अस्थिरतेच्या भोवऱ्यात व्हिएतनाम

0
76
  • डॉ. वि. ल. धारूरकर

व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत व्हिएतनामच्या प्रशासनाची धुरा सांभाळणार आहेत. या काळात व्हिएतनाममध्ये राजकीय-सामाजिक शांतता, स्थैर्य व विकासाचे नवे पर्व कसे आणावयाचे हे मोठे आव्हान असणार आहे.

व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांना वर्षभराच्या कामानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोने राजीनामा देण्यास सांगितले. त्यांना अर्धचंद्र दिल्यानंतर राष्ट्राध्यक्षपदी उपाध्यक्ष असलेल्या व्हो थी अन्‌‍ झुआन्‌‍ या महिलेची घटनात्मक तरतुदीनुसार निवड करण्यात आली. आशिया खंडातील उभरती अर्थव्यवस्था म्हणून व्हिएतनामचा उदय होत असताना झालेल्या या राजकीय भूकंपामुळे आर्थिक विकासाला लगाम बसला आहे. अमेरिका, चीन व भारत यांच्या संबंधाबाबत संतुलन ठेवून व्हिएतनामला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

तेथे कम्युनिस्ट पक्षाची एकपक्षीय राजवट आहे खरी, पण व्हिएतनाम हो चि मिन्हचा देश आज राहिला नाही. व्हितएनाममधील कम्युनिस्ट पक्ष हा भ्रष्टाचाराच्या भुंग्याने पोखरला गेला आहे. दोन वर्षाच्या काळात दोन अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. दोन वर्षे सत्तेवर असलेले एक अध्यक्ष ट्रूओंग चिम भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात सापडले आणि त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर अगदी मागील आठवड्यात व्हिएतनामचे सत्तेवर असलेले अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपामुळे अखेर राजीनामा दिला आणि ते पायउतार झाले. आता कार्यकारी उपाध्यक्षाकडे तेथील कारभाराची सूत्रे देण्यात आली आहेत.

थुआंग हे 53 वर्षांचे सर्वात तरुण व लोकप्रिय अध्यक्ष म्हणून त्यांचा गौरव केला जात होता. पण दृष्ट लागली आणि त्यांचे गणित बिघडले. ते व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षांचे आश्रित होते, ‘लाडके’ होते आणि अध्यक्षांचा त्यांच्यावर मोठा आशीर्वाद होता, विश्वास होता. पण माशी कुठे शिंकली हे कळायला मार्ग नाही. मागील काही घटना आणि घडामोडी अशा घडत गेल्या की, हो चि मिन्ह शहरातील एका व्यावसायिकाकडून त्यांना मिळालेला काही लाभ आणि तेथील स्टेट बँकेस 12 दशलक्ष डॉलर्स एवढ्या मोठ्या रकमेस त्यांनी फसविण्याचे प्रकरण समोर आले. त्यांच्या राजीनाम्याचे आणखी काय कारण आहे या गोष्टी तेथील शासनाकडून उघड झाल्या नाहीत. परंतु झालेले प्रकरण एवढे गंभीर आहे की, व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष व सरचिटणीसांनी त्यांना पायउतार होण्याचा सल्ला दिला. पक्षाची प्रतिमा मलिन होत होती आणि साम्यवादी पक्ष लोकांच्या नजरेतून उतरण्याची शक्यता आहे हा धोका लक्षात घेऊन त्यांना मुक्त करण्यात आले आहे. ते आता सत्तेपासून दूर झाले आहेत आणि कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत व्हिएतनामच्या प्रशासनाची धुरा सांभाळणार आहेत. हनोई विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मते, अस्थिरता दूर करून गुंतवणुकीस प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. या घटनेनंतर तेथील शेअर बाजार तीन टक्क्यांनी घसरला. तो सावरावा लागेल व औद्योगिक विकासाची गती वेगवान करण्यासाठी हमी व विश्वास द्यावा लागेल.

व्हिएतनामची राजकीय व्यवस्था साम्यवादी आहे. तेथे पक्षाचे अध्यक्ष, सरचिटणीस यांना महत्त्व असते. त्याच पद्धतीने दोन उपपंतप्रधान, एक कार्यकारी अध्यक्ष अशी रचना असते. सध्याचे सरचिटणीस गुयेन फू ट्रोंग (वय 79 वर्षे) हे मुरब्बी राजकारणी असून सर्वात प्रभावी आहेत. भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे तेच महानायक आहेत. 98 टक्के मते मिळवून अध्यक्ष झालेल्या थुआंग यांच्या प्रकरणी राष्ट्रीय महासभेने 88 टक्के विरोधी मत नोंदवून त्यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब केले. पक्षाचे अध्यक्ष हे देशाच्या कारभारावर लक्ष ठेवतात. नॅशनल असेम्ब्ली हे तेथील एक सभागृह. नॅशनल असेम्ब्ली म्हणजे अर्थातच कम्युनिस्ट पक्षाचे प्रभुत्व आहे आणि या पद्धतीने सत्तेवर आलेला हा पक्ष गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये भ्रष्टाचाराच्या भुंग्याने एवढा पोखरला गेला आहे की, तो आता पुन्हा नव्याने भक्कमपणे कसा उभा राहील हा खरा प्रश्न आहे. व्हिएतनामच्या आर्थिक विकासाचा वेग अलिकडेच चांगल्या प्रकारे वाढत होता. आर्थिक उदारीकरण आणि गुंतवणुकीस असलेली मोठी संधी यामुळे अमेरिका, चीन, भारत यासारख्या अनेक मोठ्या देशांनी व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केलेली होती. व्हिएतनामचा विकास वेग सुद्धा बऱ्यापैकी वाढत होता. अमेरिका तेथे आता बंदुकी व शस्त्रात्रे घेऊन जात नाही तर गुंतवणूक घेऊन जात आहे. पहिल्या एनडीए सरकारच्या काळात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी व्हिएतनामला भेट देऊन या देशाशी राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक संबंध सुधारण्यावर भर दिला होता. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट, चिनशी सुधारलेले संबंध आणि शी जिनपिंग यांच्या संभाव्य भेटीची तयारी यामुळे व्हिएतनाम सुखावला होता. हा व्हिएतनामच्या प्रगतीचा एक टप्पा आता नव्याने सुरु झाला आहे असे वाटत होते, पण तेवढ्यात अध्यक्षांवर हे नवे बालंट आले आणि व्हिएतनामच्या स्थैर्याला ग्रहण लागले आणि अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला.

विद्यमान अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे पुढे काय होणार असे अनेक नवे प्रश्न उभे राहिले आहेत. भविष्यकाळामध्ये व्हिएतनामचे राजकारण कोणता आकार घेईल, तेथे स्थैर्य येईल का, विकास आणि प्रगतीचा नवा टप्पा गाठला जाईल का, असे अनेक प्रश्न उभे राहतात. तूर्त तरी हे राष्ट्र संकटात सापडले आहे एवढे मात्र खरे. व्हिएतनामची सामाजिक व आर्थिक व्यवस्था पाहिली तर या साम्यवादी प्रधान देशामध्ये एकसंघ राजकीय संस्कृती हे त्याचे वैशिष्ट्य आहे. या एकसंघ राजकीय संस्कृतीमध्ये विकास चांगला होतो. लोकांना स्थैर्यही लाभते. परंतु अलिकडे चीनपासून सर्व साम्यवादी राष्ट्रांमध्ये भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. चीनमधला भ्रष्टाचार फारसा प्रकाशामध्ये येत नाही. परंतु सर्वच साम्यवादी राष्ट्रांमध्ये एकपक्षीय सत्ता असल्यामुळे तेरी भी चूप व मेरी भी चूप असे असते आणि त्यामुळे भ्रष्टाचार वाढतो असे म्हटले जाते. व्हिएतनामचे तसे बरे आहे कारण तेथील माध्यमे बऱ्यापैकी स्वतंत्र आहेत. तसेच लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यही चांगल्यापैकी दिले जाते. त्यामुळे घडत असलेल्या घटना व घडामोडी प्रकाशामध्ये येतात, त्या चर्चेत येतात आणि त्यावर विचारमंथनही होते. व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाने भ्रष्टाचार विरोधामध्ये एक मोठी मोहिम हाती घेतली. गेल्या 2-3 वर्षांपासून पक्षाचे अध्यक्ष बारीकसारीक घटनांवर लक्ष ठेवतात आणि पक्षांतर्गत घडामोडींवर करडी नजर ठेवून भ्रष्टाचाराची प्रकरणे शोधून काढतात. आधीच्या अध्यक्षांनी दोन वर्षांपूर्वी कोविड काळामध्ये केलेल्या गडबडी उजेडात आल्या आणि त्यांना पायउतार व्हावे लागले. ते संपते ना संपते तोच एक वर्षाच्या कालावधीतच नव्या अध्यक्षांवर पुन्हा बालंट आले आणि त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. आता कार्यकारी अध्यक्ष असलेल्या व्हो थी अन्‌‍ झुआन्‌‍ या महिला नेत्यांच्याकडे सत्ता आली आहे. त्या तरुण आहेत, हुशार आहेत आणि पक्षाचे व सरकारचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. त्यामुळे त्यांच्यावर हा दुसऱ्यांदा विश्वास टाकण्यात आला आहे. त्या या संकटाच्या काळात व्हिएतनामला नेतृत्व देतील आणि वादळातून बाहेर काढतील अशी लोकांना आशा वाटते. व्हिएतनामच्या राजकारणातील चढउताराचे वेगळेपण कशात असेल तर कम्युनिस्ट पक्षाने हाती घेतलेल्या जबरदस्त शोध मोहिमांमध्ये आहे, हे खरे आहे. ही प्रकरणे बाहेर आल्यामुळे थोडीशी सरकारची बदनामी होते, परंतु पक्षाने याची पर्वा न करता मोहिम चालविली. या मोहिमेचे वर्णन ‘पेटलेली ज्वलंत भट्टी’ असे जागतिक प्रसार माध्यमातून केले जात आहे. ही भट्टी पक्षाध्यक्षांनी तापवली आहे आणि तिच्यात आणखी किती आहुती पडतील हे सांगता येत नाही. दोन उपपंतप्रधान, काही सनदी अधिकारी गेल्या 11-12 वर्षांपासून तुरुंगात आहेत. तेव्हा तेथील कम्युनिस्ट पक्षाने भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्सचे धोरण स्विकारल्यामुळे आता व्हिएतनाममध्ये शुद्धीकरणाची मोठी मोहिम सुरू झाली आहे. अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर नव्या महिला अध्यक्षांवर देशाची धुरा वाहण्याची जबाबदारी आली आहे थुआंग यांना अर्धचंद्र दिल्यामुळे व्हिएतनाममध्ये अस्थिरतेचे ढग जमले आहेत. आता पक्षनेत्यापुढे शांतता, स्थैर्य व विकासाचे नवे पर्व कसे आणावयाचे हा खरा प्रश्न आहे.