- डॉ. सुरज स. पाटलेकर
(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव)
आयुर्वेदानुसार बाह्यशुद्धीसाठी स्नान, दंतधावन (दात घासणे) इतर क्रिया शरीर, वस्त्र व गृह यावर केली जातात. तर आभ्यंतर शुध्दी धी- धृती- स्मृतिचे ज्ञान, पवित्र व्यवहार, शुद्ध विचार, राग-द्वेषादि भावनांचा त्याग केल्यामुळे प्राप्त होते.
योग म्हणजे फक्त योगासन नव्हे तर आसन (योगासन) हा योगशास्त्राच्या ८ भागांपैकी (अष्टांग) एक अंग/ भाग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे हे आठ भाग. यम-नियमाशिवाय आसनाला महत्त्व नाही. त्यातीलच यम व नियम ह्यांविषयी जाणून घेऊया.
यम ५ भागात विभागले आहे- अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह.
* अहिंसा : मन, शब्द (वाचा) व शरीराने कोणालाही कुठच्याही प्रकारचं दु:ख न देणे म्हणजेच अहिंसा. असे केल्याने मन शुद्ध राहते. सर्वांच्या भल्याचाच विचार नेहमी करावा. घृणास्पद वागू नये आणि कोणाबद्दल घृणा ठेऊही नये. बोलताना नेहमी विचार करूनच बोलावे ज्याने दुसर्यांच्या मनाला ठेच लागणार नाही. आयुर्वेदात हिंसेला पापकर्म म्हटले आहे.
* सत्य : नेहमी सत्य बोलावे. ह्याच्यावरच बाकीच्या यम-नियमांचे पालन अवलंबून आहे. सत्य बोलण्याने मनात कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. आपण निश्चिंत राहू शकतो. नाहीतर एक असत्य लपवायला अनेक असत्य बोलावी लागतात.
* अस्तेय : स्तेय म्हणजे चोरी. अस्तेयचा अर्थ चोरी न करणे. दुसर्यांच्या वस्तुंचा लोभ असू नये, विचारही करु नये, बोलू नये अथवा कृतीतूनही दाखवू नये. स्वत:च्या मेहनतीने धन कमवावे. आचार्य वाग्भट यांनी दशविध पापकर्मांमध्ये स्तेयचा उल्लेख केला आहे.
* ब्रह्मचर्य : जीवनाच्या ३ उपस्तम्भांपैकी (आहार, निद्रा व ब्रह्मचर्य) एक. उपस्तंभ म्हणजेच शरीराला अत्यावश्यक अशा मूलभूत गोष्टी. ब्रह्म म्हणजे ज्ञान व ते मिळवण्यासाठीचा मार्ग म्हणजे ब्रह्मचर्य. यात नैष्ठिक ब्रह्मचर्य सर्वोत्तम. असे केल्याने शारीरिक व मानसिक शुद्धी येतेच सोबत बळही प्राप्त होते. शरीर सुदृढ होते.
* अपरिग्रह : ह्याचा अर्थ असा की कुठच्याही वस्तूचा स्वार्थासाठी गरजेपेक्षा जास्त संग्रह/साठा करून ठेवू नये. आपल्याला गरज आहे तेवढ्याचाच विचार करावा. नेहमी दानशूर असावे. अति लोभाचा त्याग करावा.
यमानंतर नियम हा अष्टांगयोगचा दुसरा भाग/अंग. जसे यम ५ प्रकारचे तसेच नियमही ५ प्रकारांचे आहेत- शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान….
* शौच : शौच म्हणजे शुध्दी. फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक व शाब्दिक (वाचिक) सुद्धा. योगशास्त्रानुसार बाह्यशुध्दी व आभ्यंतर शुध्दी असा ही अर्थ केला जातो. आयुर्वेदानुसार बाह्यशुद्धीसाठी स्नान, दंतधावन (दात घासणे) इतर क्रिया शरीर, वस्त्र व गृह यावर केली जातात. तर आभ्यंतर शुध्दी धी- धृती- स्मृतिचे ज्ञान, पवित्र व्यवहार, शुद्ध विचार, राग-द्वेषादि भावनांचा त्याग केल्यामुळे प्राप्त होते. आचार्य चरकांनी शौच हा वैद्यांच्या ४ प्रधान गुणांमधला एक, असे चिकित्सा चतुष्पादमध्ये वर्णन केले आहे.
* संतोष : समाधानी असले पाहिजे. लोभ असू नये कुठच्याही गोष्टीचा. म्हणूनच तर लोभ हा धारणीय वेग (करू नये असा) आचार्य चरकांनी सांगितले आहे. योगानुसार संतोष असणे हे सर्वोत्तम सुख आहे. कारण लोभाने कष्ट/त्रासच उत्पन्न होणार असतो.
* तप : स्वधर्म पालनासाठी व्रत/उपवास यांसारखी कार्ये करणे म्हणजेच तप. ह्याच्या अभ्यासाने शरीर, इंद्रिये व मन शुद्ध होते. नेहमी जप, शौच, दान व तपस्या करावी. त्यासोबत देवता, गोमाता, ब्राह्मण, आचार्य, गुरु यांची सेवा यामध्ये लीन राहिले पाहिजे.
* स्वाध्याय : स्वाध्याय हा दिनाचर्येचाच एक भाग आहे. म्हणजेच सुसाहित्य व आध्यात्मिक ग्रंथांचे अध्ययन करणे.
* ईश्वरप्रणिधान : ईश्वराला शरण गेल्यामुळे योगसाधनेमध्ये येणार्या विघ्नांचा नाश होऊन समाधीसाठी मार्ग मोकळा होतो. आयुर्वेदात मानस दोषांच्या चिकित्सेमध्ये ईश्वरा(देवा)चे ध्यान, पूजा, पाठ यांचा उल्लेख केला आहे. विषम ज्वरा(तापा)च्या चिकित्सेमध्ये सुद्धा विष्णुसहस्रनामाचा जप करावा असे आचार्य चरकांनी सांगितले आहे.