असंघटित कामगार वर्ग

0
18
  • सौ. प्राजक्ता प्र. गावकर

सरकारला आपल्या बरोबरीच्या लोकांमध्ये उठबस करण्यास, कुठली-कुठली उद्घाटने करण्यास वेळ मिळतो. आमच्यासारख्या रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या लोकांकडे पाहायला सवड नाही. सरकार फक्त भाषणे आणि पोकळ आश्वासने देण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. सरकारची आश्वासने म्हणजे अळवावरचे पाणी असेच म्हणावे लागेल!

मोठ्या घरातील लोकांना काय कमी असते? एकतर त्यांची वडिलोपार्जीत संपत्ती असते किंवा त्यांना चांगल्या पगाराची नोकरी असते. या नोकरीमुळे त्यांना भरपूर पैसा मिळतो. पण सामान्यांचे काय?
या समाजामध्ये अशिक्षित लोकांचा भरणा जास्त असल्यामुळे शिक्षणच नाही तर नोकऱ्या कुठून मिळणार? परिणामी त्या लोकांना उदरभरणासाठी रोजंदारीचे काम करावे लागते. हे काम फार बिकट असते. उन्हातान्हात दिवसभर खपल्यावर बाईमाणसाला दोनशे तर पुरुषांना पाचशे रुपये मजुरी दिली जाते. पण हे कामही अनियमित असते. चार दिवस काम आहे तर पाचव्या दिवशी काम संपले म्हणून सांगतात. चार दिवसांचा पगार त्यांना किती दिवस पुरणार? जेमतेम एका आठवड्याचा बाजार येईल. दुसऱ्या आठवड्यासाठी पुन्हा कामासाठी फिरावे लागते. कधीकधी तर कामानिमित्ताने दुसऱ्या दूरच्या गावी वस्तीलाही राहावे लागते. ते तर झालेच, पण त्याच्याबरोबर त्याचे कुटुंब असेल तर कुत्र्यालाही नको असे त्यांचे हाल होतात.

हे कामगार काम करतात त्या कामाचा विमा उतरवला जात नाही. म्हणजे हे काम करणारा त्या कामावरच जर कामी आला किंवा त्याला काही दुखापत झाली तर त्याचे पैसे मिळत नाहीत. माझ्या ओळखीचे एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाचा प्रमुख शिवा, त्याची बायको पारू आणि त्यांचे दोन मुलगे असे ते चौकोनी कुटुंब होते. शिवा पाडेलीचे म्हणजे रेंदेराचे काम करायचा. शिवाय इतरही मिळतील ती कामे तो स्वीकारायचा. कुणाच्या कुळागरात झाडे शिंपायला जा, नारळांचे पाडप कर, सुपाऱ्या वेच ही कामेही इमानेइतबारे करायचा. त्याची बायको दोन्ही लहान मुलांना म्हाताऱ्या सासूकडे ठेवून लोकांच्या शेतात (नडायला) रान काढायच्या कामाला जायची. दिवस बरे म्हणण्यासारखेच चालले होते. मुले लहान होती. मोठा मुलगा पाच-सहा वर्षांचा, तर धाकटा दीड-दोन वर्षांचा. त्यांना घरात म्हातारी सासू बघत होती.

एक दिवस शिवाला असेच एका मोठ्या जमीनदार घराण्यातून कामासाठी बोलावणे आले. नारळ पाडपाचे काम होते. शिवा सकाळी उठला. पारूने त्याला भाकरी खायला दिली. जाताना तो दोन्ही मुलांना जवळ घेऊन म्हणाला, “मी कामावर जातो. संध्याकाळी येताना तुम्हाला खाऊ आणेन हं!’ असे म्हणून बायकोचा निरोप घेऊन तो कामावर गेला. मालकाने नारळ काढायला सांगितले. तो माडावर चढला. पट्टीचा पाडेली होता तो! या माडावरून त्या माडावर चुडतांना धरून फिरायचा. पण त्या दिवशी काय झाले कुणास ठाऊक… त्याचा नेम चुकला आणि तो हात सुटून सरळ खाली कोसळला. कोसळला तो परत उठलाच नाही. क्षणात होत्याचे नव्हते झाले. खेळ खल्लास! शिवा गेला आणि त्याच्या बायकोवर दुःखाची अक्षरशः कुऱ्हाड कोसळली. तिला अकाली वैधव्य तर आलेच, शिवाय दोन्ही लहान मुले पोरकी झाली.

त्या मालकाने तेवढ्यापुरती विचारपूस केली. हळहळ दाखवली. अन्‌‍ नुकसान भरपाई म्हणून फक्त पन्नास हजार रुपये हाती ठेवले. त्या मालकाने असा विचार केला नाही की, शिवाची विधवा बायको व तिची लहान मुले यांचे पुढे कसे होणार? त्या मुलांची जबाबदारी तरी आपण घेऊया. पण तो मालक सरळ पाठ फिरवूनच निघून गेला. शिवाचा विमा उतरवला नव्हता, मग त्याच्या कुटुंबीयांना सुविधा कशी मिळणार? जर त्याने विमा उतरवला असता तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोला तर पैसे मिळाले असतेच; मुलांना पण मोठेपणी नोकरी मिळाली असती.

असा हा विम्याचा महिमा. सामान्य अशिक्षित लोकांचा विमा जरूर उतरवता आला पाहिजे. रोजगाराचे काम एक तर व्यवस्थित नसतेच. अनियमित असते. सरकारी नोकरी असलेल्यांचे बरेच असते. कामाला जा अथवा नको, महिन्याच्या 1 तारीखला पगार हा मिळतोच!
रोजंदारीवर कामाला जाणाऱ्यांना एक दिवस काम चुकले तर पैसे मिळत नाहीतच, परंतु ‘काल आला नाहीस, आजही येऊ नकोस’ असे ऐकूनही घ्यावे लागते. कधीकधी अक्षरशः गयावया करत काम मागून घ्यावे लागते. या साऱ्याबरोबरच कुटुंबाचीही वाताहत होते.
रोजगाराच्या कामाला जाणाऱ्या बायका धड घरातले कामही पूर्ण करू शकत नाहीत. आपल्या लहान मुलांकडेही त्यांचे लक्ष नसते. ती मुले मग कुणाच्या घरीदारी शेंबूड पुसत फाटक्या कपड्यानिशी गावभर हिंडत राहतात. संध्याकाळी आई जेव्हा घरी येते त्यावेळी त्यांना आंघोळ घालून खायला-प्यायला देते. घरी मुलांना बघायला थांबायचे तर त्या दिवसाचे पैसे जातात. पोट कसे भरणार? मग ती आई एकतर कुणाला तरी सांगते, जरा बाळाकडे लक्ष ठेवा हं! नाहीतर त्याच्या हाती काहीतरी खाऊ ठेवून आपण मागच्या दाराने पसार होते. अशी ही त्यांची रोजंदारी…!

रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या व्यक्तीला सणवार पाहता येत नाही. ‘ये रे दिसा, भर रे पोटा’ अशी त्यांची स्थिती असते. अगदी सणाच्या दिवशीसुद्धा कामाला जाणारे लोक असतात. बरं, स्वतःचा धंदा सुरू करावा म्हटले तरी भांडवल हवे. ते कुठून आणायचे? रोजंदारीवर मिळणाऱ्या पैशात भांडवल कसे उभे करणार? त्या तुटपुंज्या पैशांवर जगायचे कसे हाच तर प्रश्न!
मोठमोठ्या कंपन्यांत लोक रोजंदारीवर कामाला जातात. त्यांचे साहेब त्यांना यथेच्छ पिळून घेतात. वर वाच्यता केली तर रोजगार बंद करण्याच्या धमक्या देतात. माझ्या अवतीभवती पुष्कळ लोक आहेत जे रोजगाराच्या कामाला जातात. अगदी माझे पती, सासू, सासरे, दीर, जाऊ ही सर्व रोजंदारीवर कामाला जातात. पै-पै साठवून एवढे मोठे घर माझ्या सासऱ्यांनी, माझ्या यजमानांनी व दिराने उभे केले. या घराला एवढे मोठे करताना, रक्ताचे पाणी करताना या तिघांना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेय.

कुणीही मदत केली नाही. रोजंदारीवर कामाला जाऊनच पोट भरले. रोजंदारीवर काम करणाऱ्यांना पैशांची चणचण खूप भासते. असे असूनही सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. त्यांचे हाल बघून सरकारच्या काळजाला घरे पडत नाहीत. अत्यंत हालअपेष्टा सहन करत रोजगार मिळवणाऱ्या तमाम जनतेसाठी काही करण्यास सरकारला वेळच नाही, ही खरेतर खेदाची गोष्ट आहे. खरेच, सरकारला आपल्या बरोबरीच्या लोकांमध्ये उठबस करण्यास, कुठली-कुठली उद्घाटने करण्यास वेळ मिळतो. आमच्यासारख्या रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या लोकांकडे पाहायला सवड नाही. सरकार फक्त भाषणे आणि पोकळ आश्वासने देण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. सरकारची आश्वासने म्हणजे अळवावरचे पाणी असेच म्हणावे लागेल!