सोमवारी असोळणा येथे क्लिन रिबेलो (२५) या युवकाला तो बाजारात दुचाकीवरून फिरत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी जबर मारहाण केल्याने जखमी झालेल्या क्लिन रिबेलो याला उपचारासाठी हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार रिबेलो हा आपल्या एका मित्रासह दुचाकीवरून खरेदीसाठी असोळणा येथे आला होता. यावेळी पोलिसांनी त्याच्या दुचाकीवरून लाथ मारल्याने चिडलेल्या रिबेलो याने अपशब्द वापरले. त्यामुळे संतापाच्या भरात पोलिसांनी त्याला असोळणा येथील आऊट पोस्टवर नेऊन कमरपट्टा व दंडुक्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याची पाठ व कंबरेला जबर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी हॉस्पिसियो इस्पितळात हलवावे लागले. तेथे त्याच्यावर उपचार चालू असून असोळणे येथील नागरिकांनी या प्रकरणी पोलीस महासंचालकाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, मालभाट येथे उघड्यावर दारुच्या छोट्या बाटल्यांची विक्री करणार्या मारियो फिलीप बाप्तीस (५९) याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दारुच्या २२ बाटल्या जप्त केल्या असून त्याला अटक केली आहे.