- मीना समुद्र
माणसामाणसांत दुरावा निर्माण करणारं अहंकार हे मोठं कारण आहे. अहंपणात गर्विष्ठपणा असतो, अहंगंड असतो. दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची वृत्ती असल्याने, आढ्यताखोरपणाच्या कैफात माणूस दुसऱ्याला हीन लेखतो. अहंकार सोडला की आपण सर्वांना प्रिय होतो.
यू-ट्यूबच्या खजिन्यातून विदुषी धनश्री लेले यांचं महाभारतातील एका यक्षप्रश्नाबाबतचं एक रसाळ निरूपण ऐकत होते. धर्मराज युधिष्ठिराला यक्षानं विचारलं, ‘काय सोडलं की आपण प्रिय होतो?’ तेव्हा युधिष्ठिराचं उत्तर होतं- ‘मान!’ आपला मान म्हणजेच ‘मी’पणा. अहंकार सोडला की आपण सर्वांना प्रिय होतो. अहंकार हा दोन व्यक्तींना एकमेकांच्या जवळ येण्यापासून रोखतो. माणसामाणसांत दुरावा निर्माण करणारं अहंकार हे मोठं कारण आहे. अहंपणात गर्विष्ठपणा असतो, अहंगंड असतो. दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची वृत्ती असल्याने, आढ्यताखोरपणाच्या कैफात माणूस दुसऱ्याला हीन लेखतो. ‘स्वतःची स्तुती स्वतः करतो तो एक मूर्ख असतो’- असे मूर्खपणाचे लक्षण रामदासस्वामींनी सांगितले आहे. स्वस्तुती करताना त्या अहंकारी माणसाला सारासार विवेक राहत नाही. आपल्याच ताठ्यात एकप्रकारचा उन्माद आणि दुरभिमान बाळगून तो वावरत असतो. आपल्या एवढ्या-तेवढ्या कर्तृत्वाची घमेंड दाखवतो. अभिमान बाळगणे आणि मिरवणे ठीक, पण त्या धुंदीत दुसऱ्यांना दुखवणे हे केव्हाही वाईटच. दुसऱ्याकडून मानसन्मानाची अपेक्षा करताना त्याचाही मान जपायला हवा.
याबाबतीत बासरीचे उदाहरण धनश्री लेले यांनी दिले ते खरोखरच यथार्थ वाटते. बासरी ही पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बनवत नाहीत असा संकेत त्यांनी सांगितला. कारण या सर्व तिथीत शेवटी ‘मी’ येतो. बासरी बनवताना ती या तिथींना बनवली तर ती पिचते. बासरी वाजवताना जणू प्राणांची फुंकर घालावी लागते. ‘मी’ फुंकून टाकावा लागतो. तो शिल्लकच उरता कामा नये. बासरी म्हणते-
कहलवाता है तू बस वही कह सकती हूँ
अपने मन की कहूँ ये मेरी औकात नहीं।
तू फुंकर घालशील तशीच मी वाजते. आपल्या मनातलं काही व्यक्त करावं ही योग्यता माझ्यात नाही.
‘गर्वाचे घर नेहमीच खाली’ अशी म्हण आपण वापरतो. तशा अर्थाचाच एक दोहा त्यांनी उद्धृत केला आहे-
उँचे पानी न टिके नीचेही ठहराय।
नीचा हो सो भर दिवे उँचा प्यासा जाय॥
- पाणी वर उंच राहू शकत नाही. ते खालीच येतं, टिकतं, स्थिर होतं. खाली असेल तर भरता येतं. उंची असेल तर माणूस तहानलेलाच राहतो.
अहंकार हा मनुष्यस्वभावातला फार मोठा दोष आहे. कारण समाजशील मनुष्यप्राणी त्या ठिकाणी राहू शकत नाही, राहू इच्छित नाही, तो साहू शकत नाही. विवाहवेदीवर चढताना वधूवरांना एकमेकांच्या गळ्यात हार घालताना खाली झुकावे लागते. तिथे ताठ मान चालत नाही. दोघांचीही संवेदनशीलता, जुळवून घेण्याची ती जणू सुरुवात असते. आजकाल नवरोबा झुकले नाहीत तर नवरीला उचलून हार घातला जातो आणि त्याच्यासारखाच तिचाही मान आहे म्हणून त्यालाही हार घालायला भाग पाडले जाते. अर्थात ही गमतीची गोष्ट झाली. पण संसारात दोघांनी नमते घेण्याची ती जणू पहिली पायरी असते. ‘माझ्या नावावर लग्नाची आमंत्रण-पत्रिका नाही; तुझ्या आहे तेव्हा तूच जा’ असेही जवळच्या नातेवाइकांबाबतही घडते.
अहंकार आणि चढेलपणा ही भावना कधीकधी इतकी तीव्र होते की त्यामुळे उद्भवणाऱ्या क्रोधाग्नीत दुसऱ्याचे अस्तित्व भस्मसात होते. अहंकाराने माणूस ताठ कण्याने आणि ताठ मानेने वावरतो आणि त्याला डिवचलं तर तो नागासारखा फणा काढतो. आणि त्याच्या फूत्कारांनी, विषाक्त बोलण्याने आसपासचे सारे वातावरणच विषारी, गुदमरणारे होऊन जाते. जहरी डंखही होऊ शकतो.
अहंकार म्हणजे ‘मी’पणा. कर्तृत्वाबद्दल स्वाभिमान असणे वेगळे. देशाभिमान, राष्ट्राभिमान, कुलाभिमान या गोष्टीपर्यंत तो ठीक; पण त्याचे आकारमान वाढत गेले तर सारे वातावरण आणि पर्यावरण बिघडते. माणसाच्या शरीरस्थ षड्रिपूंपैकी हा अत्यंत महत्त्वाचा असा दूर ठेवण्यासारखा शत्रू, मद, दंभ अशा रूपात येतो. मदोन्मत्त हत्तीसारखा तो बेफाम आणि आवरायला कठीण असतो. पण त्याला संयमाचा, विनम्रतेचा लगाम घालावाच लागतो. त्यामुळे तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा राहतो. अहंकाराने पशुत्वाच्या पातळीवर पोचतो. कोणत्याही कलेत, विषयात पारंगतता मिळाली की माणूस ज्ञानी होतो. खरा ज्ञानी मात्र विनम्र असतो आणि म्हणूनच त्याला इतरांचे प्रेम लाभते.
नुकतेच दिवंगत झालेले तबलानवाज झाकीर हुसेन हे कलेतील सर्वोच्च पदाला पोचलेले, देशविदेशांत सन्मानाने आमंत्रित कलाकार असून आणि अत्यंत नावाजलेल्या गायक-कलाकारांना साथ करूनही स्वतः अतिशय विनम्र होते. पदवंदना हा एक आचार असला तरी त्यांनी तो विचार आचरणात अमलात आणला होता. अतिशय विनम्र स्वभावाच्या आणि सर्वसामान्यांसाठीही वादनकला करणाऱ्या या कलाकाराचे अकाली निधन सर्वांना चटका लावून गेले. अहंकारात अधिकार असतो आणि इतरांना किंमत देण्याची भावना नसते. प्रत्येकाला आत्मसन्मान असायला हवा, पण त्याचे दुरभिमानात रूपांतर झाले की सुखाचा डाव उधळला जातो. माणसे दुखावतात, दुरावतात.
आताच्या काळात स्त्री-पुरुष समानता आली असली तरी पूर्वी पुरुषप्रधान समाजात स्त्रीचा पोषणकर्ता, कुटुंबाचा पालनपोषण आणि रक्षणकर्ता म्हणून भूमिका निभावताना बऱ्याच ठिकाणी, बहुतांश ठिकाणी अहंकार ‘मी, माझं, मी केलं म्हणून झालं, मी नसतो तर जगणं मुश्कील झालं असतं’ अशा दर्पयुक्त वल्गना पुरुषवर्गातून ऐकू येत. स्त्रियांना कमी लेखणे, त्यांच्याबद्दल दुसऱ्यांसमोरही कुत्सितपणाने बोलणे, घडोघडी त्यांचा अपमान करणे, त्यांची अक्षमता अधोरेखित करणे यात मी कसा शहाणा, माझंच ऐकलं पाहिजे, मी सांगतो ते काम केलं पाहिजे, मला विचारून केलं पाहिजे, आधी मला सांगितलं पाहिजे ही पुरुषी अहंकारी वृत्ती वरचढपणा दाखवीत असे. आता काळानुसार चित्र पार बदलले आहे. नाहीतर वादविवाद, तंटेबखेडे, भांडणं हे विकोपाला जाऊन वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक मनःस्वास्थ्यही बिघडून जात असे. त्यातली आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, असं वागणाऱ्यांना आपण काही वाईट वागत आहोत हे लक्षातही येत नाही. लळा-जिव्हाळा हे शब्द अशावेळी खोटे ठरतात. श्रीमंती, विद्वत्ता, कला या साऱ्यांच्या बाबतीत टोकाचा अहंकार असेल तर सर्वनाश अटळ असतो; कारण गीतेत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ‘बुद्धिनाशात् प्रणश्यति।’- अहंकार बुद्धिभ्रंश, बुद्धिनाश करतो, त्यामुळे त्यापासून दूर राहिलेलेच चांगले. म्हणूनच संतांनी ‘अहंकाराचा वारा न लागो माझ्या मना’ असे म्हटले असावे.