष्ट पुन्हा त्यांच्या नजरेस आणून दिल्यावर, ‘तुमचे मन दुखावले असेल तर माफ करा’ असा वर संभावितपणा! अहंकाराने अंध झालेली स्वकेंद्रित माणसे विधायक सूचना करणार्‍या माणसाचा पाणउतारा कसा करतात याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.

आपण लोकांसाठी खूप काही केले असा अहंकार अनेकांना असतो. प्रत्यक्षात कुणी कुणासाठी काही करीत नसते. पूर्वजन्मीचे आपण कुणाचेतरी देणे लागत असतो आणि ते या जन्मी आपण देत असतो. देणारा न उच्च दर्जाचा असतो आणि न कनिष्ठ श्रेणीचा घेणारा ! ही सगळी त्या नियंत्याची किमया असते. (श्री. माधव सटवाणी नावाचे आमचे एक मिश्कील कवि मित्र आहेत. त्यांना कुणी जेवणाचे आमंत्रण दिले किंवा नाश्ता दिला तर जेवून किंवा खाऊन झाल्यावर म्हणतात, ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो प्रभू राम आम्हाला देतो’, म्हणजे जेवणाचे/नाश्त्याचे आमंत्रण देणार्‍याची काय गोची होत असेल बघा!) सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री. जी. ए. कुलकर्णी यांनी ‘रमलखुणा’ या आपल्या दीर्घ गूढ कथेत नियतीचे अप्रतिम वर्णन केले आहे. परस्परांशी भेट होणे हेदेखील नियतीने रचलेले नाट्य असते. त्यासाठी नियतीला कितीतरी मोठे जाळे विणावे लागते. त्यातील सर्वात बारीकसा हिस्सा म्हणजे आपण असतो. मग कुणाला काही दिल्याचा अहंकार तरी का करावा माणसाने?
दुसरे म्हणजे हा देह नश्वर आहे. आपण कितीही संपत्ती/मालमत्ता गोळा केली तरी एक दिवस ती इथेच सोडून आपणाला जावे लागणार आहे. आपली पुढची पिढी त्याची कशी विल्हेवाट लावील याचीही आपणास कल्पना नसते. शिवाय निसर्ग कोपला तर होत्याचे नव्हते व्हायला क्षणाचादेखील विलंब लागत नाही. वीस वर्षापूर्वी २६ जानेवारी २००१ रोजी गुजरातमधील भुज येथे आणि त्या आधी सात-आठ वर्षे ऐन गणेशचतुर्थीच्या दिवशी म्हणजे ३० सप्टेंबर १९९३ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर येथे झालेला भूकंप आठवून बघा, म्हणजे मी काय म्हणतो हे आपल्या लक्षात येईल. तिथले मानवी जीवन पुन्हा स्थिरस्थावर करण्यासाठी कित्येक वर्षे जावी लागली. भुज येथे भूकंप झाला तेव्हां आमचे गोव्याचे एक शिक्षकमित्र आणि लेखक श्री. देवेंद्र कांदोळकर हे आपली इथली उत्तम वेतन असणारी कायम स्वरुपी शिक्षकी नोकरी सोडून तिथल्या लोकांच्या मदतीला धावले. तिथल्या आदिवासी लोकांच्या पाड्यात जाऊन मुलांना शिकवण्याचे कार्य बिनबोभाट सुरु केले. तिथल्या भूकंपग्रस्त लोकांची सेवा केली. अनेक वर्षे ते तिथे होते. आता कुठे आहेत पत्ता नाही कारण संपर्क साधावा तर त्यांच्याकडे साधा भ्रमणध्वनी संचदेखील नाही. हरहुन्नरी व विद्यार्थीप्रिय असा हा शिक्षक. गोव्यातील सानेगुरुजी कथामालेचा अविभाज्य घटक! कथा, एकांकिका, पथनाट्य यांचे लेखन आणि सादरीकरण करण्यात नंबर एक असा शिक्षक! ‘एका सागर किनारी’ हे त्यांचे भुज इथल्या अनुभवावर आधारित एक उत्तम पुस्तक आहे.

देवेंद्र कांदोळकर यांना पाहिल्यावर आठवण होते ती साने गुरुजी यांची. तशीच शरीरयष्टी, तशीच साधी राहणी आणि तीच विचारधारा! वागण्या-बोलण्यात विनम्रता पण खंबीर कणखर वृत्ती! पाठ्यपुस्तकात झालेल्या छपाईतील चुकांबद्दल एकाकी झुंझ देणारा आणि शिक्षण संचालक व गोवा शालान्त शिक्षण मंडळ, निवेदने, पत्रे देऊनदेखील ऐकत नाहीत म्हटल्यावर शिक्षण खात्याच्या पायरीवर प्राणांतिक उपोषणाला बसणारा एकमेव हाडाचा शिक्षक! (त्या दिवशी सहाय्यक शिक्षण संचालकपदावर असल्याची मला लाज वाटली होती.) ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’, ही सानेगुरुजींची प्रार्थना प्रत्यक्षात जगणारी व्यक्ती म्हणजे श्री. देवेंद्र कांदोळकर. खादीचा धुवट पायजामा आणि सदरा, पायात सुमार दर्जाच्या वहाना, खांद्याला खादीचीच शबनम झोळी, त्यात पाण्याची बाटली आणि काही पुस्तकें. साने गुरुजी वापरीत तसली खादीची पांढरी टोपी तेवढी डोक्यावर नाही. बाकी सगळा अवतार सानेगुरुजींचाच! कुणाकडे गेल्यास चहादेखील घेणार नाहीत. पाणी घ्या म्हटले तर झोळीतील पाण्याची बाटली काढतील. असा हा अवलिया! ना कशाचा गर्व ना ताठा ना आपण केलेल्या कामाचा अहंकार! कुणी स्तुती केली तर म्हणतील, छे हो, त्यात काय मोठे, माझ्यापेक्षा किती तरी मोठी कामे केलेले कित्येक लोक अवतीभवती आहेत. त्यांच्यापुढे मी काहीच नाही अन मी हे काम केले नसते तर आणखी कुणीतरी केले असते.
पुणे येथील सुप्रसिद्ध विचारवंत, प्राध्यापक आणि स्वातंत्र्यसैनिक ग. प्र. प्रधान यांच्या अखेरच्या दिवसात त्यांच्या गलितगात्र देहाची सेवा करायला कुणी नाही हे समजल्यावर देवेंद्र यानी तिकडे धाव घेतली आणि एखाद्या कुशल परिचारिकेसारखी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची निरलस सेवा बजावली. परंतु कुठेही या गोष्टीची वाच्यता केली नाही. तुकोबांच्या अभंगातील… ‘अहंकाराचा वारा न लागो माझ्या मना’ याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री. देवेंद्र कांदोळकर! ना कुणी त्यांना शिक्षक पुरस्कार दिला ना कुणी गौरव केला! म्हणूनच कोणत्याही धनिकाच्या तथाकथित दातृत्वापेक्षा आणि नेत्याच्या ढोंगी समाजसेवेपेक्षा देवेंद्र कांदोळकर हे महान ठरतात. मित्रा, देवेन्द्रा, तू आज कुठे असशील बऱें?