असुरक्षित महाकुंभ

0
5

प्रयागराजमध्ये सध्या सुरू असलेल्या महाकुंभमध्ये काल मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान भीषण चेंगराचेंगरी होऊन कित्येक भाविकांचा नाहक बळी गेला आणि असंख्य भाविक जखमी झाले. मौनी अमावस्येला शाही अमृतस्नानासाठी गंगा, यमुना, सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी अपेक्षेहून अधिक लोकांची गर्दी झाल्यानेच प्रशासन कोलमडले आणि चेंगराचेंगरीची ही दुर्घटना घडली असे दिसते. महाकुंभ ही 144 वर्षांनी आलेली महापर्वणी असल्याने कोट्यवधी भाविकांची पावले सध्या प्रयागराजकडे वळलेली आहेत. महाशिवरात्रीपर्यंत चालणार असलेल्या ह्या महाकुंभमध्ये किमान 45 कोटी लोक सहभागी होतील असा अंदाज उत्तर प्रदेश सरकारने व्यक्त केलेला होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून महाकुंभला येणाऱ्या भाविकांच्या संख्येची गणना रोज होत असते. त्याच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, कालपर्यंत सुमारे 19 कोटी 94 लाख लोकांनी प्रयागराजमध्ये महाकुंभसाठी हजेरी लावली आहे. महाकुंभ पर्वणीमध्ये होणारे शाही स्नान हे महत्त्वाचे असते. काल मौनी अमावस्या असल्याने शाही स्नानासाठी प्रचंड गर्दी तर झालीच, परंतु प्रशासनाने स्नानासाठी जो बारा किलोमीटरचा घाट बांधला आहे, त्यावर जेथे जागा असेल तेथे स्नान करण्याऐवजी भाविक केवळ गंगा, यमुना आणि सरस्वती एकत्र येतात त्या त्रिवेणी संगमावरच स्नानासाठी धावल्याने तेथे चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. प्रशासनाचे म्हणणे आहे की मौनी अमवास्येसाठी तब्बल दहा कोटी लोक प्रयागराजमध्ये दाखल झालेले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या लोकांपैकी बहुतेकजणांनी स्नानासाठी केवळ त्रिवेणीसंगमाकडे धाव घेतली. शिस्तीत हे स्नान झाले असते तर दुर्घटना घडली नसती, परंतु आपल्याकडे गर्दी आणि शिस्त यांचा काही संबंधच नसतो. परदेशामध्ये कुठेही जा, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील लोक स्वयंस्फूर्तपणे रांग लावतात. रांगेशिवाय तेथे पान हलत नाही. आपल्याकडे मात्र जो तो पुढे जाण्याच्या प्रयत्नात रांगेला बगल देण्यातच हुशारी मानतो. त्यामुळे शाही स्नानातून पुण्य मिळवण्यासाठी गेलेल्यांनाही दुसऱ्यांना बगल देऊन पुढे जाण्याचा मोह आवरला नसेल तर ते दुर्दैवी आहे. पोलिसांनी बांधलेल्या बॅरिकेड्स उल्लंघून जो तो पुढे धावू लागल्यावर जे व्हायचे तेच झाले. अशा गर्दीच्या ठिकाणी जमणाऱ्या जमावाने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असते. परंतु आपल्या देशात ते घडत नाही. परिणामी मोठा जनसमूह एकत्र येतो तेव्हा तेथे केवळ बेशिस्त आणि अंदाधुंदीचेच दर्शन घडत असते. यंदाचा महाकुंभ हा सुरक्षित महाकुंभ असल्याची जाहिरातबाजी उत्तर प्रदेश सरकारने अगदी कालच्याच वर्तमानपत्रांतून केली होती. जल, जमीन आणि आकाश ह्या तिन्ही स्तरांवर सुरक्षा व्यवस्था कशी आहे, सात पातळ्यांची सुरक्षा यंत्रणा कशी उभारली गेली आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब कसा केला गेला आहे वगैरे वगैरे गोष्टींची शेखी सरकारने मिरवली होती. परंतु यापूर्वी महाकुंभनगरीत लागलेली आग आणि आता झालेली ही चेंगराचेंगरी यामुळे सुरक्षित महाकुंभ ह्या घोषणेस नक्कीच गालबोट लागलेले आहे. मात्र, कालच्या दुर्घटनेनंतर विविध आखाड्यांनी आणि साधूसंतांनी आपले शाही स्नान त्रिवेणीसंगमावरील गर्दी ओसरेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, ते कौतुकास्पद आहे. मौनी अमावस्येच्या मुहूर्ताची तमा न बाळगता जनहितार्थ त्यांनी आपले शाही स्नान पुढे ढकलले, त्यामुळे कित्येकांचा जीव वाचू शकला असे म्हणायलाही हरकत नाही. त्यांनी आपल्या शाही मिरवणुकाही टाळल्या. त्या मिरवणुकांचा आणि ठरलेल्या वेळी स्नानाचा हट्ट धरला गेला असता, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकली असती. हे सामंजस्य केवळ योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील त्यांच्या विश्वासामुळे शक्य झाले. केवळ त्रिवेणी संगमावर स्नान करण्याची काही आवश्यकता नाही. गंगेत वा यमुनेत कोठेही स्नान केले तरी चालते असा शास्त्रार्थही ह्या साधू महंतांनी सांगितला. त्यामुळेही गर्दी ओसरण्यास मदत झाली आणि पुढचा कार्यक्रम सुरक्षित पार पडला. सध्या दुबई आणि सिंगापूरपेक्षा लखनौ प्रयागराजची विमान तिकिटे महाग आहेत अशी स्थिती आहे. त्यात राजकारण्यांनी खास महाकुंभ यात्रा आयोजित केलेल्या आहेत. त्यामुळे तेथील गर्दी वाढते आहे. अशावेळी प्रशासनावर किती ताण आलेला असेल आपण कल्पना करू शकतो. परंतु घडलेली ही दुर्घटना हा मोठा धडा मानला गेला पाहिजे. अद्याप महाकुंभातील पुढची शाही स्नाने बाकी आहेत. महाशिवरात्रीला तर सांगतेसाठी अजून मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अधिक खबरदारी घेण्याची गरज मात्र नक्कीच निर्माण झाली आहे.